गुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी भारत हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक !

आज गुरु-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. समाजामध्ये काही प्रमाणात राष्ट्राविषयी अभिमान असला, तरी धर्मप्रेम असणेही तितकेच आवश्यक आहे. धर्माधिष्ठित राज्यप्रणाली असली, तरच समाजामध्ये एकोपा, सामंजस्यादी दैवी गुणांचा विकास आणि आचरण होते. लोकांमध्ये धर्मप्रेम रुजवण्याचे कार्य गुरु (संत) करत असतात. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी आदी अनेक संत होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या सात्त्विक वाणीने लोकांमध्ये धर्मप्रेम पर्यायाने राष्ट्रप्रेम जागृत केले. धर्माधारित राष्ट्र स्थापले, तर ते कित्येक शतके टिकून रहाते आणि त्याच्या भौगोलिक मर्यादाही मोठ्या आणि व्यापक असतात. भगवान श्रीरामाने स्थापलेले राज्य पुढील सहस्रो वर्षे टिकले. त्यांनी स्थापलेल्या राज्याच्या सीमा केवळ आताच्या भौगोलिक भारतापुरत्याच नव्हे, तर आताच्या अफगाणिस्तान, इराण येथपर्यंत आणि तिबेटपासून दक्षिणेत इंडोनेशियापर्यंत होत्या. इतिहास पहातांना लक्षात येते की, चंद्रगुप्त मौर्यनेही आर्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या सीमा संपूर्ण भारतवर्षासह अफगाणिस्तानपर्यंत होत्या. मौर्य साम्राज्य विश्‍वातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्यासमोर असलेल्या या आदर्शांतून गुरु-शिष्य परंपरेची महानता लक्षात येते. गुरु शिष्याच्या केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर त्याच्या व्यावहारिक उन्नतीचीही काळजी घेतात. त्यामुळे राष्ट्राची उभारणी करण्यासाठी गुरु-शिष्य परंपराच आवश्यक आहे. गुरु-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्‍च हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक आहे.

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF