साधकांनो, वर्ष २०१९ मधील चातुर्मासात प्रतिकूल ग्रहमान असल्याने त्या कालावधीत गुरूंना अनन्यभावे शरण जाऊन साधना वाढवा आणि संधीकालाचा लाभ घ्या !

आषाढ शुक्ल पक्ष एकादशीला (१२ जुलै २०१९ या दिवशी) आरंभ होणार्‍या चातुर्मासाच्या निमित्ताने…

१. चातुर्मास म्हणजे काय ?

सौ. प्राजक्ता जोशी

‘आषाढ शुक्ल पक्ष एकादशी (देवशयनी एकादशी) ते कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (प्रबोधिनी एकादशी) या चार मासांना ‘चातुर्मास’, असे म्हणतात. या वर्षी १२.७.२०१९ ते ९.११.२०१९ या कालावधीत चातुर्मास आहे. या काळात श्रीविष्णु क्षीरसागरात शेषशय्येवर योगनिद्रा घेतात. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र !

अहोरात्र याचा अर्थ मनुष्याच्या एका वर्षातील पहिले सहा मास म्हणजे देवांचा एक दिवस आणि मनुष्याचे उर्वरित सहा मास म्हणजे देवांची एक रात्र असते; परंतु देवता चातुर्मासात केवळ चार मासच निद्रा घेतात अन् एक तृतीयांश रात्र शिल्लक असतांनाच जागे होतात.

२. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी उत्तम काळ

श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात. जो मनुष्य चातुर्मासात नदीत स्नान करतो, विशेषतः तीर्थस्थानावरील नदीत स्नान करतो, त्याच्या अनेक पापांचा नाश होतो; कारण पावसाचे पाणी ठिकठिकाणांहून मातीच्या माध्यमातून प्राकृतिक शक्तीला आपल्यासह वहात आणत नदीच्या वहात्या पाण्यासह समुद्राकडे घेऊन जाते. चातुर्मासात श्रीविष्णु जलावर शयन करतो; म्हणून जलामध्ये त्याचे तेज आणि शक्ती यांचा अंश असतो. त्यामुळे त्या तेजयुक्त जलात स्नान करणे सर्व तीर्थस्थानांपेक्षाही फलप्रद असते. चातुर्मासात एका बालदीत १ – २ बिल्वपत्रे टाकून ‘नमः शिवाय ।’ हा मंत्र ४ – ५ वेळा जपून स्नान करणे विशेष लाभदायी असते. त्यामुळे शरिराचा वायूदोष दूर होतो अन् आरोग्याचे रक्षण होते.

३. चातुर्मासातील व्रतवैकल्यांचे महत्त्व

पावसाळ्यात आपण आणि सूर्य यांच्यात ढगांचा एक पट्टा निर्माण झालेला असतो. त्यामुळे सूर्याचे किरण, म्हणजे तेजतत्त्व, तसेच आकाशतत्त्व एरव्हीइतके पृथ्वीवर पोचू शकत नसल्याने वातावरणात पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्राबल्य वाढलेले असते. त्यामुळे वातावरणातील विविध जंतू, रज-तम किंवा त्रासदायक शक्ती यांचे विघटन न झाल्यामुळे या वातावरणात साथीचे रोग पसरतात आणि आळस किंवा मरगळ जाणवते.

व्रतवैकल्ये आणि उपवास करणे, सात्त्विक आहार घेणे अन् नामजप करणे, यांमुळे आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या रज-तमाचा प्रतिकार करण्यास सक्षम होतो; म्हणून चातुर्मासात व्रतवैकल्ये करतात. या काळात पानावर भोजन, नामजप, मौन, ध्यान, दान-धर्म आणि उपवास विशेष लाभदायी असतात. चातुर्मासात परनिंदेचा विशेष रूपाने त्याग केला पाहिजे; कारण परनिंदा ऐकणाराही पापाचा धनी होतो. परनिंदा एक महापाप आहे आणि या दोषाचा पापी पुढल्या जन्मीही यशापासून वंचित रहातो.

४. चातुर्मासाचे ज्योतिषशास्त्रातील ग्रहांनुसार महत्त्व

ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी मनुष्यजन्माचे महत्त्व अधिक आहे.

४ अ. सूर्य : चातुर्मासात आषाढ शुक्ल पक्ष एकादशीला सूर्य मिथुन राशीत असतो आणि कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला सूर्य तूळ राशीत असतोे. या वर्षी चातुर्मासात सूर्य मिथुन, कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशींत असेल. कर्क आणि तूळ राशींतील सूर्य ग्रहाच्या भ्रमणकाळात रोगप्रतिकारक शक्ती न्यून होण्याची शक्यता अधिक असते. रवि हा अग्नितत्त्वाचा ग्रह असल्याने तो रोगप्रतिकारक शक्ती आणि ज्ञान यांचा कारक आहे. १७.१०.२०१९ ते १६.११.२०१९ या काळात सूर्य तूळ राशीत असेल. अग्नितत्त्वाचा कारक असणारा सूर्य तूळ राशीत नीच मानला गेला आहे; कारण तूळ राशीचा स्वामी शुक्र असून तो जलतत्त्वाचा कारक आहे. तूळ ही वायुतत्त्वाची रास आहे. रवि तूळ राशीत असतांना चिडचिड वाढणे, थकवा जाणवणे, गर्विष्ठपणा वाढणे, निष्क्रीयता येणे आदी अशुभ परिणाम होऊ शकतात. या काळात सूर्योपासना करावी. आत्मिक तेज वाढण्यासाठी नियमितपणे स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करून आत्मचिंतन केल्यास लाभ होईल.

४ आ. मंगळ : या वर्षी चातुर्मासात मंगळ हा ग्रह २२.६.२०१९ ते ९.८.२०१९ या कालावधीत कर्क राशीत, ९.८.२०१९ या दिवशी पहाटे ४.४६ पासून २५.९.२०१९ पर्यंत सिंह राशीत आणि २५.९.२०१९ या दिवशी सकाळी ६.३१ पासून १०.११.२०१९ पर्यंत कन्या राशीत असेल. याचाच अर्थ चातुर्मासात मंगळ हा ग्रह कर्क, सिंह आणि कन्या राशींत असेल. मंगळ हा ग्रह एका राशीत दीड मास रहातो. या दीड मासातील पहिल्या आठ दिवसांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते. कर्क राशीतील मंगळ अशुभ फळ देतो. ग्रहाचे एका राशीतून दुसर्‍या राशीत भ्रमण होते, त्या काळाला त्या ग्रहाचा ‘संधिकाल’ म्हणतात. संधिकालात केलेल्या साधनेचे फळ अधिक मिळते. मंगळ ग्रहाची देवता ‘श्री गणेश’ आहे. मंगळ ग्रह शौर्य, पराक्रम, अधिकार, कर्तृत्व, साहस, नेतृत्वगुण यांचा कारक असल्याने मंगळ ग्रहाच्या संधीकालात केलेल्या साधनेमुळे मंगळ ग्रहाशी संबंधित गुणांची वृद्धी करण्यास अनुकूल काळ आहे.

४ इ. गुरु : या वर्षी चातुर्मासात ‘गुरु’ ग्रह ‘वृश्‍चिक’ राशीत (मित्र राशीत) असून ५.११.२०१९ या दिवशी पहाटे ५.१८ ला धनु राशीत (स्वराशीत) प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या मित्र आणि शत्रू राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा मित्र राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. वृश्‍चिक राशीचा राशीस्वामी मंगळ ग्रह असून तो गुरूचा मित्रग्रह आहे. यामुळे उच्च शिक्षण, तत्त्वज्ञान, धर्म, परदेशगमन, कीर्ती, प्रसिद्धी, आर्थिक, आध्यात्मिक या सर्वच क्षेत्रांत यश मिळते.

४ ई. शनि : या वर्षी चातुर्मासात ‘शनि’ ग्रह ‘धनु’ राशीत असेल. शनि हा ग्रह कर्माचा अधिपती असून तो अहंकार नाहीसा करतो. वाईट कृत्ये करणार्‍या आणि अहंकाराने वागणार्‍या व्यक्तींना शनीच्या अशुभ भ्रमणात त्रास होतो. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्नरत असणार्‍या साधकांना साधनेच्या प्रयत्नांत शनि यश देतो. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होते.

४ उ. शुक्र : या वर्षी चातुर्मासात ‘शुक्र’ ग्रह ९.९.२०१९ ते ३.१०.२०१९ या कालावधीत ‘कन्या’ या नीच राशीत असणार आहे. या काळात प्राणशक्ती उणावणे (थकवा जाणवणे), त्वचाविकार होणे, घशाला कोरड पडणे, स्त्रियांचे आजार वाढणे, उदास वाटणे, मानसिक त्रास होणे, वासनेचे विचार वाढणे, साधनेपेक्षा मायेतील विचारांचे प्रमाण वाढणे, साधनेच्या प्रयत्नांतील सातत्य उणावणे, असे त्रास होतात, तसेच वैवाहिक सौख्याच्या संदर्भात अशुभ फल मिळण्याची शक्यता अधिक असते. यासाठी या काळात देवीची उपासना केल्यास लाभ होतो.

५. श्री गणेशाचे आगमन होणे

या वर्षी चातुर्मासात २.९.२०१९ ते १२.९.२०१९ या कालावधीत श्री गणेशाचे आगमन होणार असल्याने गणेशलहरींचे प्रमाण वाढून सर्वांच्या आनंदात वाढ होईल, तसेच प्राणशक्ती वाढेल.

प्रतिकूल प्रसंग आणि ग्रहमान असतांना साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. यासाठी गुरु आणि देव यांना अनन्यभावे शरण जाऊन त्यांच्याप्रती श्रद्धा वाढवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास प्रतिकूलतेचा त्रास न होता आनंद अनुभवता येईल.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभागप्रमुख, गोवा. (२३.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF