वाराणसीमध्ये पार पडलेल्या ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’तील धर्मसेवेत धर्मप्रेमींचा प्रेरणादायी सहभाग आणि त्याद्वारे ‘पावलोपावली गुरुकृपाच कशी कार्य करते ?’, याची आलेली अनुभूती

पू. नीलेश सिंगबाळ

‘२१ ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आयोजित केलेल्या उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनामध्ये ११ राज्यांतील ६७ हिंदू संघटना आणि ५० धर्मनिष्ठ अधिवक्ते मिळून एकूण १६७ धर्मनिष्ठांनी सहभाग घेतला. हे आयोजन म्हणजे ना केवळ एक कार्यक्रम होता; परंतु ‘पावलोपावली गुरुकृपाच कशी कार्य करते ?’, याची सर्व साधकांनी घेतलेली अनुभूतीच होती. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अवतारी कार्याचीच ही एक किमया होती, ज्यामध्ये आम्हा सर्व साधकांना सहभागी होण्याची अमूल्य संधी लाभली. हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजे कालमहिम्यानुसार धर्मसंस्थापनेच्या कार्यामध्ये काही धर्मप्रेमींनीही दैवी प्रेरणेमुळे आपले योगदान दिले. ‘ते या अधिवेशनातील सेवेत कशा प्रकारे सहभागी झाले ?’, याविषयी कृतज्ञतापूर्वक हे लिखाण करत आहे.

१. श्री. अनिल कुमार मौर्य

१ अ. हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवड आणि हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांची सखोल माहिती असणे

श्री. अनिल कुमार मौर्य वाराणसीमध्ये ‘श्री साईं टेंट’ या आस्थापनाचे मालक आहेत. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या मागील दोन कार्यक्रमांपासून ते सहकार्य करत आहेत. अधिवेशनाचे स्वरूप, तसेच ‘यात उत्तर आणि पूर्वोत्तर भारतातून येणारे हिंदुत्वनिष्ठही सहभागी होणार आहेत’, हे समजल्यानंतर त्यांना पुष्कळ चांगले वाटले. त्यांच्याशी बोलतांना लक्षात आले, ‘त्यांना हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवड आहे, तसेच ‘वर्तमानकाळात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि त्यांना दडपून टाकण्याचे तंत्र अन् त्याविषयीचा इतिहास’ यांची त्यांना चांगलीच माहिती आहे.

१ आ. धर्मसेवेतील सक्रीय सहभाग

त्यांनी पाच दिवस चाळीस पटल (टेबल), कमानीसाठी लागणारे पाईप, आसंद्या आणि भोजन बनवण्याचा कक्ष सिद्ध करण्यासाठी तंबूचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. भेटीच्या वेळी असे लक्षात आले की, त्यांच्या गावातील मंदिराच्या स्थापनेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी मंदिरातील प्रसादासाठी सर्व साधकांना आमंत्रित केले होते.

२. फ्लेक्स प्रदर्शन लावण्यासाठी लागणार्‍या लोखंडी चौकटी (फ्रेम) उपलब्ध करून देणारे श्री. राजू कुमार मौर्य !

काही मासांपूर्वी श्री. राजू कुमार मौर्य यांच्याशी प्रथमच संपर्क झाला. त्यांनी साधनेविषयी जिज्ञासेने जाणून घेतले आणि सनातन हिंदु धर्माच्या कार्यात विनामूल्य सेवा करण्याची इच्छाही व्यक्त केली. ते साधकांना आपल्या घरी घेऊन गेले. ते आता अशा प्रकारे जोडले गेले आहेत की, फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यासाठी लागणारी लोखंडी चौकट (फ्रेम) बनवण्याची कधीही आवश्यकता भासते, तेव्हा ती ते उपलब्ध करून देतात. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. त्या वेळी त्यांचा विनम्र स्वभाव आणि आत्मीयता लक्षात आली.

३. अधिवेशनासाठी पाण्याची व्यवस्था करणारे आणि स्वतःच्या अनुपस्थितीत आईला सेवेत सहभागी करून घेणारे श्री. सहादूर पटेल !

अधिवेशनाच्या पूर्वसिद्धतेसह पाच दिवसांसाठी जेव्हा पिण्याच्या पाण्याची (‘मिनरल वॉॅटर’ची) व्यवस्था करण्याच्या हेतूने त्यांना संपर्क केला, तेव्हा त्यांनी ही सेवा आनंदाने स्वीकारली आणि कार्यस्थळी स्वतःहून पाणी पोचवण्याची इच्छा व्यक्त केली. अधिवेशनाच्या काळात, जेव्हा पाण्याची आवश्यकता भासायची, तेव्हा ते साधकांना आपल्या घरी बोलावून पाण्याची व्यवस्था करायचे. त्यांनी स्वतःच्या अनुपस्थितीत आपल्या आईला याविषयी सांगून ठेवल्याने त्यांच्या आईसुद्धा या सेवेत सहभागी होत होत्या. त्यांच्यातील नम्रता, दुसर्‍यांचा विचार करणे, उत्साह आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ हे गुण लक्षात आले.

४. अधिवेशनासाठी सभागृह आणि निवासासाठी वातानुकूलित खोल्या उपलब्ध करून देणारे अन् ‘ही सेवा मी नेहमी करीन’, असे सांगणारे श्री. अरुणकुमार गुप्ता !

श्री. अरुणकुमार गुप्ता वृत्तीने धार्मिक असून वाराणसीमधील आशापूर भागातील ‘अर्चना गार्डन मॅरेज लॉन’चे मालक आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात होणार्‍या कार्यक्रमांसाठी लॉन, सभागृह (हॉल) आणि ७ मोठ्या वातानुकूलित खोल्या आहेत. मागील वर्षी राज्यस्तरीय अधिवेशनासाठी त्यांनी संपूर्ण सुविधांसहित आणि विनामूल्य लॉन आपल्याला उपलब्ध करून दिले होते. या वेळी अधिवेशनासाठी सभागृह आणि निवासासाठी सर्व खोल्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. साधकांचे आचरण, स्वच्छता आणि कार्यक्रमाचे संचालन पाहून ते पुष्कळ प्रसन्न झाले. त्यांच्या सहकार्याविषयी राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनात जेव्हा आभार मानण्यात आले, तेव्हा ते व्यासपिठावरून म्हणाले, ‘‘या कार्यक्रमांना नेहमीच माझे प्रथम प्राधान्य असेल. मी ही सेवा सतत करत राहीन.’ या वेळीसुद्धा अधिवेशनामध्ये त्यांनी संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या निवासासाठी सर्व खोल्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. त्यांची सद्गुुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी प्रथम भेट झाली. तेव्हा ते एवढे भावविभोर झाले होते की, त्यांच्या तोंडवळ्यावरून त्यांचा भाव व्यक्त होत होता. प्रतिदिन पूजा-पाठ करणे इत्यादी त्यांची वैयक्तिक साधना नियमितपणे चालू असते.

५. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती ऐकल्यावर प्रभावित होऊन स्वतःच्या ‘मॅरेज लॉन’च्या खोल्या विनामूल्य उपलब्ध करून देणारे श्री. श्याम धनी यादव !

श्री. श्याम धनी यादव हे वाराणसीतील ‘रंगोली गार्डन मॅरेज लॉन’चे मालक आहेत. त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य सविस्तर समजून घेतले आणि प्रभावित होऊन ‘मॅरेज लॉन’च्या ६ खोल्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. ते मागील काही वर्षांपासून गुरुपौणिर्र्मेच्या स्मरणिकेसाठी अर्पण देतात. ४ – ५ वर्षांपूर्वी त्यांना एका साधकाकडून कुलदेवतेच्या नामजपाविषयी समजले. तेव्हापासून ते प्रतिदिन ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा जप करत आहेत.

६. हिंदु धर्माच्या सद्यःस्थितीविषयी जागरूक असणारे श्री. सदन गोपाल मिश्र !

६ अ. हिंदु समाजाने संघटित होण्याची आवश्यकता पोटतिडकीने व्यक्त करणे : श्री. सदन गोपाल मिश्र सारनाथ या भागात असलेल्या ‘ऋषिपत्तन गेस्ट हाऊस’चे मालक आहेत. समितीचे कार्य समजल्यावर ते पुष्कळ प्रभावित झाले आणि त्यांनी ‘गेस्ट हाऊस’च्या खोल्या विनामूल्य दिल्या. लहानपणापासूनच त्यांनी संघाचे प्रचारक आणि नंतर पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य केले आहे. सद्यःस्थितीत हिंदु धर्मावर होत असलेल्या आघातांविषयी त्यांचा चांगला अभ्यास आहे. ते हिंदुत्वाच्या विचारधारेचे प्रबळ समर्थक आहेत आणि प्रभावी वक्तेही आहेत. अधिवेशनात आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘हिंदू आता जर जागृत झाले नाहीत, तर अन्य धर्मियांकडून त्यांचा नाश (मृत्यू) होणे निश्‍चित असून जगभर अशीच परिस्थिती आहे.

या कार्यामध्ये माझे थोडेतरी सहकार्य झाले, तर मी स्वतःला सौभाग्यशाली समजेन. हिंदूंनी प्राचीन आणि वर्तमान इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे ! त्यांनी संघटित होऊन अन्य धर्मियांच्या दडपशाहीच्या नीतीविरुद्ध संघटित झाले पाहिजे. मला आर्थिक कमाई झाली नाही, तरी चालेल; परंतु मी अन्य धर्मियांना ‘गेस्ट हाऊस’च्या खोल्या देत नाही.’’

६ आ. खोल्यांचे आरक्षण करतांना झालेली स्वतःची चूक नम्रपणे स्वीकारून स्वखर्चाने अन्यत्र व्यवस्था करून देणे

त्यांनी आम्हाला ज्या तारखांसाठी खोल्या दिल्या होत्या, त्यातील मधल्या एका तारखेचे आरक्षण (बुकिंग) दोन मासांपूर्वीच अन्य कोणी तरी केले होते. आमच्या खोल्यांचे आरक्षण करतांना त्यांना याविषयी माहिती नसल्यामुळे त्यांनी एक दिवसासाठी स्वखर्चाने आम्हाला अन्य ठिकाणच्या ६ खोल्या मिळवून दिल्या आणि आपली चूक अत्यंत नम्रतापूर्वक स्वीकारत एक दिवस ही व्यवस्था स्वीकारण्यासाठी सांगितले. आयत्या वेळी अन्य एका ‘गेस्ट हाऊस’मध्येसुद्धा समितीच्या कार्यकर्त्यांसाठी खोल्या स्वतः व्यय करून आरक्षित केल्या. त्यांच्यामध्ये असलेले शिष्टाचार, नम्रता आणि सेवेतील समर्पणभाव हे गुण लक्षात आले. जेव्हा त्यांना समजले की, अधिवेशनाचे कार्यस्थळ मिळण्यात काही अडचण निर्माण झाली आहे, तेव्हा त्यांनी स्वतः भ्रमणभाष करून ‘दुसरे स्थळ कसे उपलब्ध होईल ?’, याविषयी वेळोवेळी आम्हाला सुचवले.

७. ईश्‍वरावर दृढ श्रद्धा असलेले आणि अधिवेशनात उपस्थित असलेल्या संतांना भेट स्वरूपात मिठाई देणारे श्री. वीरू मौर्य !

श्री. वीरू मौर्य यांचा आशापुर, वाराणसी येथे ‘वीरू स्वीट्स’ हा मिठाईचा व्यवसाय आहे. अधिवेशनामध्ये उपस्थित संतांना भेटस्वरूप मिठाई देण्याविषयी त्यांना विचारल्यावर त्यांनी ते सहर्ष स्वीकारले.

त्यांचा संतांप्रती भाव असल्याने ‘चांदीचा वर्ख लावलेली मिठाई संतांना वर्जित असते’, हे लक्षात ठेवून त्यांनी वर्ख नसलेली मिठाई आम्हाला दिली.’ त्यांनी त्यांचा घनिष्ठ मित्र श्री. जुगल किशोर पोद्दार यांनासुद्धा या धर्मकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांच्याशी आमचा परिचय करून दिला. ते स्वतः आपल्या गुरूंनी सांगितल्यानुसार साधना करतात. ईश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि इतरांना साहाय्य करणे, हे त्यांचे गुण लक्षात आले.

८. ‘साधना शिबिरा’त सहभागी होणारे श्री. जुगल किशोर पोद्दार !

श्री. जुगल किशोर पोद्दार एक व्यावसायिक असून त्यांनीही या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. ते अधिवेशनातील ‘साधना शिबिरा’त सहभागी झाले. त्यांनी सर्वांसाठी विनामूल्य मिठाईचीही व्यवस्था केली. नंतर ते वाराणसी सेवाकेंद्रातही आले होते. स्वखर्चाने प्रवचने आयोजित करणे, भंडारा करणे इत्यादी धर्मसेवासुद्धा ते करतात. त्यांनी त्यांच्या घरी प्रवचनाचे आयोजन करण्यास सांगितले आहे.

९. अधिवेशनाच्या सेवेशी एकरूप होणारे आणि आवश्यक ते साहित्य स्वतः आणून देणारे श्री. शरद श्रीवास्तव !

श्री. शरद श्रीवास्तव वाराणसीतील ‘शरद टेंट’चे मालक आहेत. ते ‘हिंदू युवा वाहिनी’ या हिंदु संघटनेशी जोडलेले आहेत. हिंदु धर्माच्या कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी अधिवेशन सेवेत दायित्व घेऊन सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी अधिवेशनासाठी लागणारे साहित्य अत्यल्प दराने उपलब्ध करून दिले आणि काही साहित्य स्वखर्चाने अन्य ठिकाणाहून उपलब्ध करून दिले. त्यांनी सर्व गोष्टी आत्मीयतेने जाणून घेतल्या आणि ‘भोजन वाढणे आणि भोजनाची ताटे धुणे, यांसाठी स्वतःकडील ३ कर्मचारी पाठवून देतो’, असे सांगितले. ‘ते अधिवेशनाच्या सेवेशी एकरूप झाले आहेत’, असे लक्षात आले. त्यांनी सांगितले, ‘‘मी आजपर्यंत लोकांना साहाय्य केले आणि पुष्कळ हानीही पत्करली; परंतु माझी ईश्‍वरावर पुष्कळ श्रद्धा आहे. ‘मी केवळ निमित्तमात्र असून ईश्‍वरच कर्ता आहे.’ या विचाराने मी हिंदु धर्माच्या कार्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतो.’’ त्यांनी साधना समजून घेण्याची जिज्ञासा दाखवली. त्यांच्या घरी त्यांची ९० वर्षांची आजी असून त्या अखंड नामजप करतात. त्यांच्या परिवाराच्या वतीने घराजवळ असणार्‍या आश्रमात धार्मिक कार्यक्रम, प्रवचन आणि भंडारा प्रतिवर्षी आयोजित केला जातो.

१०. भोजन आणि अल्पाहार यांची व्यवस्था दायित्व घेऊन करतांना आचारी लोकांमध्येही अधिवेशनाप्रती भाव निर्माण करणारे श्री. रवीशंकर झुनझुनवाला !

श्री. रवीशंकर झुनझुनवाला हे ‘श्री अन्नपूर्णा’ या आस्थापनाचे संचालक आहेत. वर्ष २००८ पासून ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आहेत. वर्ष २०१६ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित झालेे. ते समितीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत भोजन आणि अल्पाहार यांची व्यवस्था करणे, तसेच त्यांच्याद्वारे चालवल्या जाणार्‍या वाराणसी येथील ‘श्री राणी सती माता मंदिरा’तील खोल्या उपलब्ध करणे इत्यादी माध्यमातून सहकार्य करतात. त्यांना अधिवेशनाची व्याप्ती सांगितल्यावर त्यांनी पूर्वसिद्धतेसह सकाळपासून रात्रीपर्यंतचे अल्पाहार आणि भोजन-व्यवस्थेचे दायित्व स्वतःकडे घेतलेे. यासाठी लागणारी सर्व सामग्री, भाज्या, भांडी, तसेच आचारी यांची संपूर्ण व्यवस्था स्वतः लक्ष घालून आणि दायित्व घेऊन केली. त्यांनी आचारी आणि त्यांचे साहाय्यकही चांगले निवडले अन् त्यांच्यात अधिवेशनाप्रती ‘हा सामान्य कार्यक्रम नसून हे दैवी कार्य आहे’, असा भाव निर्माण केला. ‘जणू काही स्वतःच्या घरचा कार्यक्रम आहे’, अशा पद्धतीने त्यांनी पुढाकार घेतला. तेे सतत भावावस्थेत असतात आणि सर्व कर्तेपणा ईश्‍वराला देतात.

११. अधिवेशनात चित्रीकरणासाठी वाजवी मूल्यात साहित्य उपलब्ध करून देणारे श्री. घनश्याम जायसवाल !

श्री. घनश्याम जायसवाल यांचा चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. समितीचे कार्य समजल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या आईंनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन उत्स्फूर्ततेने दिले. अधिवेशनाच्या वेळी अन्य कार्यक्रमांमध्ये त्यांची चित्रीकरणाची उपकरणे व्यस्त होती. त्या वेळी त्यांनी अन्य व्यक्तीकडून आवश्यक त्या प्रकारचा चित्रीकरणाचा एक छायाचित्रक (कॅमेरा) आणि अन्य सामग्री वाजवी मूल्यात उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे अन्य आधुनिक उपकरणे विनामूल्य उपलब्ध करून दिली.

१२. वाजवी मूल्यात विद्युत् व्यवस्था आणि ध्वनीयंत्रणा करून देणारे श्री. राजू कुमार !

श्री. राजू कुमार यांचा विद्युत् व्यवस्था आणि ध्वनीयंत्रणा यांचा व्यवसाय आहे. अधिवेशनासाठी त्यांनी वाजवी मूल्यात ही व्यवस्था करून दिली. कार्यक्रम पाहिल्यावर ते म्हणाले, ‘‘हा कार्यक्रम वाराणसीमध्ये होत नसून अन्य कोणत्या तरी स्थानी होत आहे.’’ त्यांना शांतीची अनुभूतीही आली.

१३. धनबाद, झारखंड येथील सिंह परिवाराचे योगदान !

झारखंडमधील सर्वश्री नागेद्र सिंह, अनिल कुमार सिंह आणि रोहित सिंह हे एकाच परिवारातील सदस्य असून ते धर्मप्रेमी आहेत. त्यांनी पूर्वसिद्धतेसह अधिवेशनाच्या कालावधीत लागणार्‍या दुधाचा व्यय स्वतः करून धर्मसेवेत सहभाग घेतला.

हे सर्व केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच शक्य झाले. यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, वाराणसी (२०.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF