श्री. वाल्मिक श्रीधर भुकन यांना सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. पू. सौरभदादांच्या खोलीजवळ स्वच्छतेची सेवा मिळावी’, असे वाटणे आणि प्रार्थना केल्यावर ती मिळणे

श्री. वाल्मिक भुकन

‘मी डिसेंबर २०१४ मध्ये रामनाथी आश्रमात आलो. मला प्रसाधनगृह स्वछतेची सेवा देण्यात आली होती. ती कशी करायची, हे शिकण्यासाठी एक साधक मला तेथे घेऊन गेले. मला आनंद झाला; कारण बाजूलाच पू. सौरभदादांची खोली होती. तेथे गेल्यावर ‘पू. सौरभदादांची सेवा करण्याची संधी मला मिळावी’, असे मला वाटले. त्यानंतर मला तिसर्‍या मजल्यावरील सेवा न देता पाचव्या मजल्यावर स्वच्छतेची सेवा दिली. तिसर्‍या मजल्यावरील सेवा मिळावी; म्हणून मी सतत देवाला प्रार्थना करायचो आणि दोन आठवड्यानंतर मला पुन्हा तिसर्‍या मजल्यावर सेवा करण्याची संधी मिळाली.

२. पू. सौरभदादांंशी त्यांच्या आई बोलत असतांना भावजागृती होऊन चैतन्य मिळणे

पू. सौरभदादांच्या खोलीत त्यांच्याशी त्यांच्या आई बोलायच्या. मी सेवा करतांना ते बाजूच्या प्रसाधनगृहात मला ऐकू यायचे. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती होत असे. ‘या जिवाची देव किती काळजी घेतो !’, असा विचार मनात येऊन माझा कंठ दाटून यायचा. त्यांचा आवाज ऐकला की, चैतन्य मिळून मला उत्साह वाटायचा.

३. ‘पू. सौरभदादांचे दर्शन घ्यावे’, असे वाटणे आणि पू. सौरभदादांची सेवा करण्याचा निरोप मिळणे

एक दिवस माझ्या मनात विचार आला, ‘पू. सौरभदादांना भेटून बरेच दिवस झाले. एक दिवस त्यांच्या खोलीत जाऊन त्यांचे दर्शन घेऊया.’ दुसर्‍या दिवशी सकाळी पू. दादांची सेवा करणार्‍या साधकाने मला निरोप दिला, ‘‘तुम्हाला पू. सौरभदादांच्या सेवेसाठी जायला सांगितले आहे. तुम्हाला ते जमेल का ?’’ त्या वेळी आनंदाने ‘काय करू ?’ हेच मला समजत नव्हते. माझे मन निर्विचार झाले होते. ‘हे देवा, किती करतोस या जिवासाठी ?’, असे वाटून माझ्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले. पू. दादांना अंघोळ घालतांना साहाय्य करण्याची सेवा होती. पहिले २ दिवस पू. दादांना कसे उचलायचे, अंग पुसणे, अंथरूण बदलणे या सेवा कशा प्रकारे करायच्या, हे यापूर्वी पू. दादांच्या सेवेत असणार्‍या साधकाने मला शिकवले.

४. सेवा करतांना झालेली मनाची स्थिती

४ अ. ईश्‍वराने दिलेली सेवा तेच करवून घेतील, अशी श्रद्धा निर्माण होणे : पू. दादांची अंघोळ झाल्यावर त्यांना उचलून गादीवर ठेवावे लागते. ‘ते नीट जमेल का ?’, असे मला वाटले; परंतु ‘प.पू. डॉक्टरांनी आपले नाव कुणाच्या तरी माध्यमातून सुचवले आहे ना, मग तेच सेवा करवून घेणार’, अशी माझी श्रद्धा होती. मी प.पू. डॉक्टरांना सतत आळवत होतो. ‘प.पू. डॉक्टर, मी असमर्थ आहे. तुम्हीच ही संत सेवा दिली आहे. तुम्हीच ती करवून घ्या.’ त्या वेळी ‘या जिवाला या सेवेतून त्यांना काहीतरी शिकवायचे असेल’, असा माझ्या मनात भाव होता.

४ आ. ‘श्रीकृष्णाने पर्वत उचलला आहे आणि मला केवळ काठी लावायची आहे’ असा भाव ठेवणे : ‘ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने पर्वत उचलला आणि गोप-गोपींनी काठ्या लावल्या, तसेच स्थुलातून जरी मी पू. दादांना उचलणार असलो, तरी शक्ती आणि युक्ती प.पू. डॉक्टरच देणार आहेत’, असा मी भाव ठेवला. त्यामुळे मला पू. दादांना उचलतांना त्यांचा देह कधीच जड वाटला नाही. प.पू. डॉक्टर, तुम्हीच ते सर्व करत होता.

४ इ. ‘लहान मुलांशी बोलता न येणे’ हा दोष देवाने घालवणे : सौ. जोशीकाकूंनी (पू. दादांच्या आईंनी) पहिल्या दिवशी सांगितले, ‘‘पू. दादांशी लहान बाळाप्रमाणे प्रेमाने बोलले की, ते लगेच ऐकतात.’’ आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात माझ्याजवळ लहान मुले कधीच येत नव्हती. माझी पुतणी सोडली, तर इतर सगळे माझ्या बोलण्याला घाबरायचे. तेव्हा माझ्या लक्षात आले की, देवाने माझा हा दोष घालवण्यासाठी ही सेवेची संधी दिली आहे आणि ‘देवाने संधी दिली आहे, तर तोच करवून घेणार’, असा मी विचार केला.

५. सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

५ अ. पू. दादांशी बोलतांना आनंद होणे : पहिल्या दिवशी पू. दादांना म्हणालो, ‘‘पू. दादा, जरा डोके उचलता का ?’’ त्यावर त्यांनी लगेच डोके वर करून डोक्याखालचे पुसू दिले. मला नवल वाटले. यावरून ‘संत दुसर्‍यांना किती समजून घेतात’, हे समजलेे. नंतर जसजसा मी पू. दादांशी बोलू लागलो, तसतसा मला पुष्कळ आनंद मिळू लागला.

५ आ. चैतन्य मिळणे : ही सेवा करतांना ३ – ४ दिवस माझ्या अंगातून पुष्कळ घाम येत होता. तेव्हा ‘माझा त्रास अल्प होत आहे’, याची मला जाणीव झाली.

५ इ. पू. सौरभदादांच्या कोमल स्पर्शाने ‘दोष, अहं दूर होत आहेत’, असे वाटणे : पू. दादा नेहमी आनंदी असतात. ते भेटायला येणार्‍या सर्वांना खाऊ द्यायला सांगतात. ते माझ्या तोंडवळ्यावरून हात फिरवतात. तेव्हा त्यांचा कोमल स्पर्श जणू माझे दोष आणि अहं दूर करत आहे, असे मला जाणवते.

५ ई. दिवसभर उत्साही आणि आनंदी असणे : पू. दादांची सेवा झाल्यावर मी दिवसभर उत्साही आणि आनंदी असतो. जेव्हा मी पू. दादांचा तोंडवळा आठवतो, तेव्हा त्यांचा हसरा तोंडवळा माझ्या डोळ्यांसमोर येतो.

५ उ. पू. दादांची सेवा करून झाल्यावर माझे हात मऊ होतात. तो मऊपणा ३ – ४ घंटे टिकून रहातो.

६. पू. सौरभदादांविषयी जाणवलेली सूत्रे

६ अ. सतत आनंदी : पू. दादा दिवसभर झोपून असतात. त्यांना उठता-बसता येत नाही; पण तसे कधी त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवत नाही. ते सतत आनंदी असतात आणि पुष्कळ आनंद झाला की, दोन हात वर करून मोठ्याने हसून बोलतात.

६ आ. निरपेक्ष प्रीती : त्यांना भेटायला येणार्‍या साधकाला ते ‘बसा’, ‘टाटा’, ‘खाऊ दे’, असे पुष्कळ प्रेमाने म्हणतात. मी अधिक वेळ उभा असलो, तर ते मला ‘‘बस’’ म्हणतात. यातून त्यांच्यात ‘किती प्रेमभाव आहे’, हे शिकायला मिळाले. त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांची त्वचा गुलाबी झाली आहे.

७. सेवेत असतांना आलेल्या अनुभूती

७ अ. हिंदीतून बोलता येणे : मला व्यष्टी आढाव्यात हिंदीत बोलायचे होते. मला हिंदीत बोलता येत नव्हते. मी पू. दादांना म्हणालो, ‘‘पू. दादा, मला आढाव्यात हिंदीत बोलता येत नाही. मी काय करू ?’’ त्यावर पू. दादा म्हणाले, ‘‘काही करू नकोस.’’ मी म्हणालो, ‘‘मी काय नको करू, तर तुम्ही बोलून घेणार ना ?’’ त्यावर पू. दादा म्हणाले, ‘‘हो’’ आणि हसायला लागले. त्याच दिवसापासून मला आढाव्यामध्ये हिंदीत बोलता आले. पू. दादांनीच ते माझ्याकडून बोलून घेतले.

७ आ. पू. सौरभदादांनी साधकत्व नसलेल्या साधकांशी न बोलणे : एकदा विदर्भातील काही साधक आले होते. तेव्हा पू. दादांनी भ्रमणभाष हातात घेतला. त्यानंतर मी असेपर्यंत विदर्भातील साधकांचे दोन गट आले; परंतु पू. दादा नेहमीप्रमाणे त्यांच्याशी बोलत नव्हते. ते भ्रमणभाषवर प.पू. डॉक्टरांची ‘साधना’ ही ध्वनीचकती ऐकत होते. आलेल्या गटातील साधकांशी ते काहीच बोलले नाहीत.

७ इ. भ्रमणभाषला चंदनाचा सुंगध येणे : मी पू. दादांची अंघोळ झाल्यावर त्यांना माझ्या भ्रमणभाषमधील एक भक्तीगीत ऐकायला देत असतो. मी नेहमीप्रमाणे भ्रमणभाष त्यांच्या जवळ ठेवला. नंतर मला दुसर्‍या सेवेला जायचे होते; म्हणून त्यांच्याजवळील भ्रमणभाष घेण्यासाठी मी हात पुढे केला; परंतु पू. दादांनी भ्रमणभाष घट्ट पकडून ठेवला. नंतर मी दुपारी भ्रमणभाष आणण्यासाठी गेलो. काकूंनी विचारले, ‘‘याला चंदनाचा सुगंध येत आहे ना ?’’ मी पाहिले, तेव्हा खरंच माझ्या भ्रमणभाषला चंदनाचा सुंगध येत होता. तो सुगंध बराच वेळ टिकून होता.

८. छायाचित्र काढण्यास पू. सौरभदादांपासून आरंभ होणे

आतापर्यंत मी छायाचित्रकाने (कॅमेर्‍याने) कधीच छायाचित्र काढले नाही. सौ. जोशीकाकूंनी मला ते कसे काढायचे, हे शिकवले. छायाचित्र काढण्याचा आरंभ पू. दादांचे छायाचित्र काढण्यापासून झाला.

हे श्रीकृष्णा, प.पू. डॉक्टर, तुम्ही या अज्ञानी जिवासाठी किती करत आहात ! पू. सौरभदादांची प्रीती, आनंदी रहाणे, इतरांचा विचार करणे, असे अनेक गुण तुम्ही मला शिकवत आहात. ते गुण आम्हा सर्व साधकांत निर्माण होऊन आम्हाला ईश्‍वरी राज्याच्या ध्येयासाठी  पात्र करा. तुम्हीच ही सेवा दिली आहे, तुम्हीच ती करून घ्या. या अज्ञानी जिवाचा उद्धार करा, अशी संपूर्ण शरणागत भावाने कळवळीने प्रार्थना आहे.’

– तुमचा चरणसेवक,

– श्री. वाल्मिक श्रीधर भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०१५)


Multi Language |Offline reading | PDF