गुुरुपौर्णिमा म्हणजे भगवंताप्रती व्यक्त केली जाणारी कृतज्ञता आणि स्वतःतील चैतन्याची वृद्धी !

१६ जुलै २०१९ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने…

गुरुपौर्णिमा २०१९

गुरुपौर्णिमेचा खर्‍या अर्थाने लाभ होण्यासाठी प्रतिदिन प्रत्येक कृती भावपूर्ण होणे आवश्यक असते. सर्व कृती भावपूर्ण होण्यासाठी काही सूत्रे बुद्धीने समजून घेतल्यास त्या कृती भावपूर्ण करणे सहज साध्य होते. ‘सर्व साधकांचे भाववृद्धीचे प्रयत्न जलद गतीने व्हावेत, यासाठी ईश्‍वराचे सर्व गोष्टींतील नियोजन कसे आहे ?’, याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी वर्ष २०१७ मध्ये सांगितलेली महत्त्वपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु पांडे महाराज

‘मनुष्याला आनंद मिळावा, यासाठी भगवंताने ही सृष्टी आणि सृष्टीतील प्रत्येक वस्तू निर्माण केली आहे. ‘सर्व वस्तू आणि जीव यांमध्ये भगवंताचे चैतन्य भरलेले आहे’, हे लक्षात घेऊन कार्य केल्यास त्यातील चैतन्याद्वारे आपल्याला आनंद मिळतो. अशा प्रकारे चैतन्याचे चैतन्याशी होणारे मीलन, म्हणजेच महानंदाचे आस्वादन घेणे होय. गुरूंच्या स्मरणाने साधनेद्वारे भारित झालेल्या चैतन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा ! ‘भगवंताने सर्वत्र विनामूल्य चैतन्याचा साठा दिलेला आहे’, याची जाणीव ठेवून भगवंताचे चैतन्य घेऊन नामाद्वारे त्या चैतन्याची उधळण करणे, म्हणजेच गुरुपौर्णिमा !

आपण गुरुकृपेद्वारे वर्षभर साधना करून जे चैतन्य मिळवले, ते गुरुचरणी अर्पण करायचा आणि त्याचा आढावा द्यायचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! यासाठी प्रत्येक कृती भावपूर्ण करून अवर्णनीय आनंद मिळवण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. असे करतांना ‘आपण प्रतिदिन चैतन्याला समवेत घेऊन कार्य करत आहोत का ?’, याचे अवलोकन करावे. असे होण्यासाठी प्रत्येक क्षणी भगवंताला, म्हणजेच चैतन्याला घेऊन प्रत्येक कृती करायची मनाला सवय लावावी.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्याचा लाभ घेण्यासाठी आपण प्रतिदिन प्रत्येक कृती भावपूर्ण केल्यास आपल्यातील चैतन्याची वृद्धी होते.

१. गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कसे कार्यरत असते ?

‘गुरुपौर्णिमेचा लाभ १ सहस्र पटींनी कसा होतो ?’, हे लक्षात येण्यासाठी भगवंताची निसर्गातील नियोजकता समजून घेणे आवश्यक आहे. बिजामध्ये वृक्ष होण्याची क्षमता असते. त्यापासून सहस्रो पटींनी फळप्राप्ती होण्यासाठी बिजाचा सांभाळ करून त्याचे योग्य भूमीमध्ये रोपण करून त्याचे वृक्षात रूपांतर होईपर्यंत, म्हणजेच त्याच्यापासून फळ मिळेपर्यंतची प्रक्रिया करणे आवश्यक असते. अशा प्रकारे त्या बिजापासून वृक्ष सिद्ध होतो आणि त्यापासून जशी आपल्याला सहस्रो पटींनी फळे मिळत रहातात, तसे आपण आरंभापासून योग्य प्रकारे साधना केल्यास आपल्यावर गुरुकृपा होऊन आपल्याला १ सहस्र पटींनी लाभ मिळतो.

१ अ. गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी मिळण्यासाठीची पूर्वसिद्धता : शेतकरी जसा शेतात बी पेरून एका बिजापासून शेकडो बिजे मिळण्यासाठी प्रयत्न करतो, तसेच आपण प्रत्येक कृती भगवंताला स्मरून सतत भावपूर्ण करत गेल्यास, म्हणजेच आपल्या अंतरंगातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी सतत भावपूर्ण प्रक्रिया करत राहिल्यास अंतःकरण आपोआपच शुद्ध होऊन आत्मचैतन्याद्वारेच आपल्याला आनंदाची अनुभूती येत रहाते. त्यामुळे साहजिकच ‘योगः कर्मसु कौशलम् ।’

(अर्थ : समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.) याप्रमाणे कार्यही कुशलतेने होते आणि गुरुकृपेद्वारे भगवंतप्राप्तीही होते.

अशा प्रकारे ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी १ सहस्र पटींनी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वाचा लाभ करून घेण्यासाठी वर्षभर योग्य प्रकारे साधना करणे किती आवश्यक आहे’, हे दिसून येते. हीच गुरुपौर्णिमेच्या पूजेची पूर्वसिद्धता होय. यातूनच खरी साधना होते.

२. साधकांच्या जीवनातील गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व

भगवंतच सत्-चित्-आनंद स्वरूप आहे. त्यानेच मनुष्याला या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून आनंद घेण्यासाठी जन्म दिला आहे आणि साधना करण्यासाठी हा देह दिला आहे. त्याविषयी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून साधना करणे महत्त्वाचे आहे. आपण केवळ या शरिराद्वारे पृथ्वीवरच जलद गतीने साधना करू शकतो. यासाठी मनुष्यजन्माचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा घ्यायचा ?’, हे केवळ गुरुच आपल्याला शिकवू शकतात. गुरु शिष्याला ‘प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला कसे पहायचे ?’, हे सांगतात, शिकवतात आणि त्याच्याकडून तशी कृती करवूनही घेतात. आपल्या जीवनामध्ये योग्य गुरूंची प्राप्ती होण्यासाठी साधना करणे अत्यंत आवश्यक आहे.

व्यवहारातील सर्व गोष्टी साधन आहेत. आनंद हे साध्य आहे. गुरूंची कृपा नसल्यामुळे मनुष्य भौतिक सुखामध्ये अडकतो. याऐवजी गुरु साधकाला भौतिक सुखामध्ये न अडकवता ‘त्यातील भगवंताला कसे पहायचे ?’, याचे ज्ञान करून देतात. अशा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय; म्हणूनच गीतेत म्हटले आहे,

ईश्‍वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्‍लोक ६१

अर्थ : हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्‍वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.

विवरण : सर्व सृष्टीमध्ये भगवंताचे चैतन्य कार्य करत आहे. भगवंतच त्याद्वारे सृष्टीचे नियमन करत आहे. एवढेच नव्हे, तर तोच सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहून कार्य करत आहे. याचाच अर्थ सर्वत्र त्याचेच अस्तित्व आहे. त्याच्याविना दिसणारे सर्व दृश्य भासमान आहे. ते केवळ साधनमात्र म्हणून आहे. त्याचा उपयोग करून त्याद्वारे आनंद घ्यावा, हा त्याचा उद्देश आहे. हे केवळ गुरुकृपेद्वारेच कळून त्याचा लाभ घेता येतो; म्हणूनच गुरूंचे माहात्म्य अनन्यसाधारण आहे. यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज (२६.६.२०१७)

‘सेवा करतांना ‘ही सेवा भगवंताच्या चैतन्यामुळे होत आहे’, असा भाव ठेवल्यास मनामध्ये अन्य नकारात्मक विचार किंवा विकल्प येत नाहीत. यातूनच मनोलय होतो. मनोलय म्हणजे अखंड भगवंताशी अनुसंधान होय.’ – (परात्पर गुरु) पांडे महाराज


Multi Language |Offline reading | PDF