पतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो ! – सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांचे मत

समाजाला साधना न शिकवल्याचा परिणाम !

पती आणि पत्नी साधना करणारे असतील, तर असे होत नाही ! संसारात राहून साधना करणारे पती आणि पत्नी संसाराकडे साधना म्हणून पहातात अन् त्यातून ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करतात !

नवी देहली – ‘टुडे डॉट कॉम’ या संकेतस्थळाने महिलांना येणार्‍या ताणाविषयी केलेल्या सर्वेक्षणात ४६ टक्के महिलांनी ‘पतीच्या वागणुकीमुळे सर्वाधिक ताण येतो’, असे सांगितले. एकूण ७ सहस्र महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये महिलांना ‘घरातील कोणत्या गोष्टींचा सर्वाधिक ताण येतो आणि यासाठी घरातील कोणती व्यक्ती उत्तरदायी असते’, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. या प्रश्‍नाला ४६ टक्के महिलांनी वरील उत्तर दिले.

सर्वेक्षणातील महिलांची मते

१. अनेकदा पुरुष घरातील कामांच्या संदर्भातील दायित्व झटकतांना दिसतात. ‘केवळ पैसे कमवून घरी आणून देणे, हेच आपले काम आहे’, असे अनेक पुरुषांना वाटत असल्याने ते घरातील इतर दायित्वाकडे दुर्लक्ष करतात.

२. पतीने मुलांची देखभाल करणे, वृद्धांची काळजी घेणे आणि घरातील गरजेच्या वस्तू विकत आणण्यासारखी कामे करावीत, अशी अपेक्षा महिलांना असते; मात्र पती हे दायित्व नाकारतात.

३. वयाच्या ३०-३५ वर्षीही पती लहान मुलांसारखे वागतात, तसेच हट्ट करतात. यांमुळे फार त्रास होतो.

४. अनेकदा पुरुष घरातील दायित्व टाळतात. त्यामुळे घरातील सर्व कामांचे दायित्व महिलांच्या खांद्यावर येते. परिणामी गृहिणी असो किंवा नोकरदार महिला, त्यांचा बराचसा वेळ घरातील कामांमध्ये जातो. यामुळेच महिलांना घरातील कामांचाही ताण येतो.

५. ‘घरातील कामे आणि मुलांची काळजी घेणे, यांमुळे अनेकदा स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. इतके करूनही अनेकदा कुटुंबातील इतर सदस्यांकडून महिलांच्या कामाचे साधे कौतुकही केले जात नाही’, याचा अधिक त्रास होतो.

६. ‘घरामधील लहानसहान कामांमध्ये हस्तक्षेप करणार्‍या सासूमुळेही मानसिक ताण येतो’, असे ८५ टक्के महिलांनी म्हटले आहे. सासूचे टोमणे आणि बोलणे यांमुळे महिलांना एकटेपणा वाटू लागतो अन् त्यातूनच त्यांना मानसिक ताण येतो.


Multi Language |Offline reading | PDF