पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संतपद गाठण्याच्या सोहळ्याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

पू. डॉ. शिवकुमार ओझा

‘८.७.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांचा संतपद घोषित करण्याचा सोहळा सनातनच्या रामनाथी आश्रमात पार पडला. या सोहळ्यात त्यांची लक्षात आलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि सोहळ्याचे देवाने करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

श्री. निषाद देशमुख

१. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

अ. पू. (डॉ.) ओझाकाका यांच्याकडे बघितल्यावर ‘ते एका ऋषींप्रमाणे असून त्यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार करावा’, असे जाणवले. ज्ञान आणि कर्म यांच्या संगमातून ते करत असलेल्या साधनेमुळे त्यांच्यात ऋषींसारखे दिव्यत्व निर्माण झाले आहे अन् त्यांनी केलेल्या समष्टी कार्यामुळे ते पूजनीय झाले आहेत.

आ. पू. (डॉ.) ओझाकाका यांच्या हृदयाच्या ठिकाणी सतत जागृत रहाणारी ज्ञानाची ज्योत असून तिच्यातून पिवळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांच्या स्वरूपात ज्ञान सर्वत्रच्या समष्टीसाठी प्रक्षेपित होते. ज्ञानयोगाच्या साधनेच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानालाच देवरूपात धारण करून त्याची भक्ती अनुभवली असल्याने त्यांच्या हृदयात ज्ञानज्योती दिसते आणि यामुळे ते स्वतः ‘ज्ञानस्वरूप’ झाले आहेत’, असे लक्षात आले.

इ. ज्ञानयोगानुसार केलेल्या साधनेमुळे पू. (डॉ.) ओझाकाका यांच्यात प्रगट ज्ञानशक्ती निर्माण झाली आहे. या प्रगट ज्ञानशक्तीमुळे ते सूर्याप्रमाणे असून त्यांच्याकडून ज्ञानशक्ती प्रकाशकिरणांच्या स्वरूपात समष्टीत प्रक्षेपित होऊन त्यातून कार्य केले जाते, असे लक्षात आले.

ई. पू. (डॉ.) ओझाकाका प्रगट ज्ञानशक्तीतून कार्य करतात. प्रगट ज्ञानशक्ती असल्यावर बुद्धीगम्य ज्ञान शब्दांमध्ये प्रगट करणे सहज असते. यामुळे ८५ वर्षे वय झालेले असूनही कागद समोर न ठेवता ते विषयाशी निगडित सर्व सूत्रे अखंड बोलू शकतात. यांतून त्यांची कार्य करण्याची दिव्य क्षमता लक्षात आली.

उ. सुमधुर फळांनी भरलेला वृक्ष वाकलेला असतो, असे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे पू. (डॉ.) शिवकुमार ओझाकाका ज्ञान स्वतः अनुभव करून मग समष्टीला सांगतात. यामुळे त्यांच्यात निर्माण झालेली शिष्यावस्था आणि नम्रता यांमुळे त्यांना समष्टीला आनंदयुक्त पद्धतीने ज्ञान सांगणे सहज शक्य होते.

ऊ. ज्ञानयोगातून व्यष्टी साधना करणारे त्याचा आनंद अनुभवत असल्याने समष्टीपासून अलिप्त राहतात. याउलट पू. (डॉ.) ओझाकाका यांची समष्टी ज्ञानसाधना असल्याने ते ज्ञानातून शक्ती आणि आनंद यांचे वाटप करून समष्टीला सहजतेने आपलेसे करतात. हे त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असल्याचे लक्षात आले.

ए. पू. (डॉ.) ओझाकाका निर्गुण ज्ञानवादी, म्हणजे सगुण गुरु किंवा एक विचारसरणीवर ठाम न रहाता आत्मानुभवातून ज्ञानाचा शोध करणारे आहेत. यामुळे जिज्ञासा, विश्‍लेषण आणि अनुभव यांनी युक्त परिपूर्ण ज्ञान त्यांना समष्टीला सांगता येते.

ऐ. पू. (डॉ.) ओझाकाका यांची मागच्या जन्मातील साधना ही ज्ञानयोगाने; पण व्यष्टी स्तरावरील होती. यामुळे त्यांची ज्ञानयोगाची समष्टी साधना राहिली होती. काळानुसार हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या संदर्भातील ग्रंथ लिखाणाच्या माध्यमातून ईश्‍वराने त्यांची समष्टी साधना करवून त्यांना संतपद प्रदान केले.

ओ. पू. (डॉ.) ओझाकाका ‘निर्गुण ज्ञानवादी’ असल्याने केवळ ज्ञानाचे लिखाण करण्यापुरतेच नव्हे, तर ज्ञानाचा प्रसार करण्याची समष्टी साधनाही तन, मन, धन आणि बुद्धी यांच्या त्यागातून ईश्‍वराने त्यांना आंतरिक स्फूर्ती देऊन करवून घेतली आहेे. आंतरिक स्फूर्तीतून त्याग करत गेल्याने अल्प कालावधीत त्यांना संतपद गाठता आले.

२. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या संतपद गाठण्याच्या सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण

२ अ. पू. (डॉ.) ओझाकाका यांच्या साधनेची अनुभवजन्य अनुभूती होणे : पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या कार्याच्या संदर्भात कार्यक्रमाचे निवेदक श्री. नागेश गाडे सांगत असतांना ते दृश्य सूक्ष्मातून डोळ्यांसमोर दिसत होते. पू. (डॉ.) ओझाकाका यांची साधना अनुभवजन्य, म्हणजे स्वतः अनुभव करून मग समष्टीला त्याचे मार्गदर्शन करणे, अशी असल्याने प्रत्यक्ष ते दृश्य डोळ्यांसमोर दिसत असल्याचे लक्षात आले. आतापर्यंत असे कोणत्याही संतांच्या संदर्भात अनुभवायला आले नव्हते.

२ आ. पू. (डॉ.) ओझाकाका यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांचे ज्ञान समष्टीत मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होऊन त्यांच्याकडून अस्तित्वातून कार्य करणे चालू होणे : पू. (डॉ.) ओझाकाका यांनी संतपद गाठल्याचे घोषित झाल्यावर त्यांच्याकडून पूर्वीच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक प्रमाणात ज्ञान समष्टीत प्रक्षेपित होत होते. त्या वेळी ‘सूक्ष्मातून ज्ञानाची गंगाच ओसंडून समष्टीत वहात आहे’, असे जाणवत होते. काही वेळाने त्यांच्याकडून (ज्ञान)शक्तीऐवजी त्यांच्या अस्तित्वातून चैतन्य प्रक्षेपित होऊन समष्टीत कार्य होणे चालू झाल्याचे लक्षात आले. यांतून त्यांचे ‘संतपद घोषित करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रगट, म्हणजे स्थुलातील कार्यासहित त्यांचे अप्रगट कार्य, म्हणजे सूक्ष्म स्तरावरील कार्यही चालू करून दिले आहे’, असे लक्षात आले.

२ इ. संतपदाची घोषणा झाल्यावरही शिष्यावस्थेमुळे शून्यावस्थेत रहाणारे पू. (डॉ.) ओझाकाका : पू. (डॉ.) ओझाकाका यांनी संतपद गाठल्याचे घोषित झाल्यावर ते शून्यावस्थेत असल्याचे जाणवले. स्थुलातून त्यांच्या चेहर्‍यावर काही भाव-भावना नव्हत्या; पण सूक्ष्मातून ते सनातन संस्थेच्या गुरु शिष्याच्या बोधचिन्हाप्रमाणे गुरूंच्या चरणी लीन असून गुरु त्यांना आशीर्वाद देत असल्याचे जाणवत होते. आतापर्यंत अनेक संतांची शून्यावस्था बघतांना त्यात काही क्रिया जाणवायची नाही; पण पू. (डॉ.) ओझाकाका यांच्या संदर्भात त्याहून वेगळे जाणवले. याचे मला आश्‍चर्य वाटले.

पू. (डॉ.) ओझाकाका अनुभवाच्या माध्यमातून ज्ञान मिळवणारे ज्ञानयोगी आहेत. ज्ञान अनुभवतांनाही ते अहंच्या अवस्थेत नसून शिष्यावस्थेत असतात. यामुळे संतपदाचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्यातील तळमळ आणि शिष्यावस्थेमुळे ते शून्यावस्थेत गेले आहेत. शून्यावस्थेत मन, बुद्धी आणि अहं यांचे विकार निर्माण होत नाहीत अन् शत-प्रतिशत अनुभव घेता येतो. त्यांच्यातील शिष्यत्व आणि शून्यत्व अन् त्यांच्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून गुरुतत्त्व करत असलेली कृपा ईश्‍वराने सनातन संस्थेच्या गुरु शिष्याच्या बोधचिन्हाच्या माध्यमातून दाखवली आहे.

२ ई. ज्ञानातील कर्मयोगत्वामुळे संतपदाविषयी अभिप्राय व्यक्त न करता हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाच्या संदर्भात गौरवोद्गार करणारे पू. (डॉ.) ओझाकाका : ज्ञानाला कर्मत्वाची जोड मिळाल्यावर ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेला अखंडत्व आणि सातत्य येते. ज्ञानयोगाला कर्मयोगाची जोड देऊन अखंड ज्ञानसाधना करणे, हेच पू. (डॉ.) ओझाकाका यांचे जीवन झाले आहे. या प्रक्रियेत राहून त्यांच्यात शिष्यत्व येऊन त्यांचा अहंही अल्प झाला आहे. ज्ञानातील कर्मयोगत्वामुळे संतपद गाठल्यावरही अहंमध्ये वाढ न झाल्याने त्यांनी स्वतःच्या संतपदाविषयी अभिप्राय व्यक्त न करता हिंदु धर्माविषयी गौरवोद्गार आणि त्याची श्रेष्ठता या संदर्भातच उपस्थित समष्टीला मार्गदर्शन केले. त्यांना स्वतःच्या संतपदाविषयी अभिप्राय विचारल्यावरही अल्प अहंमुळे त्यांनी ‘मी अज्ञानी आहे’, असेच मनोगत व्यक्त केले.

२ उ. प्राचीन काळातील ऋषिमुनी यांचे ज्ञान आणि आनंद यांनी युक्त सोहळ्याची प्रचीती देणारा पू. (डॉ.) ओझाकाका यांचा संतपद सोहळा : प्राचीन काळातील ऋषिमुनी यांच्यात ज्ञानचर्चा व्हायची. त्यात ऋषिमुनी एकमेकांना मिळालेल्या ज्ञानातील देवाण-घेवाण करायचे आणि त्या माध्यमातून समष्टीसाठी शिकणे योग्य अशा ज्ञानाचा प्रचार व्हायचा. ऋषिमुनी यांच्यातील हा संवाद शुद्ध ज्ञानयुक्त असला, तरी आनंदाची अनुभूती प्रदान करणारा असायचा. पू. (डॉ.) ओझाकाका यांचा संतपद गाठण्याचा सोहळा ज्ञानयुक्त आणि आनंदाची अनुभूती देणारा होता. या संवादामध्ये समष्टीसाठी उपयोगी ज्ञान आणि भरभरून आनंद उपस्थित सर्वांना अनुभवता आला.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०१९, दुपारी २.०८)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF