पू. भार्गवराम प्रभु यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये, ‘चौल संस्कार’ विधी करतांना लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांमागील शास्त्र अन् चौल संस्कार विधीमुळे त्यांच्यात झालेले पालट

पू. भार्गवराम प्रभु

सनातनचे मंगळूरू (कर्नाटक) येथील बाल संत पू. भार्गवराम प्रभु हे सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. त्या निमित्ताने त्यांच्यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

४.७.२०१९ या दिवशी पू. भार्गवराम यांचा ‘चौल संस्कार’ विधी आश्रमात पार पडला. श्री. निषाद देशमुख यांना पू. भार्गवराम यांची लक्षात आलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये शुक्रवार, १२ जुलै या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. आज चौल संस्कार विधीसंदर्भात श्री. निषाद यांना लक्षात आलेली अन्य सूत्रे येथे देत आहोत.

श्री. निषाद देशमुख

१. धार्मिक विधीतील चैतन्य व्यष्टीसाठी नसून समष्टीसाठी प्रक्षेपित होणे

‘सर्वसाधारण व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना आध्यात्मिक त्रास असल्यास विधीतील चैतन्य त्रास न्यून होण्यासाठी व्यय होते. थोडक्यात धार्मिक विधीचा परिणाम केवळ व्यष्टी स्तरापर्यंत मर्यादित रहातो. याउलट जीव साधना करणारा आणि चांगली आध्यात्मिक पातळी असणारा असल्यास त्याने केलेल्या विधीतून त्याचे पितर इत्यादींना गती प्राप्त होते, तसेच जिवाची काही प्रमाणात शुद्धी होते. याउलट पू. भार्गवराम प्रभु यांचे चौल संस्कार विधी अंगभूत केल्या गेलेल्या नांदीश्राद्ध, मातृकापूजन, पुण्यावाहन या विधींतील चैतन्य समष्टी स्तरावर परिणाम करत होते. यांतून ‘संतांचे अस्तित्व समष्टीसाठी किती महत्त्वपूर्ण असते’, हे लक्षात आले.

२. चौल संस्काराच्या माध्यमातून माया त्यागून ब्रह्मत्व स्वीकारत असल्याचे कृतीतून सांगणारे पू. भार्गवराम

चौल संस्काराचा संकल्प करण्यासाठी पू. भार्गवराम आणि त्यांचे आई-वडील एकत्रित बसले होते. या वेळी ते त्यांच्या अन्य नातेवाइकांकडे प्रवासाला जातांना करतात, त्याप्रमाणे हातवारे, म्हणजे ‘टाटा’ करत होते. ‘चौल संस्काराचा उद्देश जिवावर शुद्धीचे संस्कार करणे’, असा असतो. आत्मशुद्धी झाल्यावर मायेचा त्याग करून ब्रह्मत्वाकडे यात्रा करता येते. त्यानुसार पू. भार्गवराम मायेतील नातेवाइकांना ‘मी माया त्यागून ब्रह्मत्वाच्या प्रवासाकडे जात आहे’, असा संदेश देत आहेत’, असे जाणवले.

३. विधी धर्मशास्त्रानुसार पूर्ण व्हावा; म्हणून ईश्‍वरेच्छेने कृती करणारे पू. भार्गवराम

चौल संस्कार अंगभूत एक होम करण्यात आला होता. या होमाचा अग्नी प्रज्वलित असतांना वडिलांनी बाळाचे केस कापण्याचा विधी करायचा असतो. होमकुंडातील अग्नी वेळोवेळी विझत होता. त्या वेळी पू. भार्गवराम यांनी स्वतः होमामध्ये आज्य (तूप) याची आहुती दिली. त्यांच्या या कृतीनंतर होमातील अग्नी विझला नाही. अग्नी सतत शुद्ध असून इतरांना शुद्ध करणारा असतो. पू. भार्गवराम यांच्यावरील सूक्ष्मातील समष्टी आक्रमणे काही प्रमाणात अग्नीकडून शोषून नष्ट केली जात होती. पू. भार्गवराम यांच्यावरील आक्रमणे अधिक उच्च स्तराची असून अग्नी सगुण स्तरावरील असल्याने आक्रमणांतील त्रासदायक शक्तीमुळे तो विझत होता. हे त्रास अल्प करण्यासाठी ईश्‍वरेच्छेने पू. भार्गवराम यांनी स्वतः आहुती दिल्यावर अग्नीतत्त्वाच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. यामुळे अग्नी परत विझला नाही. यांतून ‘पू. भार्गवराम बाल्यावस्थेत असूनही त्यांच्याकडून सूक्ष्म स्तरावर होत असलेले कार्य स्थुलातून देव दाखवत आहे’, असे लक्षात आले.

४. क्षात्रत्व त्यागून ब्रह्मत्व स्वीकारणारे पू. भार्गवराम

पू. भार्गवराम यांचे चौल संस्कार होतांना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत होती आणि त्यांचे रूप सूक्ष्मातून सोनेरी होत होते. पू. भार्गवराम यांच्यात क्षात्रतेज प्रगट स्वरूपात असून ब्राह्मतेज अप्रगट स्वरूपात होते. चौल संस्काराच्या माध्यमातून ते आपल्या क्षात्रत्वाचा त्याग करून ब्रह्मत्व स्वीकारत होते. ‘क्षात्रत्वाच्या त्यागामुळे त्यांच्याकडून समष्टीसाठी शक्ती प्रक्षेपित होत होती, तर ब्रह्मत्व स्वीकारल्याने त्यांचे रूप सोनेरी होत आहे’, असे लक्षात आले. चौल संस्कार करतांना पू. भार्गवराम यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या कापलेल्या केसांचे वेगवेगळे ‘यू.टी.एस.’ परीक्षण केल्यावर त्यांच्या डाव्या बाजूच्या केसांमध्ये ८ मीटर सकारात्मक ऊर्जा, तर उजव्या बाजूच्या केसांमध्ये १४ मीटर सकारात्मक ऊर्जा आढळली. उजवी बाजू शक्तीची असते. यामुळे उजवीकडील केसांतून अधिक प्रमाणात शक्ती बाहेर पडत असण्याची प्रक्रिया यांतून लक्षात येते.

५. क्षौरकर्म होतांना न रडता स्वतःच्या दिव्यत्वाची प्रचीती देणारे पू. भार्गवराम

पू. भार्गवराम बाल्यावस्थेत असल्याने चौल संस्कार अंगभूत क्षौरकर्म, म्हणजे केवळ शिखेचा भाग ठेवून डोक्यावरील अन्य सर्व केस मुळासहित कापणे, ही कृती करतांना ते रडणार, असे उपस्थित सर्वांसह मलाही वाटत होते. प्रत्यक्षात पूर्ण क्षौरकर्मात ते एकदाही रडले नाहीत. क्षौरकर्म करतांना डोक्यावरील केसांना पाणी लावून मऊ करावे लागते. त्यांच्या जवळ ठेवलेली पाण्याची वाटी घेऊन वाटीतील पाणी डोक्याला लावण्याची कृती अधून-मधून ते स्वतः करत होते. यांतून स्थुलातून ते बाल्यावस्थेत असले, तरी त्यांची देहबुद्धी अल्प असून ते दिव्य अवस्थेत असल्याचे त्यांनी स्थुलातून सर्वांना दाखवले आणि प्रायोगिक अध्यात्माची शिकवण समष्टीला दिली.

६. शरणागत भावात राहून ईश्‍वराची कृपा मिळवणारे पू. भार्गवराम

चौल संस्कार अंगभूत क्षौरकर्म होतांना पू. भार्गवराम हातांच्या वेगवेगळ्या मुद्रा करत होते आणि त्यांच्या डोक्यावर चंदेरी रंगाचा दैवी कण सापडला. चौल संस्कार शुद्धीशी निगडित आहे. पू. भार्गवराम स्वतः सात्त्विक असल्याने मुळात त्यांना चौल संस्काराची आवश्यकता नाही. असे असतांनाही ते शरणागत भावावस्थेत राहून ईश्‍वर त्यांच्यावर करत असलेले ब्रह्मत्वाचे संस्कार ग्रहण करत आहेत. हे संस्कार योग्य प्रकारे होण्यासाठी ते स्वतः मुद्राही करत होते. ‘त्यांची अशी तळमळ आणि शरणागती यांमुळे ईश्‍वर त्यांना देत असलेल्या आशीर्वादामुळे त्यांच्या डोक्यावर दैवी कणही मिळाले आहेत’, असे लक्षात आले.

७. चौल संस्कारामुळे पू. भार्गवराम यांच्यात झालेले पालट

८. पू. भार्गवराम यांची गुरुश्रद्धा, धर्मश्रद्धा, धर्मपालन आणि त्यांचे अस्तित्व यांमुळे विधीस्थळी द्वापरयुगासारखे सात्त्विक वायूमंडल निर्माण होणे

पू. भार्गवराम यांचे चौल संस्कार होतांना विधीस्थळी द्वापरयुगासारखे सात्त्विक वायूमंडल निर्माण झाले होते. पू. भार्गवराम यांच्यातील गुरुश्रद्धा, धर्मश्रद्धा, धर्मपालन यांमुळे कलियुगात काळाच्या परिणामामुळे टिकून असणारे रज-तमही काही कालावधीसाठी अल्प होऊन धर्मशक्ती कार्यरत होते. ‘धर्मशक्तीच्या अस्तित्वामुळे वायूमंडलाची शुद्धी होऊन सात्त्विकतेमध्ये वाढ झाल्याने द्वापरयुगासारखी वायूमंडलाची अनुभूती येत आहे’, असे लक्षात आले.

९. कृतज्ञता

ईश्‍वराच्या कृपेने पू. भार्गवराम यांच्यासारखे अद्वितीय संत यांचा सहवास मिळाला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांच्याकडून शिकता आले. यासाठी दोन्ही संतश्रेष्ठांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०१९, रात्री ७.०५)

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF