ज्या देशात गोहत्या होते, तेथे पाऊस पडत नाही ! – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुणे

पंढरपूर येथे ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’च्या राज्यव्यापी महाअधिवेशनात हिंदुहिताचे विविध ठराव संमत

ह.भ.प. मारुति महाराज तुनतुणे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १३ जुलै (वार्ता.) – श्री विठ्ठल १२ कोटी ९० लाख ६० वर्षे विटेवर उभा आहे, हे हिंदूंना ज्ञात असायला हवे. आपण संघटित नसल्याने वारकरी संप्रदायावरही आघात होत आहेत. ज्या देशात गोहत्या होते, तेथे पाऊस पडत नाही. देशात लहान मोठी पशूवधगृहे निर्माण होण्यासाठी काँग्रेसने साहाय्य केले, असे प्रतिपादन ह.भ.प. मारुति महाराज तुनतुणे यांनी केले. ते येथील मार्केट यार्ड येथे झालेल्या ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’च्या वतीने राज्यव्यापी वारकरी महाअधिवेशनात बोलत होते. अधिवेशनाचे सूत्रसंचालन अरुण महाराज पिंपळे यांनी केले.

या वेळी ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी अधिवेशनातील हिंदुहितांच्या ठरावांचे वाचन केले. उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हर हर महादेव’च्या जयघोषात ठरावांना अनुमोदन दिले.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पू. (ह.भ.प.) निवृत्ती वक्ते महाराज उपस्थित रहाणार होते; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे अध्यक्षपद ह.भ.प. मारुति महाराज तुनतणे यांनी भूषवले.

या वेळी ह.भ.प. भगवान महाराज गडदे म्हणाले, ‘‘मी राष्ट्रीय वारकरी अधिवेशनाला साहाय्य करीन.’’

श्री विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित व्हावे ! – अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

वारकरी महाअधिवेशनात व्यासपिठावर उपस्थित मान्यवर आणि बोलतांना अधिवक्ता संदीप अपसिंगेकर

१. हिंदु विधीज्ञ परिषदेने यापूर्वी माहिती अधिकाराचा वापर करून अनेक भ्रष्टाचार उघड केलेले आहेत, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला भ्रष्टाचारही समोर आणला आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या माध्यमातून हा लढा उभा करण्यात आला.

२. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केलेला घोटाळाही परिषदेने यापूर्वी समोर आणला आहे. त्यामुळे मंदिराचे सरकारीकरण रहित व्हायला हवे.

३. आषाढी वारीमध्ये वारकरी पुष्कळ लांबून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलाचे दर्शन घेणार्‍या वारकर्‍यांना प्रचंड धक्काबुक्की करत पुढे ढकलण्यात आले; मात्र याउलट ‘गणवेशातील पोलिसांनी वारकर्‍यांना विनाअडथळा दर्शन घेऊ दिले’, असा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. याविषयी हिंदु विधीज्ञ परिषद आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्याकडून वारीनंतर तक्रार प्रविष्ट केली जाणार आहे.

४. आषाढी वारी चालू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी पंढरपुरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम स्थानिक प्रशासनाने केले. या खड्ड्यांमध्ये खडी टाकली आहे. अनवाणी येणार्‍या वारकरी बांधवांच्या पायाला ही खडी टोचते.

५. ऐन वारीमध्ये मैलामिश्रित पाणी नदीमध्ये मिसळते, याविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्या; मात्र याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही स्थानिक प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. याविषयी वारकर्‍यांनी संघटित होऊन जाब विचारावा.

अधिवेशनाला उपस्थित मान्यवर

ह.भ.प. अण्णासाहेब बाचकर महाराज, ह.भ.प. संतोष पावसे, ह.भ.प. योगेश माऊली सुरळकर, ह.भ.प. अमृतानंद कांकरिया, ह.भ.प. एकनाथ महाराज पठाडे, ह.भ.प. कारभारी अंभोरे, ह.भ.प. भगवान महाराज पारे, ह.भ.प. गोविंद लवटे, ह.भ.प. अंकुश झिरपे, ह.भ.प. भागवत कुलाळ, ह.भ.प. बप्पासाहेब शिंदे, ह.भ.प. राजेंद्र बाबर, ह.भ.प. संजय काळे, ह.भ.प. सुनील झुंदरे, ह.भ.प. गणेश बांगर महाराज, ह.भ.प. अजिंक्य ढोकळे आदी उपस्थित होते.

अधिवक्ता संदीप अपसिंगेकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना ह.भ.प भगवान महाराज गडदे

अधिवेशनात संमत करण्यात आलेले काही ठराव

  • संत साहित्याचा शाळा आणि महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमात समावेश करावा.
  • श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील नित्योपचार पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनेच व्हावेत.
  • खासदार साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, स्वामी असिमानंद, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अन्य कार्यकर्ते यांच्यावरील आरोपांविषयी अन्वेषण यंत्रणांनी निःपक्षपणे तपास करावा आणि हे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावेत अन् त्यांना न्याय मिळावा.
  • वृत्तपत्रे, नाटके, चित्रपट, व्याख्याने, गीते यांद्वारे हिंदु धर्म, देवता, संत, गोमाता यांचे विडंबन, विनोद करणार्‍यांच्या विरोधात शासनाने कठोर कायदा करावा.
  • धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा.
  • अयोध्येत राममंदिर तात्काळ उभारण्यात यावे.
  • गायरान भूमींवरील अतिक्रमण हटवून त्या भूमी गोमातेसाठी संरक्षित करण्यात याव्यात.
  • संस्कृत शाळा चालू कराव्यात, तसेच संस्कृत भाषेत संगणक हाताळण्यासाठी आवश्यक तरतूदी कराव्यात. संस्कृत आणि मराठी भाषांना अधिक प्राधान्य द्यावे.

या अधिवेशनात हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक अध्यक्ष (अधिवक्ता) पू. सुरेश कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. (अधिवक्ता) पू. सुरेश कुलकर्णी यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांनी हा सन्मान स्वीकारला.


Multi Language |Offline reading | PDF