ईश्‍वरप्राप्तीसाठी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करा ! – भृगुनाडीवाचक सद्गुरु संजय अग्रवाल

डावीकडून सद्गुरु संजय अग्रवाल आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची माहिती सांगतांना डॉ. ज्योती काळे (मध्यभागी) अन् श्री. सम्राट देशपांडे

पुणे – प्रत्येक श्‍वास आणि क्षण अमूल्य आहे. तो वाया न घालवता साधनेसाठी द्या. देवाने आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी जन्म दिला आहे. आपल्या अंतरात्म्यातील ईश्‍वराचा सन्मान करा. स्वतःचा अनादर म्हणजे अंतरातील भगवंताचा अनादर आहे. ईश्‍वर हाच आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. गुरु आपल्या षट्चक्रांची शुद्धी करून साधनेला पोषक बनवतात. ईश्‍वर प्राप्तीसाठी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करा, असे मार्गदर्शन कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील भृगुनाडीवाचक सद्गुरु संजय अग्रवाल यांनी केले. ७ जुलै या दिवशी आयोजित सत्संग सोहळ्यात सद्गुरु संजय अग्रवाल बोलत होते.

सद्गुरु संजय अग्रवाल पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही काहीच होण्याचा प्रयत्न करू नका. त्याने तुम्ही अहंकारविरहित व्हाल. काही दान द्यायचे असेल, तर ते शांतीचे दान द्या. स्वतः शांत व्हा आणि इतरांना शांती द्या. आपले पितर, देव आणि समाज यांचे ऋण फेडण्यासाठी साधना करा.’’

या सत्संगात सकाळच्या सत्रात सद्गुरु संजय अग्रवाल यांनी उपस्थितांना साधनेविषयी, तर दुपारच्या सत्रात भृगुनाडीच्या माध्यमातून जिज्ञासूंना वैयक्तिक मार्गदर्शन केले, तसेच साधनाविषयक शंकांचे निरसनही केले. त्यांच्या पत्नी गुरुमा चंद्रिका अग्रवाल यांनीही भक्तांना मार्गदर्शन केले. गुरुपूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. सद्गुरु संजय अग्रवाल अमेरिकेतून ७२ शिष्यांना घेऊन भारतात आले आहेत. ते कैलास आणि मानस सरोवर यात्राही करणार आहेत.

या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. सम्राट देशपांडे आणि डॉ. ज्योती काळे यांनी सद्गुरु संजय अग्रवाल यांची भेट घेऊन विश्‍वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाविषयीची माहिती दिली. ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या दैवी प्रवासाविषयीही अवगत केले, तसेच ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेतील अडथळे दूर होऊन ते लवकरात लवकर स्थापन व्हावे’, यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. सद्गुरु संजय अग्रवाल यांनी कार्याचे कौतुक करून ‘आशीर्वाद आहेतच’, असे सांगितले. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु संजय अग्रवाल यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. या वेळी (निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक, तसेच शिष्यगण उपस्थित होते.

सद्गुरु संजय अग्रवाल यांचा परिचय

सद्गुरु संजय अग्रवाल यांनी कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे महर्षि भृगु आश्रमाची स्थापना केली आहे. गीता दिव्य क्रिया योगाच्या माध्यमातून ते योगिक साधनेविषयी मार्गदर्शन करतात. महर्षि भृगु दिव्य प्रकाश वाणीने त्यांच्याशी संवाद साधतात आणि महर्षींचा प्रसाद ते जिज्ञासू अन् भक्त यांना मार्गदर्शनाच्या रूपात देतात. पुणे येथील नाडीशास्त्राचे अभ्यासक (निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक यांनी ‘सद्गुरु संजय गुरुजी हे महाभारतकालीन संजय आहेत’, अशा शब्दांत त्यांची महती सांगितली.


Multi Language |Offline reading | PDF