पराजयाचा जल्लोष रोखा !

संपादकीय

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला. खरेतर भारतासाठी ही खेदाची किंवा दुःखद घटना असायला हवी; परंतु ‘या पराभवाचा जल्लोष केला जात आहे’, हे समजल्यावर राष्ट्रनिष्ठ नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. ‘पराभवाचा आनंद साजरा करणारे हे नक्की आहेत तरी कोण ?’, या प्रश्‍नाचे उत्तर भारतियांनाही ठाऊक आहे. ते दुसरे तिसरे कोणी नसून केवळ आणि केवळ धर्मांधच आहेत. ते धर्मांध संवेदनशील असणार्‍या काश्मीर खोर्‍यातील आहेत, जे नेहमीच धुमसत असते. या धर्मांधांनी भारताच्या पराभवामुळे मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. नेहमीप्रमाणे भारतविरोधी अन् पाकच्या समर्थनार्थ घोषणा देऊन राष्ट्रद्रोहाचा कंड शमवला. एवढेच करून ते थांबले नाही, तर त्यांनी तेथील सुरक्षादलांशी वाद घातला. सुरक्षादलांकडून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न झाल्यावर भारतद्वेषाचे भूत डोक्यावर बसलेल्या धर्मांधांनी सैनिकांवर थेट दगडफेक करण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. अर्थात सैन्यदलांवरील ही दगडफेक आता नित्याचीच झाली आहे. ‘इंग्लंडसमवेतच्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानेच गुणतालिकेनुसार पाकचा संघ विश्‍वचषकातून बाहेर पडला’, या दुःखाचे प्रत्युत्तर धर्मांधांनी दगडफेकीतून दिलेे, हे मात्र निश्‍चित ! खरेतर खेळाकडे खिलाडूवृत्तीनेच पहायला हवे; पण धर्मांधांच्या दृष्टीने या वृत्तीची जागा द्वेषाने घेतलेली असल्याने भारतीय संघाच्या पराभवाचा आनंद त्यांच्याकडून साजरा होतांना दिसतो. याही आधी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजसमवेत भारत हरल्यावर श्रीनगरच्या देशद्रोही युवकांनी फटाके फोडले होते. ज्यांच्या नसानसांतच भारतद्वेष भरलेला आहे, त्यांना खरेतर भारतात रहाण्याचा अधिकारच नाही. जम्मू-काश्मीर काय किंवा श्रीनगर काय, येथील देशद्रोह्यांना भारतातून हाकलूनच लावायला हवे. ज्या देशात आपण रहातो, त्या देशाच्या सुख-दुःखाशी समरस होणे, हे खरे नागरिकत्व असते; पण या धर्मांधांच्या लेखी त्यास शून्य किंमत असते, हेच खरे ! काही मासांपूर्वी सैन्याने आतंकवाद्यांची सूची सरकारला दिली होती. प्रतिदिन तेथे आतंकवाद्यांना ठार केले जात आहे, असे मानले, तर सूचीत दिल्याप्रमाणे तेथील आतंकवादी नष्ट होऊन खरेतर काश्मीर आतंकवादमुक्त व्हायला हवे होते; पण ते अद्याप झालेले दिसत नाही. दिवसेंदिवस ही समस्या अधिकच जटील आणि संवेदनशील होत आहे.

देशद्रोहाचे मूळ कोण ?

‘काश्मीरमधील लढाई म्हणजे कोणताही वेगळा संघर्ष नसून संपूर्ण मुसलमान समुदायासाठी तो जिहादचाच एक भाग आहे’, असे विधान ओसामा बिन लादेनची आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’चा आताचा म्होरक्या अल् जवाहिरी याने नुकतेच केले असल्याचे एका ‘व्हिडिओ’तून समोर आले आहे. ‘काश्मीरला विसरू नका’, असेही त्याने म्हटले आहे. या विधानाकडे दुर्लक्षून चालणार नाही. काश्मीरमधील ही सर्व नाजूक आणि द्वेषमूलक परिस्थिती पहाता देशद्रोहाचे मूळ शोधणे आवश्यक आहे. याचे मूळ म्हणजे तेथील फुटीरतावादी नेते ! भारत सामना हरला, याचा आनंद धर्मांधांपेक्षाही दुपटीने जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना झाला असेल, हे वेगळे सांगायला नको. फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, मीरवाईज उमर फारूख, मुफ्ती महंमद सईद हे नेते म्हणजे देशाच्या भूमीला भार आहेत. मुफ्तीबाईंच्या मनातील भारतद्वेष तर प्रतिदिनच त्या अकलेचे तारे तोडून सर्वांसमोर उघड करत आहेत. या नेत्यांपासूनच आणि त्यांची कीड वळवळू देणार्‍या धर्मांधांपासूनच काश्मीरला खरा धोका आहे. हेच नेते धर्मांधांना पाठीशी घालतात. देशातील एकूण ३६ राज्यांपैकी काश्मीरमध्येच सर्वाधिक हिंसाचार घडवला जात असल्याने संपूर्ण भारतासाठी या प्रांतातील हिंसाचार म्हणजे लागलेले एक गालबोटच आहे. या हिंसाचाराला एव्हाना पूर्णविराम मिळायला हवा होता; पण तसे झालेले नाही. देशद्रोही फुटीरतावाद्यांच्या दबावाला बळी पडत असल्याने त्याची परिणती शेवटी फटाके फोडणे आणि दगडफेक करणे यांत होते. खरेतर अशांच्या मनात असलेली ‘आम्ही भारतात रहातो, म्हणजे तुमच्यावर उपकारच करतो’, ही उद्दाम भावना नष्ट करायला हवी. काहीतरी खुसपट काढून गोंधळ आणि हिंसाचार घडवायचा, हे फुटीरतावाद्यांचे धोरण हाणून पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. मूठभर धर्मांध आणि फुटीरतावादी यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. या सर्वांच्या अमर्याद अशा प्रभावाखाली काश्मिरी हिंदू भरडले जात आहेत. काश्मिरी हिंदूंना तर याआधीच तेथून हाकलले गेले आहे. आता तेथे केवळ ०.०१ टक्काच काश्मिरी हिंदू शेष आहेत. धर्मांधांच्या वाढत्या उन्मादापासून त्यांना वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे.

उन्मादाला प्रत्युत्तर

कित्येक दशकांपासून केल्या जाणार्‍या अनेक मागण्यांपैकी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवणे, ही एक मागणी आहे. सद्यःस्थिती पहाता या मागणीची पूर्तता तातडीने व्हायला हवी. तसे झाल्यासच भारताची स्वतंत्रता आणि अखंडता अबाधित राहील. आतापर्यंत काश्मीरप्रश्‍नी हिंदूंचा विश्‍वासघातच झालेला आहे. आता मात्र ती वेळ येणार नाही, अशी अपेक्षा आहे. काश्मीरमधील हिंसाचाराची धुमसती आग विझण्यासाठी भारतातील जनतेनेच पुढाकार घ्यायला हवा. काश्मीर खोर्‍यातील धर्मांधांचा आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या फुटीरतावाद्यांचा सरकारने बंदोबस्त करणे, हेच भारतीय संघाच्या पराजयाचा जल्लोष करणार्‍यांना प्रत्युत्तर ठरेल.


Multi Language |Offline reading | PDF