चंद्रयान २ : सूक्ष्माची जोडही द्यावी !

संपादकीय

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘चंद्रयान २’ अंतर्गत १४ जुलैच्या मध्यरात्री चंद्रयानाचे अवकाशात उड्डाण झालेले असेल. या संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पात चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच एखाद्या देशाकडून यान उतरवण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे केवळ भारतालाच नव्हे, तर जगालाही चंद्राविषयी अधिक माहिती अवगत होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यान यशस्वीरित्या उतरल्यास चंद्रावर उतरणारा भारत जगातील चौथा देश होणार आहे. त्यामुळे भारतियांसाठी ही निश्‍चितच अभिमानास्पद गोष्ट आहे.

चंद्र हा पृथ्वीला सर्वांत जवळ असल्याने मनुष्य तेथे प्रत्यक्ष यान पाठवून अभ्यास करू शकतो. अवकाशातील दूरवरच्या ठिकाणांवरील मोहिमांसाठी तंत्रज्ञान पडताळणीसाठी चंद्रावरील मोहीम उपयुक्त ठरू शकते. चंद्राच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या भूतकाळाविषयीही माहिती मिळू शकणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागामध्ये गत कोट्यवधी वर्षांमध्ये मोठे पालट झालेले नाहीत. त्यामुळे सूर्यमालेत सूर्याजवळच्या भागात गेल्या कोट्यवधी वर्षांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचे पुरावे चंद्राच्या पृष्ठभागावरून मिळू शकतात. चंद्राच्या पृष्ठभागावरील मूलद्रव्ये आणि खनिजे यांचे नेमके मापन करून चंद्राच्या निर्मितीचे पुरावेही प्राप्त होऊ शकतात, अशी या मोहिमेविषयी इस्रोच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांचा भूतकाळ यांविषयी संशोधन आणि अभ्यास यांच्या दृष्टीने या मोहिमेचे महत्त्व आहे.

अमेरिकेच्या नासा या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेने हाती घेतलेल्या चंद्रमोहिमांपैकी १६ जुलै १९६९ मध्ये तीन अंतराळविरांसह अवकाशात झेपावलेल्या ‘अपोलो’ यानातील नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन हे २१ जुलैला चंद्रावर उतरले. ते मानवाचे चंद्रावरील पहिले आणि क्रांतीकारी पाऊल ठरले. यानंतरही नासाने घेतलेल्या अनेक चांद्रमोहिमांमध्ये एकूण १२ अंतराळविरांना चंद्रावर पाठवले. नासाच्या पहिल्या चंद्रमोहिमेविषयी अनेकांनी आक्षेप घेतले. ‘यान खरोखरच उतरले का ?’, ‘चंद्रावर वातावरण नसतांना अमेरिकेचा ध्वज फडकतांना कसा दिसतो ?’ ‘नील आर्मस्ट्राँगच्या बुटाचा ठसा चंद्रावर ठळकपणे कसा उमटला आणि राहिला ?’, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित करण्यात आले. या प्रश्‍नांची उत्तरे नासाकडून देण्यात आली; मात्र हे दीर्घकाळ वादाचे सूत्र राहिले. काही मासांपूर्वी नासाने सूर्याच्या दिशेनेही यान पाठवले आहे. त्यामुळेच अंतराळात अनेक उपग्रह पाठवणार्‍या आणि नासाच्या तोडीस तोड कामगिरी बजावणार्‍या इस्त्रोला चंद्राची भूरळ पडणार नाही, तर नवल !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) प्रमुख श्री. के. सीवन् यांनी चंद्रयान २ मोहिमेपूर्वी प्रथेप्रमाणे तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आणि एका संतांच्या मठात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हा अत्यंत अनुकरणीय प्रथा इस्रोने पूर्वीपासूनच घातला आहे. ‘मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संत आणि देवता यांचे आशीर्वादाचे आवश्यक आहेत’, हे इस्रोने आधीच ओळखले आहे. भारताला अथवा जगातील कोणत्याही देशाला अंतराळ मोहिमांसाठी कोट्यवधी ते अब्जावधी रुपये खर्च आलेला आहे. या मोहिमा जोखमीच्याही असतात. ‘अपोलो’ मोहिमांमधील एका मोहिमेच्या वेळी अपघात झाला होता, तर भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा कोलंबिया यानाच्या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. अंतराळातील मोहिमांची अत्यंत उच्च तंत्रज्ञान वापरून आखणी केली जाते. त्यामुळे त्या विफल होण्याचे प्रमाण न्यून असले, तरीही शक्याशक्यतेचे सूत्रही येथे लागू पडते.

प्राचीन भारतीय ऋषि-मुनी !

भारतीय इतिहास हा लक्षावधी वर्षांचा आहे. लक्षावधी वर्षांपूर्वी अत्यंत प्रगत अशी संस्कृती पृथ्वीवर आणि विशेषत: भारतात अस्तित्वात होती. ती समृद्ध करण्यात ऋषिमुनींचा समावेश होता. अंतराळाविषयी सखोल संशोधन ऋषिमुनींनी पूर्वीच करून ठेवले आहे. ग्रह-तार्‍यांविषयी सखोल ज्ञान अगदी पाचव्या शतकात आर्यभट्ट, वराहमिहिर यांना होते. ते त्यांनी संस्कृतमध्ये सूत्रबद्ध करून ठेवले आहे. जे शोध शास्त्रज्ञांना लागण्यास १९ ते २० वे शतक उजाडावे लागले, त्याचा अभ्यास या आचार्यांना आधीच होता. यावरून त्यांची महत्ताही लक्षात यावी. सहस्रो वर्षांपूर्वी आतासारखे तंत्रज्ञान नव्हते, यंत्रसामुग्री नव्हती ना विज्ञानाचा शोध लागला होता. तरीही त्यांनी अचूकपणे ‘पृथ्वी गोल आहे’, ‘पृथ्वीचा व्यास अमुक एवढा आहे’, ‘ती अमुक एवढ्या अंशात कलली आहे’ इत्यादी माहिती दिली आहे.

अगदी काही मासांपूर्वी देहत्याग केलेले ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांनी सूक्ष्म देहाने अंतराळात जाऊन मंगळ आणि गुरु या ग्रहांचा आणि शनि भोवतीच्या कड्याचा अभ्यास केला आहे. मंगळ ग्रहाशी संबंधित २१ सूत्रे त्यांनी निरीक्षणात नोंदवली, ज्यांपैकी २० सूत्रे वर्षभरानंतर नासाच्या यानाने पाठवलेल्या माहितीशी जुळली. गुरुभ्रमणाच्या वेळीही नोंदवलेल्या २० निरीक्षणांपैकी ९ सूत्रे नासाने केलेल्या परीक्षणात बरोबर आली. ‘शनि ग्रहाभोवती दिसणारे कडे म्हणजे तरंगणारे खडक आहेत’, असे निरीक्षण त्यांनी नोंदवलेले आहे, तेही खरे ठरले आहे. विशेष म्हणजे दुसर्‍या सूर्यमालेतील मानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख करून तेथील मानवाचे वर्णनही त्यांनी करून ठेवले आहे. आधुनिक विज्ञान याविषयी मात्र अनभिज्ञ आहे. ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांनी नोंदवलेली निरीक्षणे आणि नासाकडून सिद्ध झालेली त्यांची सत्यता यावरूनही सूक्ष्म-देहाने अंतराळात भ्रमण करून माहिती मिळवणे शक्य आहे, हे सिद्ध होते; मात्र हे साध्य होण्यासाठी तेवढी साधना होणेही आवश्यक आहे. ते त्वरित शक्य नसले, तरी संबंधितांनी त्यांच्या संशोधन कार्यात उपासनेची थोडी जोड जरी दिली, तरी त्यांना अन्य अनेक प्रश्‍नांची उकल अल्प वेळेत शक्य होऊ शकते. साधनेच्या, उपासनेच्या या भागाचाही विचार व्हावा, हीच अपेक्षा !


Multi Language |Offline reading | PDF