डॉ. मिस्किता आणि हिंदु धर्म !

संपादकीय

जन्म झालेल्याचा मृत्यू अटळ असतो. जगातील कुठलीही मानवी शक्ती कोणाचाही मृत्यू रोखू शकत नाही. मृत्यू हे त्रिकालाबाधित सत्य आहे. खरे तर व्यक्ती जन्म घेऊन या ग्रहावर येते, तीच मुळात पाहुणा म्हणून. सर्वसाधारणपणे ७० – ७५ वर्षे जीवन जगले की, ती हा ग्रह सोडून निघून जाते. प्रत्येक जिवाला विशेषतः साधना करणार्‍या जिवांना मुळाकडे, म्हणजेच परमेश्‍वराकडे जाण्याची नैसर्गिक ओढ असते. व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाविषयी महान हिंदु धर्मात अत्यंत विस्ताराने सांगून ठेवले आहे, किंबहुना अखिल मानव जातीला इतके सखोल ज्ञान देणारा हा पृथ्वीवरचा एकमेव धर्म आहे. या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्याचे कारणही तसेच आहे. गोवा राज्याचे माजी अनिवासी आयुक्त तथा राज्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचे ८ जुलै या दिवशी मुंबई येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ७० वर्षीय डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी त्यांच्यावर हिंदु संस्कृतीनुसार अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अर्थात् त्यांच्या कुटुंबियांनी ती पूर्ण केली. डॉ. मिस्किता हे ख्रिस्ती पंथीय. त्यांनी व्यक्त केलेल्या या इच्छेविषयी, तसेच त्यांच्या कुटुंबियांनी ती पूर्ण केल्याविषयी भल्याभल्यांच्या विशेषतः पुरोगामी, धर्मांध यांच्या भुवया उंचावल्या; परंतु हिंदु धर्माचे महत्त्व वाढू नये; म्हणून त्यांनी याविषयी तोंड बंद ठेवणेच पसंत केले.

कुठे हरवली शोध पत्रकारिता ?

‘ख्रिस्ती पंथीय असूनही डॉ. मिस्किता यांनी हिंदु संस्कृतीनुसार अंत्यसंस्कार करण्याची इच्छा का व्यक्त केली ?’, ‘त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी कुठली भावना होती ?’, ‘उभी हयात ख्रिस्ती पंथात घालवूनही जीवनप्रवासाच्या अंतिम क्षणी त्यांनी ख्रिस्ती पंथाची साथ का सोडली ?’, ‘त्यामागे त्यांचा कोणता विचार होता ?’, असे अनेक प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहेत. एवीतेवी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसायची सवय असलेल्या (आणि त्यालाच वृत्तपत्रांचे घटनादत्त स्वातंत्र्य म्हणणार्‍या) हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांनी या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचे कष्ट मात्र जाणूनबुजून घेतलेले नाहीत. कथित शोध पत्रकारितेच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठांचे कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ करून खोटी माहिती प्रसारित करणार्‍या माध्यमांना वरील प्रश्‍नांची उत्तरे शोधावीशी वाटली नाहीत. ‘या प्रश्‍नांच्या उत्तरांमुळे हिंदु धर्म, तसेच त्यातील अगाध तत्त्वज्ञान यांची महानता अधोरेखित होईल’, अशी  भीती त्यांना वाटत असावी. तथापि ‘कोंबडा आरवला नाही; म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही’, हे हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांनी लक्षात ठेवावे. हिंदु धर्मावर पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी, साम्यवादी, आदी बांडगुळांनी कितीही चिखलफेक केली, तरी या धर्माचे महत्त्व तसुभरही न्यून होत नाही. उलट डॉ. मिस्किता यांच्यासारख्या व्यक्तींच्या निर्णयामुळे ते अधिकच वाढत असते.

नतद्रष्ट जन्महिंदूंना चपराक !

अलीकडच्या काळात हिंदुद्वेषी पुरोगाम्यांमध्ये मृत्यूनंतर दफन करण्याची टूम निघाली आहे. अशांना हिंदु धर्म आणि धर्मशास्त्र यांविषयी काडीचाही गंध नसतो. शास्त्र-अशास्त्र, शास्त्रोक्त पद्धतीमुळे केलेल्या कृतींमुळे होणारे सकारात्मक परिणाम यांच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. अशांमध्ये अगदी मोठमोठी नावे सांगता येतील. हा सर्व खटाटोप केवळ स्वतःतील पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी असतो, ज्याला धर्मशास्त्रात काडीमात्र स्थान नसते. अशांच्या तुलनेत डॉ. विल्फ्रेड मिस्किता उजवे ठरतात. जीवनयात्रेची सांगता हिंदु धर्माच्या कुशीत करून ते हिंदु धर्माचे महत्त्व सर्व जगाला कृतीतून पटवून देतात. स्वतःच्या अंतर्प्रेरणेचे ते प्रांजळ प्रगटीकरण असते. जन्महिंदु असलेले पुरो(अधो)गामी यांना तर ही आपल्यासाठी सणसणीत चपराक आहे, हेही लक्षात येत नाही. कुठे उभी हयात हिंदु धर्मात घालवून मृत्यूनंतर स्वतःला दफन करून घेणारे पुरोगामी, तर कुठे ख्रिस्ती असूनही मृत्यूनंतर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार करून घेणारे डॉ. विल्फ्रेड मिस्किता ! म्हणून कालपटलावर पुरोगाम्यांच्या स्मृती पुसल्या जातात, तर डॉ. मिस्किता यांच्यासारखे स्मरणात रहातात.

धर्मांधांनी आत्मपरीक्षण करावे !

डॉ. विल्फ्रेड मिस्किता हे उभी हयात ख्रिस्ती म्हणून जगले. त्यांची तत्त्वे यांनी अंगीकारली होती. ज्या ख्रिस्ती पंथासह त्यांनी त्यांचा जीवनप्रवास केला, त्या पंथाच्या कुशीत शेवटचा श्‍वास घ्यावासा त्यांना का वाटला नाही ? डॉ. मिस्किता हे गोव्याचे रहिवासी. गोव्यावर पोर्तुगिजांनी तब्बल ४५० वर्षे राज्य केले. ‘शांतीचा धर्म’ म्हणवणार्‍या ख्रिस्ती पंथाच्या अनुयायांनी गोव्यातील हिंदूंना कसे बाटवले ?’, त्यांचा कसा अमानुष छळ केला ?, याला इतिहास साक्ष आहे. यावर पुस्तकेच्या पुस्तके उपलब्ध आहेत. अशा बाटवलेल्या असंख्य नवख्रिस्त्यांना ‘आपले पूर्वज हिंदू होते’, हे अगदी व्यवस्थित ठाऊक आहे. आजही अशा अनेक नवख्रिस्त्यांच्या घरात कुलदेवीसमोर श्रीफळ ठेवण्यापासून ते गणपति बसवण्यापर्यंत अनेक धार्मिक प्रथा-परंपरा नेटाने पाळल्या जातात, तसेच हिंदु सण-उत्सवही साजरे केले जातात. डॉ. मिस्किता यांना ‘आपले पूर्वज हिंदू होते’, हे ठाऊक होते, तसे ते गोव्यातील इतर ख्रिस्त्यांनाही ठाऊक आहे; पण डॉ. मिस्किता यांनी तसेच जाहीरपणे बोलून दाखवले. आयुष्यभर हिंदु धर्मापासून दूर रहावे लागल्याची खंत त्यांच्या मनात होती, ती त्यांनी जाता-जाता प्रांजळपणे वरील इच्छेच्या रूपात व्यक्त केली इतकेच. ‘ही भूमिका घेऊन डॉ. मिस्किता यांनी त्यांच्यासारखी कुचंबणा झालेल्या त्यांच्या अनेक बांधवांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. धर्मांध ख्रिस्त्यांनी याविषयी आत्मपरीक्षण केले पाहिजे. उभी हयात ख्रिस्ती पंथानुसार आचरण करूनही जीवनाचा शेवट हिंदु धर्माच्या कुशीत करावासा वाटणे, यातूनच हिंदु धर्माची महानता लक्षात यावी !


Multi Language |Offline reading | PDF