पू. भार्गवराम प्रभु यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये, ‘चौल संस्कार’ विधी करतांना लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांमागील शास्त्र अन् चौल संस्कार विधीमुळे त्यांच्यात झालेले पालट

संत पू. भार्गवराम प्रभु

सनातनचे मंगळूरू (कर्नाटक) येथील बाल संत पू. भार्गवराम प्रभु हे सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. त्या निमित्ताने त्यांच्यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

४.७.२०१९ या दिवशी पू. भार्गवराम यांचा ‘चौल संस्कार’ विधी आश्रमात पार पडला. या विधीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.

श्री. निषाद देशमुख

१. पू. भार्गवराम प्रभु यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

१. ‘पू. भार्गवराम स्थुलातून बाल्यावस्थेत असले, तरी त्यांच्या लिंगदेहाकडून सूक्ष्मातून सतत कार्य होत असते. यामुळे केवळ त्यांच्याभोवती बसल्यावर चैतन्य आणि आनंद मिळून मन एकाग्र किंवा निर्विचार होण्याची अनुभूती येते.

२. पू. भार्गवराम यांच्यात अनेक स्तरांवर एकाच वेळी कार्य करण्याची क्षमता आहे. यामुळे विविध लीलांमधून इतरांना आनंद देणे आणि त्याच वेळी वाईट शक्तींचे कष्ट अल्प करणे, असे दोन्ही कार्य एकाच वेळी करणे त्यांना शक्य होते.

३. पू. भार्गवराम भावाच्या किंवा साधनेच्या स्थितीमध्ये असल्यावर त्यांच्याकडून भाव आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होतात, तर साधकांच्या आध्यात्मिक त्रासांशी लढा देतांना त्यांच्याकडून शक्ती अन् चैतन्य यांचे प्रक्षेपण होते.

४. पू. भार्गवराम यांची स्वेच्छा अल्प असून ते ईश्‍वरेच्छेने वागतात. यामुळे एखाद्या विशिष्ट दिशेतून सूक्ष्मातून आक्रमणे होत असतांना त्यांच्याकडून त्या दिशेकडे जाण्याच्या किंवा खेळण्याच्या माध्यमातून चैतन्य प्रक्षेपित केले जाऊन कष्ट अल्प केले जातात.

५. पू. भार्गवराम यांच्या केसांतून मारक शक्ती प्रक्षेपित होते. यामुळे त्यांचे केस लालसर छटा असलेले आणि विशिष्ट आकार (सर्पाकार) असलेले जाणवतात.

६. पू. भार्गवराम यांच्याभोवती सूक्ष्मातून लाल, निळ्या आणि पिवळ्या या रंगांची मोठी प्रभावळ दिसते. यांतून त्यांच्याकडून मोठ्या अंतरापर्यंत शक्ती आणि चैतन्य यांच्याद्वारे कार्य केले जाते. त्यांच्या स्थितीत होणार्‍या पालटानुसार त्यांच्या देहाभोवतीच्या प्रभावळीतील रंगांचे क्रम आणि त्यांची व्याप्ती यांमध्ये पालट होतात.

७. पू. भार्गवराम स्थुलातून बाल्यावस्थेत असले, तरी सूक्ष्मातून त्यांच्या ठिकाणी श्रीराम आणि परशुराम यांचे तेजस्वी ऋषि रूप दिसते.

८. पू. भार्गवराम यांच्यात प्रगट क्षात्रतेज आणि अप्रगट ब्राह्मतेज आहे. यामुळे त्यांच्याजवळ गेल्यावर चैतन्य मिळण्याची, तसेच मन निर्विचार होण्याची अनुभूती येते.

९. पू. भार्गवराम यांची साधना ध्यानमार्गाची असून बालरूपात वागण्याच्या माध्यमातून ते भक्तीयोगाचा आनंद घेत इतरांनाही त्याचा आनंद देत आहेत. त्यांच्यातील भक्तीयोगाचे प्रगटीकरण झाल्यावर त्यांचे अनाहतचक्र, कपाळ आणि चेहरा सूक्ष्मातून निळसर दिसतात.

१०. पू. भार्गवराम यांच्या डोक्याभोवती पांढर्‍या रंगाची प्रभावळ कार्यरत असते. त्यांच्यातील ज्ञान आणि वैराग्य यांचे ते प्रतीक आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०१९, रात्री ७.०५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्रास देतात. ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात वाईट शक्ती, उदा. राक्षस, पिशाच तसेच करणी, यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखाचा उर्वरित भाग लवकरच प्रसिद्ध करत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF