खर्‍या शिष्याप्रमाणे ‘गुरूंचे मनोगत न जाणता’ गुरूंनाच आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणारे काही तथाकथित शिष्य आणि भक्तांचा भाव ओळखून वागणारे संत !

१६ जुलै २०१९ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा झाली. त्यानिमित्ताने…

परात्पर गुरु पांडे महाराज

१. घरी आलेल्या संतांना त्यांच्या शिष्याने अन्यत्र नेण्याची घाई करणे; पण अंतरीचा भक्तीभाव ओळखणार्‍या संतांनी शिष्याकडे दुर्लक्ष करून यथासांग पाद्यपूजा करू देणे

‘वर्ष १९७० – ७१ मध्ये एक संत इंदूर येथे रहात होते. ते सिद्धपुरुष होते. त्यांना मी प.पू. बापूराव महाराज खातखेडकर यांच्याकडे बघितले होते आणि तेथेच त्यांची ओळखही झाली होती. ते अकोल्यास श्री. धर्माधिकारी यांच्याकडे येणार होते; म्हणून मी त्यांना माझ्याकडेही घेऊन येण्यास सांंगितले. त्याप्रमाणे एक दिवस आम्ही त्यांना अकोला येथील आम्ही रहात असलेल्या शासकीय वास्तूत घेऊन आलो. त्यांच्यासह भक्तमंडळी आणि इतर असे मिळून २० ते २५ जण होते. संत आल्यावर आम्ही त्यांचे चरण धुतले आणि ते आत आले; मात्र त्यांचे शिष्य त्यांना दुसरीकडे नेण्याचीच घाई करत होते. ‘त्यांची यथासांग पाद्यपूजा करता यावी’, यासाठी मी संतांंना विनम्रतेने थांबण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी शिष्यांच्या घाईकडे दुर्लक्ष करून आमची विनंती स्वीकारली. त्यामुळे आम्हा उभयतांना त्यांची यथासांग पाद्यपूजा करता आली. त्या संतांचे शिष्य त्या संतांना नेहमी निरनिराळ्या भक्तांच्या घरी पाद्यपूजा करण्यासाठी नेत आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्यांना घाई करत, जेणेकरून अधिकाधिक भक्तांच्या घरी जाता येईल; परंतु आमच्या घरी आल्यावर त्या संतांनी आमच्या अंतरीचा भक्तीभाव पाहून शिष्यांच्या घाईकडे न पहाता आमच्याकडे थांबण्याचे मान्य केले.

२. संतांना न विचारताच त्यांच्या नियोजनात परस्पर पालट करणारे त्यांचे जवळचे भक्तगण

२ अ. एका संतांनी त्यांच्या मलकापूरला मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी बुलढाण्याला येण्याचे मान्य करणे आणि त्यानुसार एका साधकाच्या घरी सर्व सिद्धता करणे : ‘वर्ष १९८१ मध्ये बुलढाणा येथील आमच्या कार्यालयात एक अन्य संप्रदायातील साधक होते. त्यांनी एका संतांकडून मंत्रदीक्षा घेतली होती. एकदा ते मलकापूरला येणार होते. तेव्हा ‘त्यांना बुलढाण्याला आणावे’, असा आम्ही विचार केला. त्याप्रमाणे ते संत मलकापूरला आल्यावर मी त्यांना तेथे जाऊन भेटलो आणि त्यांना बुलढाण्याला येण्याची विनंती केली. त्यांनी येण्याचे मान्य केले. संतांचे मलकापूरला ३० दिवस वास्तव्य होते. ते शेवटच्या दिवशी बुलढाण्याला येणार होते. त्यानुसार आम्ही बुलढाण्याला त्या साधकाच्या घरी सर्व सिद्धता केली.

२ आ. संतांना आणण्यासाठी मलकापूरला गेल्यावर ते भक्तगणांसह नागपूरला निघाल्याचे समजल्यावर वाईट वाटणे : ठरलेल्या दिवशी आम्ही त्या साधकासह अन्य एका साधकाचे वाहन घेऊन संतांना आणण्यासाठी निघालो; परंतु ते वाहन रस्त्यात मध्येच बंद पडले. त्यामुळे आम्हाला पुढील प्रवास बसने करावा लागला. आम्ही मलकापूरला पोचलो. तेव्हा ते संत सर्व भक्तगणांसह नागपूरला जाण्याच्या सिद्धतेत होते. आम्हाला पाहून त्यांच्या जवळचे भक्तगण मला म्हणाले, ‘‘आता आमची सर्व सिद्धता झाली आहे. तिकीटेही काढून ठेवली आहेत.’’ तेव्हा आम्हाला वाईट वाटले.

२ इ. संतांना भेटून सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी बुलढाण्याला येण्यास होकार देणे आणि ते आल्यामुळे सर्वांना आनंद होऊन भगवंताची दया अनुभवता येणे : नंतर आम्ही त्या संतांना भेटलो आणि सर्व परिस्थिती सांगितली. ‘‘सर्व भक्तगण आपली वाट पहात आहेत’’, असे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे ! तुम्ही माझ्या छायाचित्राची पूजा करता, त्या वेळी मी तेथे असतोच.’’ थोड्या वेळाने त्यांना काय वाटले कोण जाणे ! त्यांनी बुलढाण्याला येण्यास होकार दिला आणि तसे आपल्या भक्तांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी नागपूरला जाण्यासाठी काढलेली तिकीटे रहित केली. तोपर्यंत साधक बंद पडलेली त्यांची गाडी दुरुस्त करून घेऊन आले. नंतर आम्ही संत आणि सर्व भक्तगण यांना बुलढाण्याला घेऊन आलो. आम्हा सर्वांना आनंद झाला. ‘भगवंत भक्तावर कशी दया करतो’, हे यातून दिसून आले. तेथे त्यांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली. भजन-कीर्तन झाले. सर्व भक्तगणांना आनंद झाला. यामुळे त्या संतांनाही आनंद मिळाला. त्यांनी आमच्यावर कृपा केली. त्यानंतर ते नागपूरला गेले.

वरील प्रसंगातून लक्षात येते की, शिष्य त्यांच्या गुरूंना न विचारता त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागवतात; परंतु संत भक्ताची भक्ती पाहून त्याप्रमाणे वागतात.

३. एका उच्च कोटीच्या संतांची पाद्यपूजा होऊन ते उठू लागल्यावर एका शिष्याने संतांचा विचार न करता ‘आणखी काही शिष्य येत आहेत’, असे सांगून त्यांना तिथेच थांबायला सांगणे

एक उच्च कोटीचे संत एका आश्रमात आले होते. त्यांच्यासमवेत बरेच शिष्यगण होते. त्या संतांची पाद्यपूजा केल्यावर ते उठणार, इतक्यात त्यांच्यापैकी एका शिष्याने संतांच्या उतारवयाचा, ते थकल्याचा विचार न करता त्यांंना म्हटले, ‘‘आपले आणखी काही शिष्य येत आहेत. थांबा.’’ त्यामुळे संतांना त्याच जागी थांबावे लागले. थोड्या वेळाने त्यांचे अन्य शिष्य आले. त्यांनी संतांची पाद्यपूजा केली. नंतरच त्यांना त्या आसनावरून उठता आले.

या प्रसंगात मला असे जाणवले की, शिष्य संतांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावतात. वास्तविक संत आपल्या भावावस्थेत असतात. खरेतर शिष्यांनी गुरूंच्या इच्छेने वागणे, हे त्यांचे धर्मकर्तव्य असते. येथे मात्र मला उलट घडत असल्याचे दिसून आले.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज (जानेवारी २०१६)


Multi Language |Offline reading | PDF