योगाभ्यास प्रतिदिनच हवा !

नोंद

२१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन पार पडला. गेली अनेक वर्षे योगऋषि रामदेवबाबा समाजातील प्रत्येक व्यक्तीने योगासने करावीत, यासाठी पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये जागृती करत आहेत. ते समाजमनावर योगाभ्यासाचे लाभ आणि बिंबवत असलेले महत्त्व पाहून कोणालाही ‘योगाभ्यास करूया’, असेच वाटते. यालाच जोड पंतप्रधान मोदी यांनी दिल्यामुळे योगाभ्यासाचा प्रसार भारतामध्ये झपाट्याने होत आहे. २१ जून या दिवशी अनेक ठिकाणी सामूहिकरित्या योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. सामान्य व्यक्तींसमवेत राजकीय व्यक्ती आणि कलाकार यांनीही योगासने केली.

हिंदु धर्मामध्ये सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेली योगासने आजही तेवढीच लाभदायी आहेत. यामुळे आज योगासनांचा अभ्यास आणि संशोधन संपूर्ण जगात केले जात आहे. या संशोधनातून सर्वच शास्त्रज्ञ खात्रीलायकरित्या सांगत आहेत की, योगासनाच्या आचरणाने ‘रोगप्रतिबंधक’ आणि ‘रोगनिवारक’ असा दुहेरी लाभ होतो. याचाच अर्थ रोग होऊ नयेत आणि झाल्यावरही त्याचे निवारण करता येण्याची क्षमता योगाभ्यासामध्ये आहे. या दोन लाभांमध्येच योगाभ्यासाचे महत्त्व किती आहे, हे लक्षात येते. नियमित योगासने केल्यामुळे रोगनिवारणाची शक्ती आश्‍चर्यकारक रीतीने वाढते. योगासनांमुळे अनेक शारीरिक लाभ, तसेच मनावरही सकारात्मक परिणाम होतात. जगण्याची शक्ती प्रभावी होतेच, तसेच आपल्या बुद्धीची सर्जनशीलतासुद्धा वाढते, हे केवळ संशोधन करणार्‍यांनीच नव्हे, तर जे नियमितपणे योगासने करतात, तेही अनुभवत आहेत. त्यामुळेच आज आधुनिक वैद्य अनेक आजारांसाठी ‘योगासने करा’, असा सल्ला देतात. योगासनाने विशेषतः अनेक वर्षांपासून असलेली सांधेदुखी, मणक्यांचे आजार, दमा, हृदयरोग या आणि यांसारख्या अनेक रोगांवर रोगनिवारक अन् रोगप्रतिबंधक असा दुहेरी लाभ होतो.

योगासनांची अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तसेच संकेतस्थळांवरही पुष्कळ प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. योगऋषि रामदेवबाबा तर सकाळी दूरदर्शनच्या माध्यमातून योगासने करतांना घराघरापर्यंत पोचले आहेत. कोणताही खर्च न करता, सहजपणे करता येणारा आणि अनेक लाभांनी युक्त असणारा योगाभ्यास पाश्‍चात्त्यांच्या व्यायाम प्रकारांपेक्षा निश्‍चितच लाभदायी आहे. सकाळी काही मिनिटे केलेला प्राणायाम, तसेच सूर्यनमस्कारासारखी आसने दिवसभर उत्साही ठेवतात. हे योगासनांचे सामर्थ्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. ईश्‍वराने मनुष्याची निर्मिती केेली, त्याच समवेत त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी योगाभ्यासही दिला. ईश्‍वरनिर्मित योगाभ्यासाविषयी त्याच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. अशा योगाभ्यासाचा लाभ करून घेण्याची बुद्धी सर्वांना होवो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना !

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF