सर्वोच्च न्यायालयातील निकालपत्रे मराठीसह ७ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध

आता सर्वत्रच्या न्यायालयांनी प्रादेशिक भाषांमध्ये निकाल मिळण्याविषयी आदेश द्यावा, ही भाषाप्रेमींची अपेक्षा आहे !

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह ७ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय १८ जुलैपासून चालू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या संकेतस्थळावर यासाठी ‘व्हर्न्याक्युलर जजमेंट्स’ असा स्वतंत्र शोधसंकेतक चालू करण्यात आला आहे. या संकेतस्थळावर मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू, बंगाली आणि आसामी या भाषांतर निकालपत्रे उपलब्ध असणार आहेत.

देहली येथील पूर्वीच्या चिडियाघराच्या जागेवर उभारलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन १७ जुलै या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्या वेळी भाषांतरित न्यायनिर्णयांच्या या नव्या सेवेचाही शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ न्यायाधीश शरद बोबडे यांनी या वेळी प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित केलेल्या निवडक निकालपत्रांच्या प्रती राष्ट्रपतींना सादर केल्या. केरळ उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसार ही भाषांतर सेवा चालू करण्यात आली आहे. प्रारंभी एकूण ११३ निकालपत्रे या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये मराठी भाषेतील १४ निकालपत्रांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर कार्यालयाकडून ही भाषांतरे करून घेण्यात आली आहेत. या निकालपत्रात अनाकलनीय मराठीपेक्षा सुबोध आणि दर्जेदार मराठी शब्दांचा उपयोग करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF