राज्यात हृदयरोग मृत्यूच्या प्रकरणात ६२ टक्क्यांनी वाढ

तेलकट पदार्थांमुळे उच्च रक्तदाबाचा धोका !

नागपूर – तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’चे प्रमाण शरीरात वेगाने वाढते. परिणामी, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगासाठी हे मुख्य कारण ठरत आहे. महाराष्ट्रात हृदयरोग मृत्यूच्या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे. हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’युक्त खाद्यपदार्थांना दूर ठेवायला हवे, तसेच उच्च रक्तदाबापासून मुक्त रहाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘हायपरटेन्शन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रान्स फॅट अ‍ॅलिमिनेशन इन महाराष्ट्र’ या विषयावर सामाजिक संस्था ‘दिशा फाऊंडेशन’च्या वतीने १६ जुलैला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या विविध विषयातील तज्ञांनी आपले मत मांडले.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले की, राज्यात उच्च रक्तदाबाची मोठी समस्या समोर येत आहे. येथील ३ लाखांपेक्षा अधिक लोकांना रक्तदाबाशी जुळलेल्या समस्या आहेत. धक्कादायक म्हणजे अनेकांना याविषयी माहिती नाही. रक्तदाबाची तपासणी सामान्य असतांनाही याला गंभीरतेने घेतले जात नाही. यासाठी शासकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञांना याविषयी संयुक्त स्वरूपात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.


Multi Language |Offline reading | PDF