इंडोनेशिया येथील साधकांना गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

साधकांना अखंड चैतन्यस्रोत पुरवणार्‍या, साधनेसाठी वरदानस्वरूप लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भृगु महर्षींच्या आज्ञेने हस्तस्पर्श केलेल्या पादुकांची भारतात आणि जगभरातील काही ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. १९.४.२०१९ या दिवशी इंडोनेशियातील जकार्ता येथील आश्रमात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी इंडोनेशियातील साधकांना पुष्कळ आनंद झाला आणि अनेक अनुभूतीही आल्या. त्या येथे देत आहोत.

पूजन आणि प्रतिष्ठापना केलेल्या गुरुपादुका

एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेंडी इकारान्तिओ यांना आलेल्या अनुभूती

पू. रेन्डी इकारांतियो

१. गुरुपादुका जकार्ता येथे पाठवून परात्पर गुरुदेव त्यांची प्रीती आणि चैतन्य यांचा लाभ साधकांना करून देत असल्याचे जाणवणे

‘गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या आदल्या रात्री केवळ ४ ते ५ घंटे झोप होऊनही त्या दिवशी सकाळपासून सेवा करतांना मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. माझ्या मनातील विचार अगदी अल्प झाले होते. गुरुपादुका पूजनाच्या वेळी आरती चालू झाल्यावर माझ्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव दाटून आला. ‘परात्पर गुरुदेवांच्या चैतन्याचा साधकांना लाभ होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती जलदगतीने व्हावी’, या साधकांप्रती असलेल्या प्रीतीमुळेच परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या पादुका जकार्ता येथील आश्रमात पाठवल्या आहेत’, असे मला वाटले.

२. गुरुपादुकांच्या आगमनानंतर प्रसारासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेसाठी नाव नोंदणी अकस्मात वाढणे

एप्रिल मासाच्या अखेरच्या आठवड्यात आम्ही बाली येथे प्रसार करण्याचे नियोजन केले होते. त्या दृष्टीने एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी अनेक जण कार्यशाळेला उपस्थित रहाण्यास इच्छुक होते; मात्र केवळ ३ जणांनी येण्याचे निश्‍चित करून त्याप्रमाणे नोंद केली होती. गुरुपादुका पूजनाच्या दुसर्‍याच दिवशी १४ जणांनी नवीन नोंदणी केली आणि त्यांच्यापैकी ७ जणांनी त्यांच्या निवासाचे शुल्कही भरले. यापूर्वीच्या कुठल्याच कार्यशाळेच्या वेळी असे घडले नव्हते. यातून या गुरुपादुकांतील चैतन्यामुळे प्रसार होत असून परात्पर गुरुदेवांनी आम्हाला पुढील प्रसार वाढवण्यासाठी चैतन्य आणि शक्ती दिल्याचे माझ्या लक्षात आले.’

– (पू.) रेंडी इकारान्तिओ, जकार्ता, इंडोनेशिया (२७.४.२०१९)

१. श्री. हर्स

गुरुपादुका पूजनाच्या वेळी ‘गुरुपादुका’ आणि ‘श्री’ यंत्र यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे : ‘जकार्ता आश्रमात गुरुपादुकांची विधिवत् पूजा चालू असतांना ‘गुरुपादुका’ आणि ‘श्री’ यंत्र यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ कमळावर नृत्य करत असल्याचे दृष्य दिसले. मंत्रांचे पठण चालू असतांना मला आनंददायी स्पंदने जाणवली. बर्‍याच दिवसांपूर्वी माझ्या डाव्या तळहातावर एक फोड आला होता; परंतु गुरुपादुका पूजनाच्या सोहळ्यानंतर तो अकस्मात नाहीसा झाला. या अनुभूतीसाठी मी श्री महालक्ष्मी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

२. सौ. गंगपुत्री

आरती चालू असतांना भाव जागृत होऊन परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणेे : ‘आम्ही सर्वजण ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना’ सोहळ्याची आतुरतेने वाट पहात होतो. जरी आम्ही तो सोहळा चलत्चित्राद्वारे (‘व्हिडिओ कॉल’द्वारे) पहाणार होतो, तरी तो सोहळा पहाण्यासाठी आम्ही फार उत्साही होतो. चलत्चित्राच्या माध्यमातून गुरुपादुका सोहळा पहाणे शक्य झाल्याने मला कृतज्ञता वाटत होती. आरती चालू असतांना मी मनात परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करत होते. तेव्हा मला ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवांनी पादुका धारण केल्या आहेत आणि पू. रेंडीदादा यांच्यासह सर्व साधक त्यांची पूजा आणि आरती करत आहेत’, असे वाटले. तेव्हा अकस्मात माझा भाव जागृत झाला. ‘परात्पर गुरुदेव स्मित हास्य करत येथील सर्व साधकांवर त्यांची प्रीती प्रक्षेपित करत आहेत आणि त्यांचे चैतन्यमय कृपाशीर्वाद आम्हा साधकांना लाभत आहेत’, असे मला वाटले. इंडोनेशिया येथील या ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना आणि पूजन’ सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याचे संचालन करणार्‍या साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी आम्हाला चलत्चित्राद्वारे या सोहळ्यामध्ये सहभागी करून घेतले आणि गुरुपादुकांच्या चैतन्याचा लाभ करून दिला, यासाठी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता !

‘हे गुरुदेव, आमच्याकडे गुरुचरणी अर्पण करण्यासारखे काहीच नाही. केवळ तुमच्या कोमल चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त करून पूर्ण शरणागत झाले आहे. परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

३. श्री. अर्तमा

३ अ. गुरुपादुका जकार्ता येथे आल्या, तेव्हा त्या झाकलेल्या असूनही त्यांच्याकडे पाहून पुष्कळ भाव जागृत होणे : ‘रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा गुरुपादुका-धारण विधी आणि गुरुपादुका-पूजन सोहळा मी संगणकीय प्रणालीद्वारे पाहिला होता; परंतु आज त्या गुरुपादुका प्रत्यक्ष इंडोनेशियात आल्या आहेत. त्यामुळे आज मला पुष्कळ आनंद झाला आहे. गुरुपादुका इंडोनेशियातील जकार्ता आश्रमात आल्या, तेव्हा त्या झाकलेल्या होत्या. मी गुरुपादुकांसमोरच बसून नामजप केला. तेव्हा माझा भाव जागृत झाला. त्या वेळी मला एक फुलांचा हार दिसला आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या चित्रात दाखवलेल्या ऋषींप्रमाणे एक ऋषि दिसले. भारतातील पारंपरिक संगीताचे शांत स्वर मला ऐकू येत होते. ही अतिशय आनंददायक अनुभूती मी अजूनही विसरलो नाही.

३ आ. गुरुपादुका पूजनाच्या वेळी पू. रेंडीदादांनी संस्कृत मंत्रोच्चार केल्यावर पुष्कळ भावजागृती होणे : पू. रेंडीदादा (‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत पू. रेंडी इकारान्तिओ) यांनी गुरुपादुका आश्रमात आणण्यासाठी त्या हातात घेतल्या होत्या. गुरुपादुका झाकलेल्या असूनही मी अजूनही तोच आनंद आणि भाव अनुभवत होतो. गुरुपादुका आश्रमाच्या प्रवेशद्वारापासून सोहळ्याच्या ठिकाणी आणेपर्यंत मी भावाच्या स्थितीतच होतो. पू. रेंडीदादांनी संस्कृत भाषेतील मंत्रोच्चार केल्यावर माझा भाव जागृत होऊन डोळे भरून आले. मंत्रोच्चार ऐकतांना मला आनंद जाणवत होता.

पूजा झाल्यानंतर आम्ही सामूहिक नामजप केला. त्यानंतर बराच वेळ मी निर्विचार स्थितीत होतो. सोहळा संपल्यावर मी घरी परत जात असतांना पाऊस पडत होता. पाऊस पडणे पुष्कळच आश्‍चर्यजनक होते. तेव्हा देवाने गुुरुपादुका पूजन सोहळ्याला आशीर्वाद दिल्याचे मला जाणवले. या अनुभूतींसाठी मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

४. श्री. फ्रान्सिस्कस

४ अ. गुरुपादुका पूजनाच्या सेवेची सिद्धता करण्यासाठी पुष्कळ आतुर होणे : ‘इंडोनेशियातील आश्रमाकडे जातांना मला पूर्वीपेक्षा पुष्कळ शांत वाटत होते. मला येणार्‍या प्रतिक्रियांचे प्रमाण उणावले होते. जकार्ता येथील आश्रमात प्रवेश केल्यानंतर गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या सिद्धतेत सहभागी होेण्यास मी आतुर झालो होतो.

४ आ. परात्पर गुरुदेवांसह श्री महालक्ष्मी येणार असल्याने त्या दोघांच्या स्वागताच्या सिद्धतेची सेवा करत असल्याचा भाव ठेवणे : प्रवेशद्वार सजवण्यासाठी शिडीवर चढतांना शिडी तेवढी बळकट नसल्यामुळे मला जराशी भीती वाटली. तेव्हा ‘आपले स्वभावदोष दूर करण्यासाठी परात्पर गुरुदेव आपल्याला सेवा देत असतात’, याची मला जाणीव झाली. उंचावर चढण्याविषयी मला वाटणारी भीती दूर करण्यासाठी हा प्रसंग असल्याचे माझ्या लक्षात आले. पादुका-पूजनाची जागा सजवतांना ‘परात्पर गुरुदेवांसह श्री महालक्ष्मी येणार आहे आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मी ही सेवा करत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला.

४ इ. प्रार्थना म्हणतांना प्रार्थनेचे शब्द मुखातून सहजतेने बाहेर पडणे आणि नंतर केलेल्या सामूहिक नामजपाने मनाला स्थिरता जाणवणे : पूजेच्या वेळी माझी भावजागृती झाली. मला पुष्कळ शांत, कृतज्ञ आणि उत्साही वाटत होते. कार्यक्रमाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला प्रार्थना म्हणण्याची संधी मिळाली. प्रार्थनेचे शब्द सहजतेने माझ्या मुखातून बाहेर पडत होते. त्यानंतर आम्ही सामूहिक नामजप केला. त्या वेळी काही वेळ माझ्या मनाला स्थिरता जाणवत होती. या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी दिल्यासाठी पुष्कळ कृतज्ञ आहेे.’

क्षणचित्र : ‘गुरुपादुका पूजनाच्या वेळी रिमझिम पाऊस पडत होता.’


Multi Language |Offline reading | PDF