वर्धा येथील सौ. सुनंदा चौधरी यांना आलेल्या अनुभूती

दैनिक सनातन प्रभातचे वितरण करतांना आलेल्या अनुभूती

अ. प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातचे ५ अंक वितरण करण्याचे प्रायश्‍चित्त घेणे, एकदा ४ अंकांचे वितरण होणे; पण पाचव्या अंकाचे काही केल्या वितरण न होणे : माझ्याकडून झालेल्या एका चुकीसाठी मी प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातच्या ५ अंकांचे वितरण करण्याचे प्रायश्‍चित्त घेतले होते. पहिले ४ दिवस पाचही अंकांचे वितरण झाले. पाचव्या दिवशी चार अंकांचे वितरण सहज झाले. पाचव्या अंकाचे वितरण होत नव्हते. मी श्रीकृष्णाला सतत प्रार्थना करत होते. नंतर दुपारी ११ ते १२ या वेळेत मी काळाराम मंदिराच्या समोरच्या चौकात दैनिक सनातन प्रभात घेऊन उभी होते. मी अनुमाने ३० ते ४० जणांना अंक दाखवला; पण कुणीही घेेतला नाही. देेवाला म्हणाले, ‘देवा, माझा अहं आड येत आहे. देवा, मला क्षमा कर. हा अंक वितरण झाल्याविना माझे प्रायश्‍चित पूर्ण होणार नाही.’

आ. तेजस्वी आणि पांढरेशुभ्र धोतर अन् झब्बा घातलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या दिसणार्‍या वयस्कर गृहस्थांनी अंक घेणे : त्याच वेळी प.पू. बाबांसारखे (प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारखे) तेजस्वी आणि पांढरेशुभ्र धोतर अन् झब्बा घातलेले वय ६० ते ७० वर्षांचे असणारे एक बाबा माझ्या समोरून जात होते. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यांच्या पायात चप्पलही नव्हती. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना दैनिक सनातन प्रभातविषयी सांगितले आणि म्हटले, ‘‘बाबा, तुम्ही हे दैनिक घेणार का ?’’ तेव्हा त्यांनी लगेच दैनिक घेतले आणि काही न विचारताच माझ्या हातावर ५ रुपये ठेवले. त्यांनी हातातील पिशवी खाली ठेवून माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्यांना म्हटले, ‘‘बाबा, तुम्ही हे काय करता ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही तळमळीने सेवा करता. तुमच्यातील तळमळीला मी नमस्कार करत आहे.’’ त्या वेळी माझे डोळे भरून आले. मला काहीच दिसत नव्हते. मी लगेच डोळे पुसून बाबांना शोधले. ते तेथून निघून केवळ २ – ३ सेकंदच झाले असतील; पण ते कोणत्याच मार्गावर दिसले नाहीत. मी अगदी चौकातच उभी होते. चारही रस्ते मोकळे होते. त्या दिवशीचा अंकही नेमका ५ रुपयांचाच होता.

केसांचा गुंता होऊन गाठी होणे, नामजपादी उपाय करूनही गुंता न सुटणे आणि दुसर्‍या रात्री दुर्गादेवी अन् हनुमंत यांना प्रार्थना, तसेच नामजप करून केस विंचरल्यावर गुंता सुटणे

‘२४.९.२०१६ या दिवशी सकाळी केस विंचरतांना ‘केसांच्या खालच्या भागात केस एकमेकांत गुंतून गाठी झाल्या आहेत’, असे मला दिसले. मी दोन घंटे प्रयत्न करूनही गुंता सुटत नव्हता. मी केसांना विभूूती, कापूर, गोमूत्र आणि तेल लावले, तरीही गुंता सुटला नाही.

पू. पात्रीकरकाकांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी नामजप सांगितला. पू. काकांनी सांगितल्याप्रमाणे मी ‘श्री दुर्गादेव्यै नम:।’ आणि ‘हं हनुमते नमः।’ हे जप एक आड एक अर्धा घंटा केले, तरीही केसांचा गुंता सुटला नाही. दुसर्‍या दिवशी पुन्हा नामजप केला. रात्री दुर्गादेवी आणि हनुमंत यांना प्रार्थना आणि नामजप करून पुन्हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा थोडा वेळ लागला; पण पूर्ण गुंता सुटला.’ – सौ. सुुनंदा चौधरी, वर्धा (२९.९.२०१६) ॐ

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त  पिंगळेकाकांनी साधिकेला तिच्या नावाआधी ‘गुरूंची’ असे लिहायला सांगणे

‘उज्जैन येथील कुंभमेळ्यात मी आणि माझी मुलगी कु. भावना देसाई सेवेसाठी गेलो होतो. त्या वेळी तेथून निघतांना पू. पिंगळेकाका भावनाला म्हणाले, ‘‘तू आता ‘गुरूंची भावना’ असेच लिहित जा. ‘गुरूंची भावना’ कधीच वाईट असू शकत नाही. गुरूंची म्हटले की, चांगलीच भावना आहे.’’

– सौ. वैशाली देसाई, अंबरनाथ


Multi Language |Offline reading | PDF