पिंपरी (पुणे) येथील सनातन प्रभातच्या वाचक कु. सरस्वतीताई अमृतकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरुपौर्णिमेआधीच ईश्‍वराची चैतन्यदायी भावभेट !

कु. सरस्वतीताई अमृतकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु कु. स्वाती खाडये

पिंपरी (पुणे), १४ जुलै (वार्ता.) – प्रेमभाव, कुटुंबभाव, सहजता, अगत्यशीलता, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असणारा अनन्य भाव अशा दैवी गुणांनी युक्त असणार्‍या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक कु. सरस्वतीताई अमृतकर (वय ३३ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या. त्यांच्या निवासस्थानी १० जुलैला झालेल्या अनौपचारिक भेटीच्या वेळी जिल्हासेविका कु. वैभवी भोवर यांनी ही आनंदवार्ता घोषित केली. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचीच भावजागृती झाली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन कु. सरस्वती अमृतकर यांचा सत्कार करण्यात आला. कु. सरस्वतीताई यांनी सत्काराला उत्तर देतांना ‘प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या कृपेनेच हे सर्व झाले’, असा कृतज्ञताभाव व्यक्त केला. या वेळी त्यांना भावाश्रू आले. कु. सरस्वतीताई यांचे कुटुंबीयही या वेळी उपस्थित होते.

कु. सरस्वतीताई अमृतकर यांचा परिचय

कु. सरस्वतीताई अमृतकर मागील पाच वर्षांपासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचक आहेत. त्या सण-उत्सव यांच्या वेळी, तसेच प्रतिमाह त्यांच्याकडे असणार्‍या यज्ञयागादी कार्यक्रमांच्या माध्यमातून धर्मसेवा करतात. गुढीपाडवा, गणेशोत्सव आदी सणही भाविकांसह मोठ्या उत्साहात साजरे करतात. त्या वेळी सनातन प्रभातच्या विशेषांकांचे वितरण करणे, सनातनची सात्त्विक उत्पादने, तसेच ग्रंथ यांचे वितरण करणे, उपस्थितांना सनातन प्रभात वाचण्यास उद्युक्त करणे आदी माध्यमांतूनही त्या सेवारत असतात. सनातन संस्थेचे कार्य आणि संत, तसेच साधक यांच्याविषयी त्यांना पुष्कळ आदर आणि आत्मियता आहे.

वाचकांना साधनेत साहाय्य करणारे ‘सनातन प्रभात’ !

सनातन प्रभात नियतकालिकांमधून नेहमीच साधनाविषयीचे मार्गदर्शन केले जाते. सनातन प्रभातच्या प्रारंभीच्या काळात त्याच्या व्यापक प्रसारासाठी ‘वाचा हो वाचा सनातन प्रभात…’ या गीताची निर्मिती करण्यात आली होती. त्या काळात सनातनच्या वतीने काढण्यात येणार्‍या नामदिंड्या, प्रभातफेर्‍या यांमध्ये हे गीत आवर्जून लावले जायचे. त्या गीतात ‘वाचक तुम्ही व्हा साधक, येईल लवकरच तुम्हास, ईश्‍वरी राज्याची अनुभूती’, अशी ओळ होती. या ओळीची गेल्या काही वर्षांपासून प्रचीती येत आहे. सनातन प्रभातच्या वाटचालीचे हे यश द्रष्टेपणाने काही वर्षांआधीच अधोरेखित करणारे परात्पर गुरुदेव जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी ‘सनातन प्रभात’ नतमस्तक आहे !


Multi Language |Offline reading | PDF