गुरूंचे माहात्म्य !

सर्वसामान्य माणूस हा त्याच्या दैनंदिन ‘रोजीरोटी’मध्ये व्यस्त रहातो. काही वेळा त्याच्या आयुष्यात दुःखद प्रसंग किंवा अडचणी आल्या तर त्याला देवाची आठवण होते; त्यानंतर त्याने साधनेचे चांगले प्रयत्न चालू ठेवले तर त्याला गुरूंची प्राप्ती होऊ शकते. गुरूंप्रतीचा समर्पणभाव वाढत राहिल्यावर एक दिवस त्याच्यावर गुरुकृपा होते. गुरुकृपेशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही. यावरून गुरूंचे महत्त्व लक्षात येते. आपली प्राचीन परंपरा आपल्याला प्रत्येक मनुष्याने सर्वसामान्य आयुष्य जगतांनाच ईश्‍वरप्राप्ती करायची आहे, याची शिकवण (ज्ञान) देते. ईश्‍वर (मोक्ष)प्राप्तीसाठी काय काय कृती करायला पाहिजे याची शिकवण (ज्ञान) गुरुच सुलभ करून सांगतात आणि साधकाकडून साधना करवूनही घेतात. गुरूंचे हे माहात्म्य आज सनातनचे साधक अनुभवत आहेत !

परात्पर गुरु पांडे महाराज

आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण काढण्याची ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’!

सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं न मामकीनस्त्वम् ।
सामुद्रो हि तरङ्गः ।
क्वचन समुद्रो न तारङ्गः ॥ – आद्य शंकराचार्य

अर्थ : हे नाथ, तुमच्या-माझ्यात भेदभाव राहिलेला नसला, तरी मी तुमचा आहे; पण तुम्ही माझे नाहीत; कारण लाट समुद्राची असतेे; पण समुद्र लाटेचा नसतो. (‘तरंगाचा समुद्र’, असे कुणी म्हणत नाही.)

विवरण : जेव्हा समुद्रामध्ये लाट निर्माण होते, तेव्हा ती लाट स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतःचे महत्त्व वाढवत असेल, तर हे व्यर्थ आहे; कारण शेवटी ती लाट त्या समुद्रातच विलीन होत असते. त्याप्रमाणे मनुष्यही जन्म घेतल्यानंतर स्वतःचे महत्त्व जपण्यासाठी अहंकाराने खटपट करतो. तो भौतिक अशाश्‍वत अशा सुखाच्या मागे लागून त्याचे आयुष्य व्यर्थ घालवतो. ‘मृत्यूनंतर भौतिक गोष्टी त्याच्या समवेत येत नाहीत’, हे त्याला कळत नाही. या अन्य गोष्टी मायेशी अनुबद्ध असल्यामुळे तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतो; मात्र हे ज्याला कळते, तोच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून स्वत:ची सुटका करतो.

वरील सूत्रे जो लक्षात घेतो, म्हणजे ‘मी’ आत्मा आहे’, अशी धारणा करून जो सतत अभ्यास (प्रयत्न) करतो, तोच ‘मला मृत्यू नसून मी अमर असा आत्मा आहे’, अशी धारणा करू शकतो. या आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण काढण्याच्या प्रक्रियेला परात्पर गुरु डॉ. आठवले ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ असे म्हणतात. यासाठी मनाला स्वयंसूचना द्याव्या लागतात. ही तपश्‍चर्याच आहे.

मूलतः सर्व शून्य, चैतन्यमयच आहे. केवळ कार्य करण्यासाठी ते सगुण स्वरूपात दिसते; मात्र मूलतः ते चैतन्यस्वरूप असल्याने शेवटी चैतन्यच शिल्लक रहाते.

स्वयंसूचनेद्वारे जिवाला ‘मी आत्मा आहे’, याची जाणीव होते !

स्वयं = आत्मा, सूचना = जाणीव करून देणे. जीवात्म्याला जाणीव करून देणे, म्हणजे स्वयंसूचना होय. अशा सतत घेतल्या जाणार्‍या स्वयंसूचनेद्वारे जिवाला ‘मी आत्मा आहे’, याची जाणीव होते. तो भौतिकापासून विन्मुख होऊन शाश्‍वताशी जोडला जातो. कौशल्यपूर्ण होणारे कार्य ईश्‍वरेच्छेविना होत नाही. ते होण्यासाठी स्वयंसूचना फार महत्त्वाच्या आहेत. अशा वेळी कार्य स्वेच्छेने न होता ईश्‍वरेच्छेने होते. स्वयंसूचना प्रसंगाला धरून असल्याने त्यांची परिणामकारकता अधिक असते, हे येथे विशेष आहे.

सनातनच्या साधकांना अवतारी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या महान गुरूंचा लाभ होत असल्यामुळे ते भाग्यवान असणे

१. धर्मशास्त्राप्रमाणे ‘गुरु कसा असावा ? शिष्यानेसुद्धा कसे वागावे ?’, हे आपण पाहिले आहे. आज सनातनचे साधक खरोखरंच भाग्यवान आहेत की, त्यांना धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व दृष्टींनी परिपूर्ण असे परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु म्हणून लाभले आहेत. सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे, ‘धर्मशास्त्राप्रमाणे आदर्श गुरु ही संज्ञा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तंतोतंत लागू होते.’

२. आजची कलियुगातील स्थिती अधर्माचरणामुळे इतकी खालच्या स्तरावर गेली आहे की, सर्वत्र धर्मग्लानी झाली आहे. त्यामुळे जगात सर्वत्र अनागोंदी कारभार चालू आहे. अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार आणि आतंकवाद यांमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या रज-तमाच्या अधिकतम प्रभावामुळे सातव्या पाताळातील अनिष्ट शक्तींनी आपले अस्तित्व निर्माण करून सर्वत्र व्यभिचार माजवला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन संस्था’ स्थापन केली आहे. ‘याद्वारे साधना करून अनिष्ट शक्तींचे निर्मूलन व्हावे’, यासाठी त्यांनी गुुरुकृपायोगानुसार अष्टांगयोग साधनेचे विविध प्रयोग केले आहेत. त्याद्वारे ते निरनिराळ्या माध्यमांतून चैतन्यशक्तीला जागृत करत आहेत. या साधनेनुसार आज थोड्या कालावधीत त्यांनी ७५ संत आणि १ सहस्र १६० संत होण्याच्या मार्गावर असलेले ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले साधक सिद्ध केले आहेत. (आता १०२ संत आणि १ सहस्र २०९ साधक ६० टक्के आणि त्याहून अधि आध्यात्मिक स्तर असणारे आहेत. – संकलक) सनातनच्या संतांद्वारे धर्मजागृतीचे कार्य निरनिराळ्या माध्यमांतून चालू आहे. एवढेच नव्हे, तर संतपदाच्याही पुढे असलेले सद्गुरु, परात्पर गुरु पदापर्यंत आध्यात्मिक उन्नती प्राप्त केलेले साधक निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे आजच्या काळातील एकमेवाद्वितीय असे अवतारी पुरुष आहेत.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्यही अनेक संत-महात्मे म्हणतात, ‘‘वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ (सनातन धर्म राज्य) येणार असून आजची परिस्थिती पालटून सर्वत्र रामराज्याप्रमाणे पुन्हा स्थिती दिसायला लागेल.’’ हेच अवताराचे कार्य आहे. तेव्हा आपण बांधवांनी अशा या आपत्काळामध्ये साधना करून या कार्यात सहभागी व्हावे आणि आपले भाग्य उजळून घ्यावे.

४. या साधनेद्वारे निर्माण झालेल्या चैतन्याच्या प्रभावामुळे वातावरणातील अनिष्ट शक्तींचा प्रभाव उणा होतांना दिसत आहे.

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज (३०.६.२०१८)

गुरूंच्या ठायी पूर्णपणे समर्पण भाव असलेल्या साधकाने गुरूंशी अनुसंधान साधल्याने त्याच्यात एक दिवस प्रचंड ज्योतिर्मय ज्योती प्रस्फुटित होते !

साधकाला केवळ गुरुदीक्षा घेऊन उपयोग नाही, तर ते एक प्रकारचे विज्ञान आहे. साधक जेव्हा गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पणभाव ठेवतो, तेव्हा गुरु आपली प्राणशक्ती त्याच्या हृदयात स्थापित करतात. साधकाच्या भावभक्तीमुळे, सतत गुरूंशी अनुसंधान ठेवून त्यांचे चिंतन करत राहिल्याने त्याच्यात एक दिवस प्रचंड ज्योतिर्मय ज्योती प्रस्फुटित होते. गुरुकृपेविना मोक्षप्राप्ती होत नाही.

प्रार्थना आणि कृतज्ञता

हे गुरुराया (परात्पर गुरु डॉ. आठवले), आमचे अहोभाग्य आहे की, आम्हाला आपल्यासारखे गुरु प्राप्त झाले आहेत. ‘आपण आमच्या उद्धारासाठी किती कष्ट घेत आहात’, हे आम्ही जाणून आहोत. आम्ही सर्व साधक प्रार्थना करतो, ‘आपणच आमच्याकडून साधना करवून घ्यावी आणि आमचा उद्धार करावा.’ आपल्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज (३०.६.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF