जाणूनी श्री गुरूंचे मनोगत…

गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे; किंबहुना तो भारताचा आत्मा आहे. या गुरु-शिष्य परंपरेने केवळ व्यक्तिगत आध्यात्मिक उन्नतीचा विचार न करता राष्ट्रोद्धाराचे कार्य केले. सध्या भारत आणि संपूर्ण विश्‍व एका संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. सर्वत्र अधर्म बोकाळला आहे. ‘सत्याची अवहेलना आणि असत्याला प्रतिष्ठा’ अशी सामाजिक स्थिती आहे. धर्माचरणाला ‘मागासलेपण’ आणि उच्छृंखल वागण्याला ‘स्वातंत्र्य’ संबोधले जात आहे. अशा प्रतिकूल काळातही श्रीगुरूंना अपेक्षित असे धर्मजागृतीचे कार्य निडरपणे करणारे भाग्यवान जीव आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता अधर्मापेक्षा धर्माचे पारडे जड होऊ लागले आहे. हे धर्मबळ उत्तरोत्तर वाढत जाऊन वर्ष २०२३ मध्ये धर्माधिष्ठित ईश्‍वरी राज्याची स्थापना होईल, हे निश्‍चित ! पण तोपर्यंत ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ याप्रमाणे अखंड कार्यरत रहाण्याचे दायित्व साधकजनांचे असेल !

आपत्काळात साधनाच तारेल !

कालचक्र प्रचंड गतीने फिरत आहे. त्याची परिणती येणार्‍या काळात तिसर्‍या महायुद्धात होईल. ‘हे तिसरे महायुद्ध इतके संहारक असेल की, त्यापुढे पहिले आणि दुसरे विश्‍वयुद्ध छोट्या खेळाप्रमाणे वाटेल’, असे भाकीत अनेक संतांनी वर्तवले आहे. असे असले, तरी हे कालचक्रच अधर्माच्या अंधःकारातून धर्मसूर्याकडे घेऊन जाईल. या संधीकालामध्ये धर्माच्या पक्षात रहाण्याचे, तसेच उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करून झोकून देऊन धर्मकार्य आणि साधना करण्यासारखे सौभाग्य दुसरे कुठले नाही. त्यामध्येच भरभरून आनंद आहे. केवळ काठावर उभे राहून पोहता येत नाही, तर प्रत्यक्ष पाण्यातच उतरावे लागते. त्याप्रमाणे साधनेच्या प्रत्यक्ष प्रयत्नांमधून मिळणारा आनंदही ज्याने त्यानेच अनुभवायचा असतो. विश्‍वभरातील अनेक साधक श्रीगुरूंच्या कृपावर्षावाची प्रचीती घेत आहेत. ज्याप्रमाणे जात्याच्या खुंट्याला लागलेले दाणे भरडले जात नाहीत, त्याप्रमाणे नाम आणि साधना रूपी खुंटा धरून ठेवलेले साधकजीवही आगामी आपत्काळात तरून जातील.

हिंदु राष्ट्राची म्हणजेच ईश्‍वरी राज्याची स्थापना हे समष्टी ध्येय साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांना साधकजनांनी व्यष्टी साधनेची जोड दिली, तर त्यातून त्यांचा आत्मोद्धारही होईल. म्हणूनच श्रीगुरूंनी या संधीकालाचे ‘साधनेसाठीचा सुवर्णकाळ’ असे वर्णन केले आहे. या संधीकाळामध्ये मायेतील अनेक प्रलोभने साधकांना खुणावतील, साधनेचे शिवधनुष्य पेलणे अवघड वाटेल, साधकांची साधना होऊ नये; म्हणून बुद्धीच्या पलीकडील विघ्नेही येतील; पण अशा वेळी खचून न जाता गुरुपादुकांचे स्मरण करून श्रीगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवली, तर गुरुच मार्ग दाखवतील आणि सर्व संकटांमधून तारून नेतील. गुरुमहिमेच्या केवळ ऐतिहासिक आणि पौराणिक कथा आपण किती दिवस ऐकणार ? या गुरुकृपेचा क्षणोक्षणी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही वेळ आहे. गुरुकृपायोगाचे जनक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रवण आणि वाचन यांपेक्षाही साधनेचे प्रत्यक्ष प्रयत्न करण्याला म्हणजेच कृतीला ९८ टक्के महत्त्व दिले आहे. गुरुकृपायोग ‘प्रायोगिक’ म्हणजे साधना कृतीत आणण्याच्या संदर्भातील योग आहे. या मार्गाने साधना करणार्‍या साधकांनी साधनेच्या कृतीच्या स्तरावरील प्रयत्नांमध्ये वृद्धी करणे, हीच गुरुदक्षिणा ठरेल.

ज्ञानाचीही उपासना करूया !

अध्यात्मामध्ये भक्ती-भावाला महत्त्व आहेच आणि कलियुगामध्ये संघटितशक्तीला महत्त्व आहे. ध्येयपूर्तीसाठी भक्ती आणि शक्ती या दोन्हींची आवश्यकता असते; पण त्याच जोडीला हिंदूंनी ज्ञानशक्तीचीही आराधना करणे आवश्यक आहे. आज पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, धर्मांध असे विविध घटक हिंदु धर्मावर चिखलफेक करत आहेत. या घटकांचे सर्वसामान्य हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू असतात. त्यामुळे समाजामध्ये संभ्रमाचे जाळे पसरते. अशांचा वैचारिक प्रतिवाद करण्यासाठी हिंदूंनी ज्ञानाचीही उपासना केली पाहिजे. हे ज्ञानाचे बाणच धर्मविरोधी विचारांचा फुगा फोडतील आणि अधर्माची शक्ती क्षीण करतील.

आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी श्रीगुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते. आताच्या काळानुसार राष्ट्रोद्धारासाठी प्रयत्न करणे, हे गुरुकार्यच आहे. आदर्श समाजरचनेच्या निर्मितीसाठी तन, मन, धन आणि बुद्धी अर्पण करून प्रयत्न करणे, ही गुरुसेवाच आहे. ज्याप्रमाणे रामसेतू बांधतांना वाळूत लोळून सेतूच्या ठिकाणी अंग झटकून माती टाकणारी खारूताई श्रीरामाला प्रिय झाली, त्याप्रमाणे राष्ट्राचा उत्कर्ष साधण्यासाठी आपापल्या भागात यथाशक्ती आणि मन लावून कार्य करणारे, ध्येयप्राप्तीसाठी कौशल्याचा उपयोग करणारे, विरोधाला न जुमानता अध्यात्मप्रसाराची सेवाकरणारे यांवर ईश्‍वराची नक्कीच कृपा होते. यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकल्यास ईश्‍वर नक्कीच दहा पावले पुढे येणार आहे. ‘एकच सूर्य उगवतो आकाशी, परि तो प्रकाश देतो सर्वांना’ याप्रमाणे भूतलावरील, तसेच ब्रह्मांडातील सगळ्या जिज्ञासूंना मार्गदर्शन करणार्‍या गुरूंच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक शरणागतभावाने वंदन ! गुरूंना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी सर्वांना अंत:प्रेरणा मिळो आणि प्रत्येक क्षण ‘साधने’च्या स्तरावर व्यतीत होण्यासाठी प्रयत्न होवोत, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना !

॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥

 


Multi Language |Offline reading | PDF