सद्गुरु नंदकुमार जाधव यांची कृपादृष्टी आणि वरदहस्त लाभल्यावर बंधनमुक्त झाल्याचे जाणवून आनंद होणे

‘मी वर्ष २०१८ मध्ये उन्हाळ्याच्या सुटीत माहेरी नांदेड (महाराष्ट्र) येथे गेले होते. ‘तेथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा असल्याने प्रसाराची सेवा आहे’, असे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मी पुष्कळ दिवसांनी सेवा करण्यासाठी बाहेर पडणार होते. मी माहेरी असल्यामुळे आई-वडिलांजवळ माझी मुलगी कु. ईश्‍वरी राहू शकत होती. त्यामुळे मी सेवेसाठी अधिकाधिक वेळ देऊ शकत होते. तेथे आम्हाला सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

सौ. प्रांजली जोशी

१. नांदेड येथे प्रसाराची सेवा करण्यापूर्वी मनाची स्थिती

१ अ. ‘बाहेरून आनंदी आणि स्थिर आहे’, असे दाखवण्याचा प्रयत्न करत असले, तरी आतून अस्थिरता जाणवणे : या आधी मला ‘गुरुतत्त्व माझ्यावर रूसले आहे’, असे वाटायचे. ‘मी ज्यांच्याशी बोलायचे, ते कोरडे आणि भावनाशून्य आहेत’, असे मला वाटायचे. ‘मी या सर्वांशी कितीही प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते वरवर प्रतिसाद देत आहेत’, असे मला वाटायचे. कदाचित ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायाने असे होत असेलही. ‘मी बाहेरून आनंदी आणि स्थिर आहे’, असे दाखवण्याचा प्रयत्न करत असले, तरी मला आतून अस्थिरता जाणवायची. मला ‘देव सर्वत्र आहे’, याची अनुभूती यायची; पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. मला कधीकधी हे असह्य व्हायचे. मी आतून पूर्णपणे कोलमडलेली असायची. ‘देव माझ्याजवळ आहे, तोच माझा सांभाळ करत आहे’, अशी जाणीवही मला असे. मी बाह्यतः सर्व व्यवहार आणि कर्तव्ये करत होते. अनेक वर्षे माझ्या मनात ही खंत होती.

२. नांदेड येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त सेवा करतांना अनुभवलेला आनंद

२ अ. सूर्यनारायणाच्या कृपेमुळे साधक उन्हातही ६ ते ७ घंटे प्रसाराची सेवा करू शकणे : मराठवाड्यात उन्हाळ्याच्या दिवसांत ४४ – ४५ डिग्री सेल्शिअस एवढे तापमान असते. मराठवाड्याच्या विविध भागांतून येथे आलेले साधक एवढ्या उच्च तापमानातही हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराची सेवा आनंदाने करत होते. आपण वैयक्तिक कामासाठी पेठेत (बाजारात) थोडा वेळ गेलो, तरी आपल्याला ऊन्हाचा त्रास होतो; मात्र आम्ही सेवेसाठी उन्हातून ६ – ७ घंटे फिरत होतो, तरीही आम्हाला काहीही त्रास होत नव्हता. जणू सूर्यनारायण आमची काळजी घेत होता.

२ आ. संपर्क केलेल्या व्यक्तींनी धर्मकार्यासाठी यथाशक्ती अर्पण देणे : नांदेड येथे साधक संख्या अल्प आहे. मी सेवेसाठी जाऊ लागल्यावर तेथील साधकांना आनंद झाला. सद्गुरु जाधवकाका साधकांची साधना आणि सेवा यांचा आढावा घेत होते. मी आणि सौ. शांती दादवानी व्यापार्‍यांकडे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी आवश्यक ते साहित्य अर्पण स्वरूपात मिळवण्यासाठी जात होतो. आम्ही ज्यांच्याकडे अर्पण घेण्यासाठी गेलो, त्या सर्वांनी यथाशक्ती धर्मकार्यात सहभाग घेतला.

२ इ. मुलीला प्रबोधनपर बालनाट्यात सहभागी होऊन आनंद मिळणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या २ दिवस आधी मी ईश्‍वरीला घेऊन साधकांसमवेत रहायला गेले होते. ईश्‍वरी (वय ६ वर्षे) मला सोडून प्रथमच साधकांसमवेत रहात होती. ती आनंदात होती. तिने सभास्थळी होणार्‍या प्रबोधनपर बालनाट्यात प्रथमच सहभाग घेतला होता. तिला त्या सेवेत पुष्कळ आनंद मिळाला.

२ ई. सेवेत धावपळ होऊनही थकवा न जाणवता मनाची स्थिती सकारात्मक असणे आणि सेवा करायला मिळाली; म्हणून कृतज्ञताभाव दाटून येणे : माझ्याकडे सभेच्या दिवशी व्यासपिठासंबंधी सेवा होती. त्यामुळे माझी २ दिवस धावपळ झाली, तरी मला थकवा जाणवला नाही किंवा मरगळही आली नाही. मी आनंदी, सकारात्मक आणि शरणागत स्थितीत होते. मला सेवा करायला मिळाली; म्हणून मनात पुष्कळ कृतज्ञताभाव दाटून येत होता. देवाने मला या सेवेच्या माध्यमातून भरभरून आनंद दिला.

२ उ. सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याशी बोलल्यावर कृतज्ञताभाव दाटून येणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यावर दुसर्‍या दिवशी आवराआवरीची सेवा चालू झाली. मी साहित्य पोचवण्याची सेवा करतांना माझे सद्गुरु जाधवकाकांशी बोलणे झाले. त्या वेळी काकांची करुणामय दृष्टी पाहून माझा कृतज्ञताभाव दाटून आला. त्यांनी  विचारपूस केली आणि मला प्रसाद दिला. तेव्हा सूक्ष्मातून जादूची कांडी फिरल्यासारखे वाटून ‘कित्येक दिवसांपासून शापाने झोपलेली ही राजकुमारी झोपेतून जागी झाली आहे’, असे मला वाटले.

३. सद्गुरूंची कृपादृष्टी आणि वरदहस्त लाभल्यावर झालेला पालट

त्यानंतर २ दिवसांनी मी गोव्याला आले. मला गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात सूत्रसंचालनाची सेवा मिळाली. नंतर मी प्रसारातील अन्य सेवाही करू लागले. मला आतून पुष्कळ मोकळे वाटत होते. मला बंधनमुक्त झाल्याचे जाणवून आनंद होत होता.

‘सद्गुरूंची कृपादृष्टी आणि वरदहस्त लाभल्यावर सर्वसामान्य जिवात किती पालट होतो !’, हे वर्णन करण्यासाठी हा लेखप्रपंच. हा लेख त्यांच्याच सुकोमल चरणी अर्पण !’

– गुरुचरणसेविका,

सौ. प्रांजली जोशी, पणजी, गोवा. (२३.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF