पालम (परभणी) येथील दंगलीत समाजकंटकांकडून जाळपोळ

परभणी – येथील पालम शहरात १७ जुलैला रात्री उशिरा दोन गटांत दंगल उसळल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांत समाजकंटकांकडून दगडफेक, हाणामारी आणि जाळपोळ करण्यात आली.

१. १७ जुलैला किरकोळ वादाचे पर्यवसान बाचाबाचीत झाले. अचानक दिसेल ती वस्तू आणि काही वाहने यांना समाजकंटकांनी लक्ष्य केले. त्यातून हाणामारी, दगडफेक आणि जाळपोळ झाली.

२. या प्रकारानंतर बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परभणी येथून पोलिसांची अधिक कुमक पालम येथे पाठवण्यात आली आहे.

३. पोलीस उपअधीक्षक श्रीकृष्ण कर्डिले म्हणाले की, पालम शहरात अधिक प्रमाणात पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला असून शांतता प्रस्थापित केली जात आहे. या प्रकाराच्या संदर्भात सविस्तरपणे चौकशी केली जाईल. त्यापूर्वी पालम शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांची समजूत काढण्यात येत आहे.

४. ‘पोलीस अधिकार्‍यांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेचे  पडसाद उमटू नयेत, याची दक्षताही घेतली जात आहे’, असे काही पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF