(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक !’ – आदी गोदरेज, उद्योगपती

गोदरेज यांना जिहादी आतंकवाद, धर्मांधांकडून होणार्‍या गोहत्या, हिंदूंना ‘काफिर’ ठरवून केल्या जाणार्‍या हिंसक कारवाया, ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे आदी घटना देशासाठी चिंताजनक वाटत नाहीत का ?

मुंबई – गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळींच्या घटना वाढत आहेत. देशाच्या अनेक भागांत अशा घटना घडत असल्याचे कानावर येते. मुंबईतही अलीकडे एका मुसलमान कॅबचालकावर अशाच कारणातून आक्रमण झाले होते. हे सगळे देशासाठी चिंताजनक आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध उद्योगपती आदी गोदरेज यांनी केले. १३ जुलै या दिवशी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी आदी गोदरेज पुढे म्हणाले की,

१. देशात सर्वकाही सुरळीत चाललेले नाही. सामाजिक आघाड्यांवर अनेक गोष्टी आर्थिक विकासाला घातक आहेत.

२. दारिद्रयाकडे दुर्लक्ष केले, तर देशाला स्वत:चे खरे सामर्थ्य दाखवण्यात अडचणी येतील. वाढती असहिष्णुता, जातीभेद आणि धर्मभेद यांवर आधारित द्वेषमूलक गुन्हे यांसह कथित नैतिक आतंकवाद यांतून देशाच्या आर्थिक वाढीस गंभीर हानी पोचू शकते.

३. बेरोजगारी, पाणीटंचाई, पर्यावरणास हानीकारक असलेल्या प्लास्टिकचा अतीउपयोग, ढासळती वैद्यकीय सेवा, आरोग्यावर करण्यात येणारा अल्प व्यय, अशा अनेक गोष्टी युद्धपातळीवर विचारात घेतल्या पाहिजेत.

४. या सर्व प्रश्‍नांवर केवळ मलमपट्टी करू नये, तर त्यांच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. जेव्हा उत्तरदायित्वाचा प्रश्‍न येतो, तेव्हा प्रत्यक्ष परिस्थितीत पालट होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो, हेही तितकेच खरे आहे.

५. सामाजिक अस्थिरता, द्वेषातून घडणारे गुन्हे, महिलांविषयीचा हिंसाचार, कथित नैतिक आतंकवाद, जात आणि धर्म यांच्या आधारावर हिंसाचार, अशा स्वरूपात अनेक प्रकारची असहिष्णुता देशात आहे. अशा परिस्थितीत सामाजिक सलोखा राखणे, ही काळाची आवश्यकता आहे.


Multi Language |Offline reading | PDF