भारतात ‘भारतीयता’ नसणे, हे दुर्दैवी !

आजमितीस आपली ओळख भारतीय, अशी आहे आणि आचार, विचार मात्र भारतीय नाहीत. विदेशी चालीरीतींच्या जोखडात स्वतःला गुरफटून घेतल्याने भारतीय संस्कृती, सभ्यता या गोष्टींना केव्हाच तिलांजली देण्यात आली आहे. याउलट एक विदेशी भाषा (इंग्रजी) कोट्यवधी नागरिकांना कशा प्रकारे त्यांच्या मूळ गोष्टींपासून लांब नेऊ शकते, याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे ‘भारत’ होय.

‘पोशाख’ (तंग-तोकडे कपडे), ‘खानपान’ (जंक फूड), ‘रोग वाढवणारी रासायनिक खतांची शेती’, ‘आजारांवर उपयुक्त असलेल्या आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा विसर’, ‘लिव्ह-इन- रिलेशनशिप’, ‘विभक्त कुटुंबपद्धती’, ‘इंग्रजी शब्दांचा उपयोग न करता मातृभाषेत १ मिनिटही बोलता न येणे’, ‘केवळ अभ्यास एके अभ्यास’, ‘त्यातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा’, ‘प्रगत होण्याच्या नावे लहानपणापासून भ्रमणभाषच्या उपयोगाचा अतिरेक’, ‘क्रिकेटचे बेसुमार वेड’, ‘मैदानी खेळांची आवड न रहाणे’, ‘डिस्को-पब यांचे आकर्षण’, ‘सर्वधर्मसमभाव’, ‘हिंदूंमध्ये स्वतःच्या धर्माविषयीच्या माहितीचा अभाव’, ‘राष्ट्रविषयक कर्तव्यांची जाणीवही नसणे’, सर्वदूर पसरलेली अश्‍लीलता आदी प्रमुख सूत्रांकडे कटाक्ष टाकला असता, असे लक्षात येईल की, ‘या गोंधळात आपण प्रतिदिन वावरत आहोत’. यामध्ये भारतीय संस्कृती, आचार यांचा कुठेच लवलेशही नाही. भारतियाप्रमाणे जीवनमान जगणारे नागरिक पहाण्यास मिळणे दुर्मिळच झाले आहे. भारताला महान होण्यापासून कोण रोखत आहे ? , तर भारतीयच भारताला त्यापासून रोखत आहेत.

विदेशांतील लोक त्यांच्या देशात तेथील वातावरणाप्रमाणे त्यांना आवश्यक असलेला, त्यांच्या चालीरीतींचा भाग असलेला पोशाख परिधान करत असतात. आपण भारतीय असूनही येथे विदेशी लोकांप्रमाणे पोशाख घालण्याची चढाओढच चालू असल्याचे दिसते. विशेषतः स्त्रियांसाठी सोयीचे, गैरसोयीचे काय ? हे सूत्र विचार करण्याच्याही पलीकडे गेले आहे. जी भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांमुळे समाज अन् देश यांचे कल्याण होऊ शकते. त्याचीच पारख करण्याची दृष्टी नसणे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ? माझी आर्थिक स्थिती कायम चांगली असली पाहिजे, आरामदायी नोकरी पाहिजे, व्यवसायात प्रगती पाहिजे आदी लक्षात घेता ‘मला काय पाहिजे ?’, याची मागणी मोठी आहे; पण ‘मी ‘भारतीय’तेचा प्रसार करण्यासाठी काय केले पाहिजे कि, ज्यामुळे समस्त देशाचेच हित होणार आहे आणि पर्यायाने माझ्या वैयक्तिक इच्छाही पूर्ण होणार आहेत, याचा कृतीशील विचार केला पाहिजे.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF