श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांचे पंढरपूर येथे आगमन

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविकांची पंढरपूरमध्ये मांदियाळी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ११ जुलै – आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक आले असून वारकर्‍यांच्या विठ्ठलनामाच्या गजराने पंढरपूर शहर भक्तीमय आणि विठ्ठलमय झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय महापूजेसाठी ११ जुलै या दिवशी पंढरपूर येथे आगमन झाले. सोलापूर येथे आल्यानंतर ते विद्यापीठ प्रशासकीय इमारत पायाभरणी, तसेच पत्रकार गृहनिर्माण संस्था पायाभरणी या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. १२ जुलैला एकादशीच्या पहाटे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहेत.

मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट यांसह संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून रांगेत राहून दर्शन घेत आहेत. दर्शनाची ही रांग गोपाळपूरच्याही पुढे गेली असून दर्शनासाठी २० ते २२ घंटे लागत आहेत. पंढरीकडे निघालेल्या संतांच्या सर्व पालख्या शहरात पोचल्या असून विठ्ठल दर्शनासाठी आतुरलेले भाविक भावपूर्ण दर्शनाने तृप्तीचा आनंद घेत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF