नामजपाच्या संदर्भात सौ. दीक्षा पेंडभाजे यांना आलेल्या अनुभूती

१. सेवा करत असतांना ‘जिव्हेवरी बैस रे गोविंद ।…’ हे भजन म्हटले जाणे आणि प्रत्येक क्षणी नामजप होण्यासाठी देवाला प्रार्थना करणे

सौ. दीक्षा पेंडभाजे

‘२३.८.२०१७ या दिवशी सकाळी मी सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती रंगवत होते. त्या वेळी माझ्याकडून ‘जिव्हेवरी बैस रे गोविंद ।  विठोबा लागो तुझा हा छंद ॥…’ हे भजन मनापासून म्हटले गेले. तेव्हा माझी भावजागृती झाली. त्यानंतर मी देवाला विचारले, ‘हे देवा, माझ्या मुखात प्रत्येक क्षणी तुझे नाम यायला हवे; पण मी दिवसभरात अनेक विचार करते. पुष्कळ जणांशी बोलते. मी या अनेक शब्दांतून तुझ्या एक नामात येण्यासाठी काय करू ?’ त्या वेळी माझ्याकडून आपोआप प्रार्थना झाली, ‘देवा, मी व्यष्टी आणि समष्टी साधना करत असतांना माझे गुण-स्वभावदोष यानुरूप अनेक शब्द बोलत असले, तरी ते शब्द माझ्या चित्तात जात असतांना एका नामात परावर्तित होऊ देत आणि नामरूपातच साठवले जाऊ देत. त्यामुळे दिवसभरात माझ्या मनात येणारा प्रत्येक विचार नामरूप होईल आणि प्रतिदिन माझे नामाचे खाते भरेल.’

२. प्रार्थना केल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ पाहून हसत असल्याचे दिसणे

त्यानंतर मला ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे दिसले. मी त्यांना आई म्हणून मिठी मारली. त्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली. (त्या वेळी सौ. दीक्षा पेंडभाजे रामनाथी आश्रमात होत्या.)

३. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनीही अधिकाधिक वेळ नामजप करण्यास सांगणे, त्या वेळी ‘केलेल्या प्रार्थनेला देवाकडून स्थुलातून प्रतिसाद मिळाला’, असे जाणवणे

२४.८.२०१७ या दिवशी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याशी बोलत असतांना त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही अधिकाधिक वेळ बसून नामजपादी उपाय करायला हवेत.’’ त्या वेळी ‘माझ्या प्रार्थनेला देवाने स्थुलातून प्रतिसाद दिला आणि सद्गुरु अनुताईंनी सांगितलेले वाक्य थेट माझ्या अंतर्मनात गेले’, असे मला जाणवले. देवाने सद्गुरु अनुताईंच्या माध्यमातून मला योग्य दिशा दिली आणि या प्रसंगातून मी ‘सगळे सद्गुरु एकमेकांशी एकरूप आहेत’, हे अनुभवले.

‘माझ्यातील भावझरा ओला ठेवण्यासाठी देव काहीही करू शकतो अन् त्यासाठी देवाने मला ही दिव्य अनुभूती दिली, त्यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !’

– सौ. दीक्षा पेंडभाजे, कल्याण (पश्‍चिम), जिल्हा ठाणे. (२५.८.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF