सनातनचे विकलांग अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी यांच्याविषयी सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना आलेल्या अनुभूती

सनातनच्या संतांची गुणवैशिष्ट्ये आणि साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

पू. सौरभ जोशी

१. साधक भेटायला आल्यावर पू. दादा काही न बोलता गंभीर होणे आणि थोड्या वेळाने त्यांच्या वडिलांनी त्या मागील कार्यकारणभाव सांगणे

अधिवक्त्या प्रीती पाटील

‘२५.५.२०१९ या दिवशी मी रामनाथी आश्रमात विकलांग अवस्थेतही संतपदी विराजमान झालेले सनातनचे संत पू. सौरभ जोशी (पू. दादा) यांना भेटायला गेले होते. त्या वेळी माझ्या समवेत श्री. सुनील घनवट, श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी हे साधक होते. तेव्हा पू. दादा आमच्याशी न बोलता गंभीर झाले होते; म्हणून मी त्यांना ‘सांगलीहून आले आहे’, असे सांगितले. त्यावर पू. दादा ‘दैनिक…दैनिक’ असे म्हणाले. त्या सप्ताहात सांगली येथील श्री. संकेत कुलकर्णी हे विकलांग अवस्थेतही संतपदी विराजमान झाल्याची वार्ता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आली होती. मी ती भ्रमणभाषवरील बातमी पू. दादांना वाचून दाखवल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. नंतर पू. दादांचे वडील श्री. जोशीकाका म्हणाले, ‘‘थोड्या वेळापूर्वी ते गंभीर होते, म्हणजे ते तुमच्यासाठी नामजपादी उपाय करत होते.’’

२. आश्रमातून निघण्यापूर्वी एका सेवेसाठी पू. सौरभदादांकडे गेल्यावर साधिकेने पू. दादांनी जोशीकाकांच्या माध्यमातून साधिकेला तिच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणे

आश्रमातून निघतांना मला पू. दादांकडून सांगली येथील पू. संकेतदादांसाठी खाऊ घ्यायचा होता; म्हणून मी त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा पू. दादा माझ्या समवेत पुष्कळ वेळ बोलत होते आणि माझ्याकडून पू. दादांना प्रार्थना होत होती, ‘मन निराश होऊन माझ्या मनात नकारात्मक विचार येतात. यातून तुम्हीच मला बाहेर काढा.’ तेथे जोशीकाका आल्यावर मी त्यांना वरील प्रसंग सांगितला. तेव्हा काकांनी मला निराशेवर मात करण्यासाठी काही दृष्टीकोनात्मक सूत्रे सांगितली. त्या वेळी ‘मी पू. दादांना प्रार्थना करत होते आणि त्यासंबंधी प्रश्‍नांची उत्तरे मला जोशीकाकांच्या माध्यमातून मिळत होती’, असे माझ्या लक्षात आले. नंतर मी घरी गेल्यानंतर ‘घरातील व्यक्तींविषयी पूर्वीपासून माझ्या मनात असलेले पूर्वग्रह आणि नकारात्मक विचार न्यून झाले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

३. ‘आध्यात्मिक त्रास ओळखून पू. सौरभदादांनी पू. संकेतदादांना खाऊ देण्याच्या निमित्ताने बोलावले.  मी पू. दादांसमवेत बोलत होते. तेव्हाच ‘माझे रेल्वेचे आरक्षण निश्‍चित झाले आहे’, असा निरोप माझ्या भ्रमणभाषवर आला होता. नंतर रेल्वेत बसल्यावर माझ्या लक्षात आले, ‘माझे एकटीचेच तिकीट निश्‍चित झाले आहे; पण इतरांची तिकीटे निश्‍चित झालेली नाहीत.’ तेव्हा मला होणारा आध्यात्मिक त्रास पू. दादांनी ओळखला होता. त्यामुळे त्यांनी पू. संकेतदादांना खाऊ पाठवण्याच्या निमित्ताने मला बोलावले आणि ‘त्यांनी माझ्यासाठी नामजपादी उपाय करून मला चैतन्य अन् बळ दिले आहे’, असे मला जाणवले.

४. एका सेवेतील अडथळे दूर होण्यासाठी पू. दादांना प्रार्थना केल्यावर त्यांनी ‘होऽ हो’, असे सांगणे

एका हिंदुत्वनिष्ठाच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन करायचे होते. तेव्हा त्यासंबंधी नियोजन करतांना पुष्कळ अडचणी येत होत्या. काही दिवसांनी मी रामनाथी आश्रमात गेल्यावर पू. दादांच्या खोलीत गेले होते. तेव्हा मी पू. दादांना ‘अधिवक्त्यांचे संघटन करतांना येणारे अडथळे तुम्हीच दूर करा आणि सेवांचे नियोजन करतांना तुम्ही माझ्या समवेत रहा’, अशी प्रार्थना केली होती. त्या वेळी

पू. दादांनी मोहक हसून ‘होऽ हो’, असे सांगितले होते. नंतर मी रामनाथीहून सांगली येथे आल्यावर अधिवक्त्यांच्या संघटनाची सेवा करत होते. तेव्हा मला रामनाथी येथील वरील प्रसंगात ‘माझ्या प्रार्थनेला पू. दादांनी होकार दिला होता’, याची आठवण झाली. त्या क्षणी ‘सेवा करतांना मला पू. दादांचे अस्तित्व सूक्ष्मातून जाणवत आहे आणि मला सेवा करण्यासाठी ते प्रोत्साहनही देत आहेत’, असे मला जाणवले.

५. कृतज्ञता

‘हे श्रीकृष्णा, तूच मला पू. सौरभदादांचा स्वर्गीय सत्संग दिलास. यासाठी मी तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (९.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF