परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेल्या संतांची काही स्थुलातील वैशिष्ट्ये !

विविध वयोगट आणि प्रकृती असलेल्या साधकांतील संतत्व जाणून ते समाजासमोर उलगडणारे ‘रत्नपारखी’ परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकृतींचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ साधना करत आहेत. त्यांपैकी काही साधक संतपदीही विराजमान झाले आहेत. विविध वयोगट, विविध प्रकृती, विविध कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेले संत सनातनला लाभले आहेत. अगदी २ वर्षांचे बालकसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्यापासून ते ९७ वर्षांच्या वरळी, मुंबई येथील पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटील आजींपर्यंत सर्व वयोगटातील संतरत्ने सनातनच्या मांदियाळीत विराजमान आहेत. काही संतांची कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्‍वभूमी उच्च आहे, तर काही संतांचे अगदी हातावरचे पोट आहे. काही संत प्रवृत्तीमार्गी म्हणजेच घर, प्रपंच आणि संसार सांभाळून साधना करत आहेत, तर काही घरा-दाराचा त्याग करून पूर्णवेळ धर्मकार्य करत आहेत. कोणी मोठे उद्योजक आहेत, तर कोणी अल्पभूधारक शेतकरी आहेत. सनातनच्या १०२ संतांपैकी १ बालकसंत पू. भार्गवराम वगळता स्त्री संतांची संख्या ५४ असून पुरुष संतांची संख्या ४७ आहे.

असे अनेक प्रकारचे वैविध्य असूनही या सर्वांतील समान धागा आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले ! त्यांच्या प्रीतीने धाग्यात गुंफलेले हे सद्गुरु आणि संत गुरुकृपायोगानुसार साधना करणारे आहेत. ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अतीव श्रद्धा आणि भाव असलेले आहेत. सनातनचे साधक पुष्कळ भाग्यवान आहेत; कारण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह अनेक सद्गुरु आणि संत साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेल्या या संतांमध्ये किती वैविध्य आहे, ते पुढील लिखाणावरून लक्षात येईल. यासह ‘गुरुकृपायोगानुसार साधना सर्व वयोगट, सर्व परिस्थिती आणि सर्व प्रकृती यांना लागू होते’, हेही दिसून येईल.

श्री. वीरेंद्र मराठे

१. सनातनच्या संतांचे वयानुसार वर्गीकरण

२. वय आणि शारीरिक क्षमता यांतील विविधता

२ अ. बालक संत

‘मंगळूरू (कर्नाटक) येथील बालक पू. भार्गवराम भरत प्रभु (वय २ वर्षे) हे जन्मतःच संत आहेत’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी जाणले. त्यांचा सन्मान करून विश्‍वाला अध्यात्मातील अनोख्या घटनेची ओळख करून दिली. आतापर्यंत आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्‍वर आदी बालपणीच संत असल्याची उदाहरणे आपण ऐकली आहेत. जन्मतःच संत असलेले सनातनचे पू. भार्गवराम प्रभु, हे सध्याच्या काळातील बहुधा एकमेव उदाहरण असेल ! ‘भावी आपत्काळात साधकांना मार्गदर्शन आणि त्यांचे आध्यात्मिक अंगाने रक्षण करणे एवढेच यांचे कार्य नाही, तर ईश्‍वरी राज्य स्थापन झाल्यानंतर सर्वत्र ईश्‍वरी राज्याची घडी बसवण्याचे कार्यही पू. भार्गवराम करणार आहेत’, असे गौरवोद्गार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्याविषयी काढले आहेत.

२ आ. युवा संत

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणार्‍या सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार या गुरुकृपायोगानुसार साधना करून संतपदी विराजमान झालेल्या सर्वांत लहान वयाच्या साधिका आहेत. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी संतपद प्राप्त केले. विशेष म्हणजे महर्लोकातून साधनेसाठी पृथ्वीवर जन्म घेतलेल्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांची बाल्यावस्थेतून समष्टी संतपदाकडे वाटचाल झाली आहे. बाल्यावस्थेत ‘सर्वशक्तीमान ईश्‍वरासमोर स्वतः बालकच आहोत’, या भावाने साधना होते, तर समष्टी साधनेत विविध सेवांचे दायित्व घेऊन साधकांना सेवा करण्यास उद्युक्त करणे, त्यांना साधनेत मार्गदर्शन करणे, अशा निरनिराळ्या सेवा अंतर्भूत असतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पू. (सौ.) अश्‍विनीताई यांनी बाल्यावस्थेतून समष्टी संतत्वाकडे शीघ्रतेने प्रवास केला.

२ इ. दिव्यांग (विकलांग) अवस्थेतील संत

अनेकदा अध्यात्मातील उन्नत प्रारब्धभोग शीघ्रतेने संपवून आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होण्यासाठी अशा अवस्थेत पृथ्वीवर जन्म घेतात. अर्थात विकलांग असले, तरी ‘साधना’ हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असल्याने त्यांचा सहवास आनंदमय असतो. समाजात अशा विशेष बालकांना वेगळी वागणूक दिली जाते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या बालकांचा अध्यात्मातील अधिकार पूर्वीच जाणला होता. साधकांना साधनेसाठी चैतन्य पुरवण्याची सेवा या संतांकडून घडत आहे. बहुविकलांग असूनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या ईश्‍वरी राज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी झाल्याने या संतांची अध्यात्मातील वाटचाल वेगाने होत आहे. सध्या गोवा, रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी आणि सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी हे विकलांग संत आंतरिक साधनेच्या बळावर अध्यात्मात प्रगती करत आहेत.

२ ई. दृष्टी अधू असूनही साधना करणारे संत

डावीकडून सद्गुरु नारायण (तात्या) निकम यांच्या समवेत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (वर्ष २००८)

अपशिंगे, सातारा येथील सनातनचे ४ थे सद्गुरु नारायण (तात्या) निकम (देहत्याग वर्ष २०१५) हे पूर्वी लष्करात सैनिक होते. त्यानंतर सद्गुरु तात्यांना अनेक वर्षे दिसत नव्हते, तरी त्यांनी दृष्टी असणार्‍या लाखोंना जे साध्य करता येणार नाही, ते साध्य केले. वर्ष २००१ ते वर्ष २०१५ या केवळ १५ वर्षांच्या काळात ६० टक्के आध्यात्मिक स्तरावरून ८३ टक्के स्तरावर पोचणारे पू. तात्या एकमेव असतील !

भोसरी, पुणे येथील सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांची दृष्टी अधू असूनही त्या जमेल तशी अध्यात्मप्रसाराची सेवा करतात. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टर सर्व प्रकारच्या शारीरिक स्थितींमधील साधक आणि संत यांना ईश्‍वरी कार्यात सहभागी होण्याचे सौभाग्य देत आहेत.

२ उ. वयस्कर संत

ठराविक वयानंतर शारीरिक आणि मानसिक क्षमता अल्प होत जाते. अशा वेळी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू शोधून त्यावर मात करणे, स्वतःच्या स्वभावात पालट करून इतरांशी जुळवून घेणे अत्यंत कठीण असते. याही स्थितीत स्वभावदोष आणि अहं यांच्यावर प्रयत्नपूर्वक मात करून, स्वतःतील भक्तीभाव वृद्धींगत करून, धर्मप्रसाराची सेवा जोमाने करून सनातनचे अनेक साधक संतपदी विराजमान झाले आहेत. वयस्कर संतांपैकी काही संत उतारवयातही समाजात विविध ठिकाणी जाऊन प्रसाराची सेवा करतात, तर ज्या संतांना शारीरिक कारणांमुळे बाहेर जाऊन धर्मप्रसार करण्यास मर्यादा आहेत, ते संत घरबसल्या सेवा करतात. सनातनच्या देवद येथील आश्रमात अनेक वयस्कर संत सात्त्विक उत्पादनांची बांधणी, मागणी आणि पुरवठा यांच्याशी निगडित सेवा करतात. ज्या संतांना बसल्या बसल्या सेवा करणे कठीण होते, ते ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी आणि साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी नामजप अन् प्रार्थना करतात.

२ ऊ. मृत्यूनंतरही आध्यात्मिक प्रगती होत असलेले संत

जिवाची मृत्यूनंतरही साधना होत रहाते; मात्र ते सांगणारे अध्यात्मातील अधिकारी दुर्मिळ असतात. सनातनच्या साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांसारखे मोक्षगुरु लाभले आहेत. ते साधकांची मृत्यूनंतरही सूक्ष्मातून साधना करवून घेत आहेत. सनातनच्या २१ व्या संत पू. सीताबाई मराठे, २९ व्या संत पू. निर्मला होनप आणि ९२ वे संत पू. वसंत मळये हे देहत्यागानंतर संतपदी विराजमान झाले. सनातनच्या दुसर्‍या सद्गुरु (श्रीमती) विमल फडके, तिसर्‍या सद्गुरु (श्रीमती) शकुंतला पेठेआजी, चौथे सद्गुरु निकमतात्या, ११ वे सद्गुरु (डॉ.) वसंत आठवले, १२ व्या सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव हे संत देहत्यागानंतर सद्गुरुपदी विराजमान झाले.

परात्पर गुरु कालिदास देशपांडे हेही देहत्यागानंतर ‘परात्पर गुरु’ झालेले सनातनचे पहिले संत आहेत. सनातनच्या १२ संतांनी देहत्याग केलेला असून त्यांचे सूक्ष्म स्तरावरील कार्य चालू आहे.

३. व्यष्टी-समष्टी अशा दोन्ही प्रकृतींच्या साधकांचा आध्यात्मिक उद्धार !

३ अ. व्यष्टी प्रकृतीचे संत

काही संतांची व्यष्टी प्रकृती आहे. समाजात जाऊन अध्यात्मविषयक प्रवचने घेणे, साधकांना मार्गदर्शन करणे, हा त्यांचा पिंड नसला, तरी त्यांचा ईश्‍वराप्रती भाव असतो. ते अखंड नामजप करून ईश्‍वराशी अनुसंधानित असतात. ईश्‍वराला आळवणे, गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेच्या तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे, खडतर प्रारब्ध भोगतांनाही श्रीगुरूंवर अढळ निष्ठा ठेवणे, अशा प्रयत्नांद्वारे या संतांची अध्यात्मात उन्नती होते. आतापर्यंत ६२ संतांनी व्यष्टी साधनेद्वारे संतपद प्राप्त केले आहे.

मूलतः व्यष्टी प्रकृती असली, तरी स्वतःसाठी जप करता करता साधकांची साधना होण्यासाठी, कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी, ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी असे टप्प्याटप्प्याने व्यापक समष्टीशी निगडित नामजपादी साधना करायला सांगून गुरुदेव त्यांच्याकडूनही समष्टी साधना करवून घेत आहेत.

३ आ. समष्टी संत

मूलतः नेतृत्वगुण, पुढाकार घेणे, संघभाव असणे, अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये असणार्‍यांचा ओढा समष्टी साधनेकडे असतो. असे साधक अथवा संत समाजात अध्यात्मप्रसार करणे, धर्मप्रसार करणे, सत्संग घेणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या नियोजनादी सेवांमध्ये सहभाग घेणे, अशा सेवा करतात. समष्टी सेवा करतांना अनेकांशी संपर्क येत असल्याने स्वतःतील दोष आणि अहंचे पैलू यांची शीघ्रतेने जाणीव होते, तसेच विचारांतही व्यापकत्व येते. ईश्‍वर स्वतः सर्वांचा भार सांभाळत असल्यामुळे समष्टी सेवा करून अनेकांना साधनेत साहाय्य करणार्‍यांवर तो लवकर कृपा करतो. समष्टी साधना करून संतपद प्राप्त केलेले ३९ समष्टी सद्गुरु आणि संत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच हे सद्गुरु आणि संत यांची साधकांवर प्रीती आहे.

४. रत्नपारखी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता !

ईश्‍वराचे सगुण रूप असलेले संत वंदनीय आहेत; मात्र या सर्व संतांना घडवणारे, त्यांचे संतत्व जगासमोर उलगडणारे आणि त्यांच्या साधनेला पुढील दिशा देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे खर्‍या अर्थाने ‘रत्नपारखी’ आहेत ! परात्पर गुरु पांडे महाराज यांनी एकदा पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांना मार्गदर्शन करतांना विचारले होते, ‘‘रत्नपारखी’ या शब्दातील रत्न मोठे कि पारखी मोठा ?’’ या प्रश्‍नाचे महाराजांनी फार सुंदर उत्तर दिले होते की, ‘‘रत्नापेक्षा पारखी मोठा ! कारण ते रत्न आहे, हे ओळखणारा पारखी नसता, तर रत्न कोणी ओळखले असते ?’’ खरेच, सनातनचे संत तर वंदनीय आहेतच; मात्र त्यांची विश्‍वाला ओळख करून देणारे रत्नपारखी परात्पर गुरु डॉ. आठवले परमवंदनीय आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांविना आम्हा साधकांच्या जीवनाला काय अर्थ होता ? त्यांनी साधनेची वाट दाखवून आमचे जीवन आनंदाने उजळले आहे. आम्हाला आपलेसे करून एक नवी ओळख दिली आहे.

१६ जुलैला गुरुपौर्णिमा आहे. या दिनी शिष्याने गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची असते. यंदाच्या गुरुपौर्णिमेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच आम्हाला १०० संतांची अमूल्य भेट दिली आहे. ‘या संतांच्या चैतन्याचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सर्व साधकांकडून श्रीगुरूंना अपेक्षित असे प्रयत्न व्हावे’, ही त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’

– श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा


Multi Language |Offline reading | PDF