साधकांनो, श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करून गुरुऋण फेडण्याचा प्रयत्न करा आणि गुरुपौर्णिमेला कृतज्ञतारूपी भावपुष्प श्री गुरूंच्या कोमल चरणी अर्पण करा !

१६ जुलै २०१९ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने…

‘एखाद्या सणाच्या दिवशी संबंधित देवतेचे तत्त्व अन्य दिवसांच्या तुलनेत एक सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. त्यामुळे त्या देवतेची उपासना त्या दिवशी केल्याने आपल्याला त्या तत्त्वाचा अधिक प्रमाणात लाभ होतो. श्री गुरूंमध्ये सर्वच देवतांचे तत्त्व कार्यरत असते आणि ज्या साधकाला जे तत्त्व आवश्यक आहे, ते तत्त्व त्या वेळी श्री गुरूंच्या माध्यमातून कार्यरत होऊन त्या साधकाला मिळत असते. त्यामुळेच गुरुपौर्णिमा हा साधकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सर्व देवतांचे तत्त्व सामावलेले गुरुतत्त्व त्या दिवशी एक सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. साधकासाठी गुरुपौर्णिमेचा केवळ एकच दिवस नव्हे, तर गुरुपौर्णिमेचा सर्व कालावधीच गुरुकृपेचा भरभरून वर्षाव होण्याचा असतो.

या कालावधीचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुतत्त्व तर एक सहस्र पटींनी अधिक कार्यरत असतेच; पण त्या समवेत केलेल्या प्रयत्नांचे फळही सहस्र पटींनी अधिक मिळते. ‘साधनेसाठी दुग्धशर्करायोग असलेल्या या कालावधीचा लाभ करून घेण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे ?’, याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

कु. वैष्णवी वेसणेकर
कु. योगिता पालन

१. अवतार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधनाप्रवास अन् त्यांनी केलेली गुरुभक्ती

श्री गुरूंची स्तुती करतांना शिष्याचे तन, मन आणि प्राण पूर्णपणे गुरुभक्तीत चिंब नहातात. अशी ही गुरुस्तुती आणि तिच्यातून मिळणारा आनंद युगायुगांपासून प्रत्येक गुरुभक्त अनुभवत आहे. ‘श्री गुरूंचे शिष्याच्या जीवनात महत्त्व किती आहे ?’, याविषयी उदाहरणे घ्यायची झाली, तर ईश्‍वराविना आपल्या गुरूंचे माहात्म्य कोण उलगडून सांगणार ? साक्षात ईश्‍वरानेच अवतारी रूपात पृथ्वीवर येऊन महान गुरूंचे शिष्योत्तम बनून श्री गुरूंचे माहात्म्य उलगडले आहे.

१ अ. प्रभु श्रीराम : याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्रेतायुगातील प्रभु श्रीराम आणि त्यांचे गुरु ब्रह्मर्षि वसिष्ठ ! श्री गुरूंची महानता दाखवण्यासाठी श्रीविष्णुही जेथे रामावतार घेऊन श्री गुरूंचे शिष्यत्व पत्करतो, त्या श्री गुरूंची महानता आपण काय वर्णावी ? ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणार्‍या प्रभु श्रीरामाने आपल्यासमोर गुर्वाज्ञापालनाचा पाठ घालून दिला आहे. प्रभु श्रीरामावर विविध कार्ये सोपवून वसिष्ठरूपी श्री गुरूंनी आपल्या महान शिष्याच्या देवत्वाची ओळख जगाला करून दिली. अशा या महान गुरु-शिष्याच्या जोडीला कोटी कोटी वंदन करूया.

१ आ. भगवान श्रीकृष्ण : दुसरे उदाहरण म्हणजे द्वापरयुगातील श्रीकृष्ण आणि सांदीपनी ऋषि ! सर्व कलागुणांनी युक्त पूर्णपुरुष असलेल्या पूर्णावतारी श्रीकृष्णाने श्री गुरूंचे महत्त्व आपल्याला पटवून देण्यासाठीच सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहून त्यांच्याकडून सर्व कला आत्मसात केल्या आणि त्या पूर्ण पुरुषोत्तमाने आपल्या कला अन् परिपूर्णता यांचे श्रेय श्री गुरु सांदीपनी ऋषि यांना दिले. श्रीकृष्ण हा अवतार असल्याचे ठाऊक असूनही सांदीपनी ऋषींनी त्याला शिक्षण दिले. धन्य ते गुरु-शिष्य ! या गुरु-शिष्याच्या जोडीचे स्मरण करून त्यांच्या चरणीही कोटी कोटी वंदन करूया.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले : श्रीविष्णूचे अवतार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी गुरुकुलात राहून श्री गुरूंकडून शिक्षण घेतले होते. त्याचप्रमाणे महर्षींनी सांगितल्यानुसार या कलियुगातही श्रीविष्णूने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात अवतार घेतला आहे. परात्पर गुरुदेवांनीही आपले गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे जाऊन सेवा केली आहे आणि गुरुभक्तीचा, म्हणजेच उत्तम शिष्याचा अनुकरणीय आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे.

१ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला तन-मन-धनाचा त्याग

१ इ १ अ. संतांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरणाला आरंभ केल्याने अखंड नामस्मरण चालू होऊन मनाचा त्याग होणे : ‘श्री गुरूंचा प्रिय आणि आदर्श शिष्य कसे बनायचे ?’, याविषयी आपण आज आपल्याच श्री गुरूंच्या उदाहरणातून शिकणार आहोत. वयाच्या ४४ व्या वर्षी अध्यात्माकडे वळल्यानंतर प.पू. गुरुदेवांना साधनेचे महत्त्व समजले. विविध संतांकडे जाऊन प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना केली. संतांनी सांगितल्याप्रमाणे प.पू. गुरुदेवांनी लगेच नामस्मरणाला आरंभ केला. केवळ ५ – ६ मासांतच त्यांचे अखंड नाम व्हायला लागले, म्हणजे त्यांच्या मनाचा त्याग झाला.

१ इ १ आ. सेवेच्या माध्यमातून तनाचा त्याग करणे : त्यानंतर पुढे संतांनी सांगितल्याप्रमाणे प.पू. गुरुदेवांनी शरिराने सत्सेवा करायला आरंभ केला. ज्या ज्या संतांकडे ते जायचे, तेथे केर काढणे, सतरंज्या घालणे, कप-बशा धुणे इत्यादी सेवा ते करायला लागले. नंतर ३ – ४ मासांतच त्यांना गुरुप्राप्ती झाली. श्री गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या आश्रमात कुठे काटेरी झुडपे दिसली, तर ती काढणे; कुठे दगड दिसले, तर ते काढणे; स्वच्छता करणे; भाज्या चिरणे इत्यादी अनेक सेवा त्यांनी केल्या. त्या माध्यमातून त्यांनी शरीर अर्पण केले, म्हणजे तनाचा त्याग झाला.

१ इ १ इ. शीव येथे असलेले स्वतःचे चिकित्सालय श्री गुरूंना अर्पण करून धनाचा त्याग करणे : त्यांचे नामस्मरण अखंड चालूच होते, म्हणजे त्यांनी मन अर्पण केलेलेच होते. त्यांच्याकडून सेवाही घडत होती, म्हणजे त्यांनी तन अर्पण केलेलेच होते. एक दिवस श्री गुरु त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही मला मन अर्पण केले, तनही अर्पण केले; पण धन अर्पण केले नाही.’’ तोपर्यंत प.पू. गुरुदेव धनाचा ४० ते ५० टक्के भाग अर्पण करायचे; पण गुरूंच्या आज्ञेनंतर त्यांनी लगेच मुंबईतील त्यांचे चिकित्सालय श्री गुरूंना अर्पण केले.

१ इ २. श्री गुरूंनी शिष्य डॉ. आठवले यांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य देणे : प.पू. गुरुदेवांनी चिकित्सालय अर्पण केल्यावर प.पू. बाबा त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही आम्हाला तुमचे तन, मन आणि धन अर्पण केले आहे. मी तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले.’’

१ इ ३. मार्गदर्शक संत आणि श्री गुरु यांचे आज्ञापालन केल्याने प.पू. गुरुदेवांनी स्वतः शिष्योत्तम होऊन सर्वांसमोर आदर्श ठेवणे : प.पू. गुरुदेवांना मार्गदर्शक संत आणि श्री गुरु यांनी जे जे सांगितले, ते ते त्यांनी लगेच कृतीत आणले. त्यामुळे गुरुदेवांचा अध्यात्मातला सगळा प्रवास केवळ दीड वर्षात पूर्ण झाला. स्वतः शिष्योत्तम होऊन श्री गुरूंनी आपल्यासमोर ‘आदर्श शिष्य कसा असावा ?’, याचा आदर्शच ठेवला आहे, तसेच मनुष्य जीवनातील श्री गुरूंचे महत्त्वही पटवून दिले.

अशा श्री गुरूंची महती कोणत्या शब्दांत वर्णावी ? खरेच संपूर्ण विश्‍वात सर्व नात्यांत गुरु-शिष्याचे हे नाते अनमोल अन् अलौकिक असेच आहे. ‘ईश्‍वराच्या कृपेने अशा श्री गुरूंचे साधक बनण्याची आपल्याला संधी मिळाली’, यासाठी आपण श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. भगवंताने आपल्याला गुरु-शिष्य परंपरा देऊन आपल्या उद्धाराचा मार्ग आधीच निश्‍चित केला आहे. आपल्यालाही त्यांनी या गुरु-शिष्य परंपरेतील एक भाग बनवले आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. या पवित्र गुरु-शिष्य परंपरेला नमन करून ती सिद्ध करणार्‍या भगवंताच्या चरणीही कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया.

२. हिंदु धर्मशास्त्रानुसार असलेली ४ ऋणे, फेडता  न येणारे गुरुऋण आणि गुरुऋण अंशतः फेडता येण्यासाठी सुवर्णसंधी असलेली गुरुपौर्णिमा

२ अ. मनुष्याला सर्व ऋणे फेडता येणे; मात्र गुरुऋण फेडता न येणे आणि शिष्यासाठी श्री गुरुच सर्वकाही असणे : आपल्या धर्मातील ऋणकल्पनेत देवताऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण अशी ४ ऋणे सांगितली आहेत. प्रत्येक मनुष्याला ही ४ ऋणे फेडावीच लागतात. या ४ ऋणांमध्ये गुरुऋणाचा उल्लेख नाही; कारण गुरुऋण हे असे ऋण आहे, जे आपल्याला कधीच फेडता येत नाही !

श्री गुरु हे चराचरी स्थित आहेत. शिष्यासाठी तेच सर्वकाही आहेत, देवताही तेच आहेत, ऋषीही तेच आहेत, पितृस्वरूपही तेच आहेत आणि समाजरूपाने जीवन जगण्यासाठी आपल्याला साहाय्य करणारेही तेच आहेत.

२ आ. शास्त्रानुसार शिष्याला ४ ऋणे न फेडावी लागणे आणि गुरुऋण फेडण्यासाठी शिष्याने प्रयत्न करणे आवश्यक असणे : ‘जो गुरूंचा शिष्य आहे, त्याला ही ४ ऋणे फेडावी लागत नाहीत’, असे शास्त्रात म्हटले आहे. या ४ ऋणांपासून मुक्ती देणारे श्री गुरूंचे ऋण आपल्यावर आहे. गुरुऋण फेडण्यासाठी किंवा श्री गुरूंसाठी काहीतरी करण्यासाठी आपण अत्यंत असमर्थ आहोत. असे असले, तरी गुरुऋण अंशतः तरी फेडण्यासाठी आपण सतत संधी शोधत रहायला हवी.

२ इ. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुऋण अंशतः फेडण्याची आणि अपार गुरुकृपा अनुभवण्याची मिळालेली एक सुवर्णसंधी ! : ‘गुरुदेवांचे आपल्यावर किती ऋण आहे !’, हे शब्दांत व्यक्त करणेच नव्हे, तर ते जाणून घेणेही आपल्यासाठी अत्यंत कठीण, म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे, तरीसुद्धा गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपल्याला अंशतः का होईना, गुरुऋण फेडण्याची आणि श्री गुरूंची अपार कृपा अनुभवण्याचीच एक संधी लाभते.

प.पू. गुरुदेवांनी आपले तन-मन-धन गुरुचरणी समर्पित केले. त्यांचेे अनुकरण करून साधकांनीही आपले तन, मन अणि बुद्धी श्री गुरूंच्या चरणी, म्हणजे त्यांचे समष्टी रूप असलेल्या गुरुसेवेसाठी समर्पित करायला हवे आणि या माध्यमातून अंशतः गुरुऋण फेडण्याचा प्रयत्न करायला हवा.

२ ई. गुरुऋण फेडण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ? : ‘कर्म, मन आणि वचन यांनी नित्य गुरूंची आराधना करणे’, हेच शिष्याचे कर्तव्य आहे. शिष्याचे शरीर, इंद्रिये, मन, प्राण, सर्वकाही गुरुकार्यासाठी अर्पण व्हायला हवे. श्री गुरु जितके श्रेष्ठ आहेत, तितकेच त्यांचे कार्यही श्रेष्ठ आहे; म्हणूनच शिष्यासाठी ‘गुरुसेवा, म्हणजे श्री गुरूंनी सांगितलेली अध्यात्मप्रसाराची सेवा करणे’, हीच श्री गुरूंची आराधना आहे. केवळ कर्मानेच नाही, तर वाणी आणि मन यांनीही श्री गुरूंची आराधना करायला हवी. ‘ती कशी करायची ?’, हे आपण थोडक्यात समजून घेऊया.

२ ई १. देह : ‘देहाने सेवा करणे’, ही देहाद्वारे गुरुऋण फेडण्याची संधी आहे. अखंड गुरुसेवेमध्ये आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून आपल्याला हा देह आणि देहातील प्रत्येक पेशी गुरुमय बनवायची आहे. ‘आपला देह हा केवळ आणि केवळ श्री गुरूंसाठीच अन् श्री गुरूंच्या सेवेसाठीच आहे’, याचे भान ठेवून झोकून देऊन आपली पूर्ण क्षमता वापरून गुरुसेवा केली पाहिजे.

२ ई २. वाणी : अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना आपली वाणीही गुरुचरणी समर्पित होत असते. ही देह आणि वाणी यांद्वारे होणारी श्री गुरूंची आराधना आहे. ‘श्री गुरूंच्या कार्यात इतरांना सहभागी करवून घेणे आणि ते करतांना वाणीने केवळ श्री गुरूंचेच गुणगान करणे’, हीसुद्धा श्री गुरूंचीच आराधना आहे.

२ ई ३. मन : मनाद्वारे गुरुऋण फेडणे म्हणजे अखंड नामसाधना करणे आणि मनाला केवळ गुरुसेवेचा ध्यास असणे. ‘आपले मन अखंडपणे श्री गुरूंच्या भावविश्‍वात रमवणे’, हेच श्री गुरूंना अपेक्षित आहे. मन शुद्ध केल्यासच खर्‍या अर्थाने ते गुरुचरणी रमू शकते. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी प.पू. गुरुदेवांनी आपल्याला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगितली आहे. त्याद्वारे आपल्यातील स्वभावदोष आणि अहं घालवण्याचा प्रयत्न करून आपण मनाद्वारे गुरुऋण फेडण्याचा प्रयत्न करायला हवा.

२ ई ४. बुद्धी : ‘आपल्याला मिळालेल्या बुद्धीला सद्सद्विवेक बुद्धी बनवणे’, हेच खरे बुद्धीद्वारे गुरुऋण फेडणे होय. आपण करत असलेले प्रत्येक कर्म हे अधिकाधिक चांगले होण्यासाठी आणि ते कर्म दोषरहित होऊन गुरुचरणी अर्पित करता येण्यासाठी बुद्धीचा वापर केला पाहिजे. या माध्यमातून बुद्धी गुरुचरणी समर्पित होते. बुद्धीचा अनावश्यक वापर न करता गुरुकार्य परिपूर्ण करण्यासाठी आणि गुरुकार्याची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी तिचा वापर करून त्याद्वारे गुरुऋण फेडण्याचा प्रयत्न करायला हवा.

अशा प्रकारे केवळ गुरुसेवेतूनच साधकांचा देह, मन, बुद्धी आणि वाणी शुद्ध होणार आहेत. देह, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे गुरुकार्याशी एकरूपता येण्यासाठी प्रयत्न करून साधकांनी या माध्यमातून गुरुऋण फेडण्याचा प्रयत्न करायला हवा.

३. गुरुकृपायोगाच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी दिलेले साधनेचे मुख्य दृष्टीकोन

३ अ. दिसेल ते कर्तव्य, घडेल ते कर्म आणि भोगीन ते प्रारब्ध !

३ अ १. दिसेल ते कर्तव्य : ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने प्रत्येक कृती केली असता प्रत्येक जीव निर्गुण ईश्‍वराकडे जाऊन शाश्‍वत तत्त्वाची प्राप्ती करतो, म्हणजेच त्या त्या क्षणी तो कर्तव्याशी एकरूप होऊन मोक्षाचा मानकरी होतो.

३ अ १ अ. ‘दिसेल ते कर्तव्य’ हा भाव येण्यासाठी करावयाचे प्रयत्न : आश्रमात येता-जाता अव्यवस्थित झालेले पायपुसणे नीट करणे, पाण्याचा नळ, दिवा किंवा पंखा अनावश्यक चालू असलेला दिसल्यास तो त्वरित बंद करणे, कुठे कचरा पडलेला दिसला, तर तो उचलणे किंवा कुणाच्याही चुका लक्षात आल्या, तर त्या लगेच सांगणे, या सर्व कृती म्हणजे ‘दिसेल ते कर्तव्य.’

३ अ १ आ. आपल्यासमोर येणारे सूत्र त्वरित ‘श्री गुरूंची सेवा’ या भावाने पूर्ण करणे’, ही आपली साधना असणे : कोणतीही अयोग्य कृती आपल्या लक्षात आली, तर ती श्रेष्ठ-कनिष्ठ असा विचार न करता ती ‘श्री गुरूंची सेवा आहे’, या भावाने सुधारायला हवी. भगवंत आपल्या डोळ्यांना जे दाखवतो, त्याकडे दुर्लक्ष न करता ती कृती नीट करणे, हे आपले कर्तव्यच आहे आणि हीच आपली साधना आहे; कारण आपल्यासमोर आलेले सूत्र नेहमी आपल्या साधनेसाठीच पूरकच असते. आपल्याला दिवसभरात अशी अनेक सूत्रे लक्षात येतात; पण आपण त्या सूत्रांकडे दुर्लक्ष करतो. अशा सर्व सूत्रांचे आपण चिंतन करायला हवे आणि ‘दिसेल ते कर्तव्य’ हा गुरूंनी सांगितलेला भाव, जो स्वतः गुरूंनीच आचरणात आणलेला आहे, तो भाव आणि गुण आपल्या वृत्तीत येईपर्यंत कठोरतेने अन् लक्षपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

३ अ २. घडेल ते कर्म : संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘आपणचि तारी, आपणचि मारी ।
आपणचि उद्धरी आपणया ॥’

३ अ २ अ. ‘भगवंताच्या दिशेने नेणारे कर्म करणे’, ही साधनाच असणे : आपले कर्मच आपल्याला प्रगतीपथावर अथवा अधोगतीच्या दिशेने नेते. आपले भाग्यही आपण योग्य कर्माद्वारे पालटू शकतो. त्यामुळे भाग्यापेक्षाही कर्म श्रेष्ठ आहे. आपल्या हातून होणारे प्रत्येक कर्म हे भगवंताच्या दिशेनेच घेऊन जाणारे असेल, तरच त्यातून आपली साधना होते. ‘आपल्याकडून होणार्‍या किती कृती किंवा आपले कोणते कर्म आपल्याला भगवंताच्या दिशेने घेऊन जाते ?’, याचे आपण निरीक्षण करायला हवे आणि प्रत्येक कर्म भगवंताला अपेक्षित असे करून भगवंताच्या दिशेने वाटचाल करायला हवी.

३ अ २ आ. प्रत्येक कर्म ‘इदं न मम’ (म्हणजे ‘हे माझे नाही’) या भावाने करणे आवश्यक ! : कर्म करतांना स्थुलातून योग्य आणि ‘भगवंताला आवडेल’, असेे केले पाहिजे. ‘ते कर्म करतांना आपल्या मनात कोणते विचार असतात ?’, यावरही त्याचे फळ अवलंबून असते. आपण एखादे चांगले कर्म केले; परंतु ते करतांना मनात ‘अहं’ असेल, ‘मी चांगले केले’ किंवा ‘मला जमले’, असा विचार असेल, तर त्यात आपला कर्तेपणा असल्यामुळे त्या कर्माचे फळ आपल्याला लागू होते. त्यामुळे आपली साधना होत नाही.

विश्‍वाच्या उत्पत्तीपासून आपल्या सर्वांना भगवंताने वेद, उपनिषदे आणि पुराणे यांच्या माध्यमातून भगवंताच्या प्राप्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांचे वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. आपल्या धर्मशास्त्राने सांगितले आहे, ‘एखादा विधी केल्यानंतर शेवटी सर्व कर्म ‘इदं न मम’, म्हणजे ‘भगवंता, हे कर्म मी केले नसून तूच माझ्याकडून हे करवून घेतलेे आहेस. शेवटी हे कर्म मी तुलाच अर्पण करत आहे’, असे म्हणून केलेले कर्म ईशचरणी अर्पण करावे.’ त्यामुळे त्या कर्मातून निर्माण होणार्‍या कर्मफळाचा लवलेश न लागता भगवंताशी अखंड अनुसंधान अनुभवता येते. यापुढे साधकांनी आपले प्रत्येक कर्म ‘इदं न ममं’ या भावाने करण्याचा प्रयत्न करायला हवा.

३ अ ३. भोगीन ते प्रारब्ध

३ अ ३ अ. प्रारब्ध भोगायची आणि सहन करण्याची क्षमता गुरुकृपेमुळे साधकात निर्माण होणे अन् साधनेमुळे प्रारब्धावर विजय मिळवणे शक्य असणे : कर्मफलन्यायानुसार आपण जे कर्म करतो, त्यानुसार त्याचे फळ आपल्याला मिळते. चांगले कर्म केले, तर त्याचे फळ चांगले प्राप्त होते आणि अयोग्य कर्म केल्यास त्याचे वाईट फळ मिळते. म्हणजेच आपल्या कर्मानुसार आपले प्रारब्ध बनते. प्रारब्धाचे मूळ कर्मच आहे. ‘सर्वसामान्य जिवांना या प्रारब्धावर मात कशी करायची ?’, हे ठाऊक नाही. ‘प्रारब्ध कुणीही पालटू शकत नाही’, असे म्हणणार्‍यांना साधनेचे सामर्थ्य ठाऊक नाही. त्यामुळे ते दुःखी असतात; पण ‘साधनेने प्रारब्ध कसे सुसह्य बनते ?’, हे गुरुकृपेमुळे आपल्याला ठाऊक आहे. प्रारब्ध कितीही तीव्र असेल, तरी श्री गुरूंच्या कृपेमुळे प्रारब्ध भोगण्याची आणि सहन करण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते. आपणा सर्वांना या माध्यमातून होणारी गुरुकृपा अनुभवायची आहे. आपल्या प्रारब्धावर आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि तो आपण केवळ साधनेनेच मिळवू शकतो.

३ अ ३ आ. ‘प्रारब्धाच्या माध्यमातूनही श्री गुरु साधकाची साधना करवून घेतात’, हे ओळखून आलेले सर्व प्रसंग स्थिरतेने स्वीकारून श्री गुरुचरणी शरण रहायला हवे ! : आपल्या जीवनात घडणारे चांगले-वाईट प्रसंग प्रारब्धानुसारच असतात. त्यासाठी आपण प्रारब्ध स्वीकारून त्या वेळी श्री गुरु करत असलेली लीला अनुभवायला हवी. त्या वेळी ते आपल्यावर करत असलेला प्रीतीचा वर्षाव अनुभवायला हवा आणि प्रारब्धामुळे खचून न जाता, हताश न होता, प्रारब्धाच्या अधीन न जाता, प्रारब्धाला साधनेतील अडथळा बनू न देता, ‘त्या प्रारब्धाच्या माध्यमातून श्री गुरूंना आपली साधना होणे कसे अपेक्षित आहे ?’, हे ओळखून त्या माध्यमातून गुरुचरणी शरणभावात राहून त्यांच्या चरणी स्थान प्राप्त करायला हवे.

३ आ. प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करणे : प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करून त्यातील चैतन्य शोधून त्याला कार्यरत करणे, त्याची प्राप्ती करणे, म्हणजेच चराचरात ईश्‍वरी तत्त्व असल्याची अनुभूती घेणे.

३ आ १. शिष्यासाठी वैयक्तिक असे काही नसून त्याचे सर्वकाही गुरूंचे आणि गुरूंसाठी असणे : सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागल्यापासून आपल्यासाठी वैयक्तिक असे काहीच राहिलेलेे नाही. आपले जे काही आहे, ते श्री गुरूंचेच आहे आणि ते श्री गुरूंसाठीच आहे. आपले संपूर्ण जीवन हे श्री गुरुचरणीच समर्पित आहे. श्री गुरुच शिष्याचे आत्मस्वरूप आहेत आणि तेच सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचा आत्मा आहेत.

गुरु शिष्याच्या मनमंदिरी, गुरुच त्याचे प्राण ।
संपूर्ण विश्‍वाचे त्राता, गुरुच साक्षात नारायण ॥

असे प्रत्येक शिष्य अनुभवत असतो.

३ आ २. ‘जीवनातील प्रत्येक कृती श्री गुरूंसाठीच करत आहोत’, या भावाने केल्यास त्या प्रत्येक कृतीतून साधना घडणे : शिष्याची प्रत्येक कृती ही श्री गुरूंसाठी आणि श्री गुरूंना आनंद देण्यासाठीच असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेल्या प्रत्येक कृती, मग ती वैयक्तिक असो, व्यावहारिक असो, कार्यालयीन असो कि सेवा असो, ‘ती कृती श्री गुरूंसाठीच करत आहोत’, या भावाने केल्यास ती आपोआप आध्यात्मिक स्तरावरच होते. अशा प्रकारे प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करायला हवे.

३ इ. अध्यात्मातील मार्गदर्शकांचे आज्ञापालन करणे : ‘श्री गुरूंच्या वचनानुसार जीवन जगणे’, हाच शिष्याचा साधनापथ आहे. संत कबीर म्हणतात,

गुरु समान दाता नहीं, याचक सीष समान ।
तीन लोक की संपदा, सो गुरु दीन्हीं दान ॥

अर्थ : संपूर्ण संसारात गुरुसमान कुणी दानी नाही आणि शिष्यासमान कुणी याचक नाही. ज्ञानरूपी अमृतमय अनमोल संपत्ती गुरु आपल्या शिष्याला देऊन कृतार्थ करतात आणि गुरूंद्वारे प्रदान केली जाणारी अनमोल ज्ञानसुधा केवळ याचना करूनच शिष्य प्राप्त करून घेऊ शकतो.

३ इ १. ‘शिष्याच्या साधनेसाठी काय आवश्यक आहे ?’, हे केवळ श्री गुरुच जाणत असणे आणि गुरुतत्त्व कुणाच्याही माध्यमातून साधकाला मार्गदर्शन करत असणे : ‘आपल्या साधनेसाठी काय आवश्यक आहे ? आपण कोणती साधना करायला हवी ? कसे प्रयत्न करावेत ?’, हे आपल्याला ठाऊक नसते. ते जाणण्याची आपली क्षमताही नसते. सर्वव्यापी आणि अंतर्यामी श्री गुरुच ते जाणून आपल्याला योग्य दिशादर्शन करू शकतात. चराचरवासी गुरुतत्त्व आपल्याला दिशा देण्यासाठी कुणाच्याही माध्यमातून येऊ शकते. कधी ते गुरुतत्त्व सहसाधकांच्या माध्यमातून, कधी उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून, कधी संत, कधी सद्गुरु यांच्या माध्यमातून येऊन आपल्या साधनेसाठी आवश्यक मार्गदर्शन करते. संगणकीय प्रणालीद्वारे होणारे विविध सत्संग, भाववृद्धी सत्संग, व्यष्टी साधनेचे आढावे, या माध्यमातूनही गुरुतत्त्व आपल्याला दिशा देत असते. प.पू. गुरुदेवांनी साधनेत आल्यावर मार्गदर्शक संतांचे लगेच आज्ञापालन केले. त्याप्रमाणे आपणही प्रयत्न करायला हवेत.

३ इ २. ‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरु उत्तरदायी साधक, संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत’, असा भाव ठेवून साधकांनी त्यांचे आज्ञापालन करणे आवश्यक असणे : महर्षि म्हणतात, ‘प.पू. गुरुदेवांना सामान्य देहधारी रूपात पाहून फसू नका; कारण शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी श्रीनारायणच श्री गुरूंच्या देहात वास करत आहे.’ त्याप्रमाणेच आपणही लक्षात घ्यायला हवे, ‘ज्याप्रमाणे श्रीविष्णु प.पू. गुरुदेवांच्या देहातून कार्यरत आहे, त्याप्रमाणे हेच नारायणस्वरूप गुरुदेव प्रत्येक साधक आणि संत यांच्या माध्यमातून आपल्यासाठी कार्यरत आहेत.’ सर्व साधकांच्या हृदयामध्ये श्री गुरुमाऊली विराजमान झालेली आहे. आपले उत्तरदायी साधक, संत आणि सद्गुरु आपल्याला जे सांगतील, ते ‘नारायणस्वरूप गुरुदेवच सांगत आहेत’, हे लक्षात घेऊन आपण त्यांचे आज्ञापालन करायला हवे.

४. साधकांनो, श्री गुरूंनी दिलेल्या वरील तीन दृष्टीकोनांद्वारे प्रयत्न करून विहंगम गतीने साधना करा !

साधना करतांना क्षणोक्षणी आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. आपली साधना ही केवळ आपली सेवा आणि आपले व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांवरच अवलंबून नसते, तर आपल्या प्रत्येक कृतीतून समाज, आश्रम, घर येथील आपले वर्तन, तसेच कोणतीही कृती करतांना आपल्या मनातील विचार, या सर्वांवर अवलंबून असते. आपण श्री गुरूंनी आपल्याला दिलेल्या या ३ दृष्टीकोनांद्वारे प्रयत्न करून विहंगम गतीने साधना करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्या समवेतच देह, मन, बुद्धी आणि वाणी यांद्वारे गुरुऋण फेडण्याचा प्रयत्न करून गुरुपौर्णिमेला कृतज्ञतारूपी भावपुष्प श्री गुरूंच्या कोमल चरणी अर्पण करूया.

५. कृतज्ञता

परात्पर गुरुमाऊलीने दिलेल्या या आध्यात्मिक दृष्टीकोनांमुळे साधकांसाठी केवळ एकाच दिवशी गुरुपौर्णिमा नसून प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षणच गुरुपौर्णिमेसमान आहे. यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०१९)

 कृतज्ञता गुरुदेवा ।

गुरुपौर्णिमेनिमित्त प्रीतीस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणी, कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

परात्पर गुरुदेवा, ६.७.२०१९ या दिवशी मी नामजप करत असतांना मला तुमची पुष्कळ आठवण येत होती. मला तुमच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताही वाटत होती. तेव्हा माझ्या मनात अकस्मात् विचार आला, ‘या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला आपण परात्पर गुरुदेवांसाठी कृतज्ञतारूपात काव्य करूया आणि त्यांना ऐकवूया.’ परात्पर गुरुदेवा, या विश्‍वातील सर्व शब्द केवळ तुमच्यासाठीच आहेत. त्यामुळे तुमचे कौतुक करण्यासाठी शब्दभांडार लगेच माझ्या जिव्हेवर विराजमान झाले आणि पुढील काव्यरूपात ते तुमच्या स्मरणात दंग झाले. ‘शब्दही तुमचेच आणि वर्णनही तुमचेच असलेल्या या काव्यातील तुमच्या बाळाचे बोबडे बोल तुम्हीच तुमच्या कोमल चरणी अर्पण करून घ्या’, ही कृतज्ञतापूर्वक प्रार्थना !

नारायण गुरुदेव ।  सत्यनारायण गुरुदेव ।
तुम्ही नारायण गुरुदेव । तुम्हीच हो नारायण गुरुदेव ॥ १ ॥

गुरुदेव, आपले स्मरण । आम्हा स्मरणप्रसाद तो होई ।
गुरुदेव, आपले दर्शन ।  आम्हा दर्शनप्रसाद होई ॥ २ ॥

गुरुदेव, आपले चरण ।  आम्हाला तीर्थस्थान ते होई ।
गुरुदेव, आपली छाया ।  विश्‍वभर हो पसरी ।
आमुचे संरक्षण होई ॥ ३ ॥

गुरुदेव, आपले हास्य । पाहूनी मन मोहून हो जाई ।
गुरुदेवांच्या कृपाप्रसादे ।
जल होई तीर्थ अन् अन्न होई प्रसाद ॥ ४ ॥

सद्गुरुनाथा धावा आता ।  लीला तुमची दावा नाथा ॥ ५ ॥

सत्यनारायण, लक्ष्मीनारायण । मोक्षनारायण, प्रीतीनारायण ।
आनंदनारायण, चैतन्यनारायण ।
शांतीनारायण, शक्तीनारायण ॥ ६ ॥

चराचरी व्यापली तुमची । नारायण स्वरूप लीला हो ॥ ७ ॥

गुरुवर, तुम्ही नारायण । मोक्ष धाम जो देई ।
नको आम्हाला मोक्ष । द्यावी जन्मोजन्मी सेवा ॥ ८ ॥

सेवा प्रसाद देऊनी आम्हा । कृतज्ञतेने जीवन व्यापा ।
कृतज्ञता, कृतज्ञता गुरुदेवा ॥ ९ ॥

– गुरुमय होण्यास आतुरलेली,

कु. वैष्णवी वेसणेकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF