देवावरील असीम श्रद्धेच्या बळावर कष्टप्रद जीवन जगून मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा देणार्‍या सनातनच्या ९९ व्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे)!

१६ जुलै २०१९ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने…

‘१६.६.२०१९ हा दिवस लोटलीकर कुटुंबियांसाठी अतिशय आनंदाचा दिवस ठरला. या दिवशी श्रीमती विजया लोटलीकर (आजेसासूबाई) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी

१. प्रेमभाव

पू. आजी गावी एकट्या रहात असतांनाही त्यांच्या संसारात अवघे विश्‍व सामावलेले असायचे. त्यात त्यांचा एक कुत्रा, पाच-सहा मांजरी आणि अनेक वृक्ष यांचा समावेश आहे. पू. आजी फार उत्साही होत्या. त्या सर्व गोष्टी हिरीरीने करत असत. घरी कुणी आल्यास पू. आजी त्यांना काहीतरी खाऊ देत असत.

२. देवावर असीम श्रद्धा

देवावरील असीम श्रद्धेच्या बळावर पू. आजींनी प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. स्वतः कष्टप्रद जीवन जगूनही त्यांनी मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे लोटलीकर कुटुंबाची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती झाली.

सौ. आर्या लोटलीकर

३. ‘आता उरलो उपकारापुरता’, अशी पू. आजींची स्थिती असणे

पू. आजी आमच्याकडे रहायला आल्या. तेव्हा त्यांची शारीरिक स्थिती फारच खालावली होती. वयोमानापरत्वे नैसर्गिक विधींवर त्यांचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांचे कपडे पालटणे, कपडे धुणे अन्य स्वच्छता करणे, या सेवा सतत कराव्या लागतात. हे बघून ‘मला हे सर्व जमेल ना ?’ असा मला ताण आला होता. तेव्हा माझे यजमान मला म्हणाले, ‘‘आता तिचे प्रारब्ध संपले आहे. केवळ आपली सेवा आणि साधना व्हावी; म्हणून ती आपल्याकडे आली आहे.’’ ‘आता उरलो उपकारापुरता !’, अशी पू. आजींची स्थिती आहे.

४. स्मृतीभ्रंश झाला असूनही सत्काराच्या दिवशी व्यवस्थित वागणे

पू. आजींचा सत्कार करण्यासाठी आलेल्या पू. गडकरीकाकांना पू. आजी सारख्या विचारत होत्या, ‘‘मी योग्य करते ना ? असेच करायचे ना ?’ तेव्हा मला वाटले, ‘कालपर्यंत त्यांना काही कळत नव्हते; पण कार्यक्रमाच्या वेळी त्या एकदम सुस्थितीत असल्याप्रमाणे वागत होत्या.’ पू. गडकरीकाकांनी आजींनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या संत झाल्याचे घोषित केले. ‘प्रामाणिकपणे दिलेले काम सेवाभावाने केल्यास देव जवळ करतो’, हे पू. आजींच्या उदाहरणातून देवाने मला दाखवून दिले. पू. आजींना स्मृतीभ्रंश झाला आहे, तरी त्या ‘सत्काराच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांना जेवायला वाढा. ते भुकेले असतील’, असे आम्हाला सारख्या सांगत होत्या.

५. प्राणशक्ती अल्प असल्यामुळे एरव्ही अधिक वेळ बसू न शकणार्‍या पू. आजी सत्कार समारंभात पूर्णवेळ बसणे

प्राणशक्ती अल्प असल्याने पू. आजी अधिक वेळ बसू शकत नाहीत; परंतु सत्कार समारंभाच्या वेळी त्या पूर्णवेळ बसल्या होत्या. हे बघून ईश्‍वराचे चैतन्य कार्यरत असल्याची मला अनुभूती आली.

६. अनुभूती

या कार्यक्रमाच्या वेळी आम्हाला (मला आणि यजमानांना) सुगंधाची अनुभूती आली.

७. आजी संतपदी विराजमान होण्यासंदर्भात मिळालेली पूर्वसूचना !

‘आजी संत झाल्या आहेत’, असा विचार एकाच वेळी आमच्या (माझ्या आणि यजमानांच्या) मनात आला.

देवाने अशा आजी आम्हा लोटलीकर कुटुंबियांना दिल्या, यासाठी मी ईश्‍वर चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. आर्या लोटलीकर (नातसून), डोंबिवली, (जिल्हा ठाणे). (१९.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF