…तेव्हाच खरा पर्यटनविकास !

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी देशातील १७ पर्यटनस्थळांचा विकास करून त्यांना जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवण्याचा संकल्प केला. त्यासाठी अर्थसंकल्पात १ सहस्र ३७८ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या १७ ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ लेण्यांचाही समावेश असणार आहे. ‘देशातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी प्रयत्न होणे’, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अजिंठा-वेरूळची लेणी हा शिल्पकलेचा एक अद्भूत नमुना आहे. युनेस्कोनेही त्याला जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे. दीड-दोन सहस्र वर्षांपूर्वी निर्मिलेल्या या कलाकृती, भिंतींवर चितारलेली चित्रे, मानवी भावभावनांचे चित्रण, कोरीवकाम, सभामंडपाची कलात्मक उभारणी अशी या लेण्यांची कितीतरी वैशिष्ट्ये सांगता येतील. जेव्हा विश्‍वातील अन्यत्रचे नागरिक अंधारयुगात चाचपडत होते, तेव्हा भारतामध्ये कलाक्षेत्रात अत्युच्च कलाकृतींची निर्मिती होत होती. अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावरील प्रयत्न होणे आवश्यक आहे.

आतापर्यंत ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले यांचे संवर्धन करण्याच्या संदर्भात अनेक घोषणा केल्या गेल्या; पण यांतील बहुतांश घोषणा हवेतच विरल्या. भारतामध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक ठिकाणांची मुबलकता आहे; पण त्या ठिकाणची वैशिष्ट्ये पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोेचवली जात नाहीत. महत्त्वाच्या ठिकाणी जे मार्गदर्शक (गाईड्स) उपलब्ध असतात, तेही अभावानेच जाणकार आणि ज्ञानी असतात. आज अनेक पर्यटनस्थळे ही केवळ ‘पिकनिक स्पॉट’ झाली आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ठिकाणे, गडांवरील बुरूज, सुळके, लेणी, भव्य मंदिरे आदी ठिकाणे पहातांना तो तो भाव अन् इतिहास अनुभवण्यापेक्षा तरुण वर्ग ‘सेल्फी’मय झालेला आढळतो. प्रत्यक्ष अनुभव घेण्यापेक्षा भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढणे आणि मौजमजा करणे असाच बहुधा पर्यटकांचा कल दिसून येतो. असे ‘सेल्फि’श तरुण वारसास्थानांची एकप्रकारे अवनतीच करतात.

याच्या उलट परिस्थिती विदेशात असते. स्वतःजवळील वस्तूंचे चांगले ‘मार्केटिंग’ करण्याची कला विदेशींना अवगत आहे. ‘बोलणार्‍यांच्या गोवर्‍याही विकल्या जातात; पण न बोलणार्‍यांचे सोनेही विकले जात नाही’, या म्हणीसारखी काहीशी ही स्थिती आहे. भारतात ‘ज्यांच्याकडे अधिकार आहेत, त्यांना वारसा संवर्धनाविषयीची जाणीव नाही’, ‘जाणीव आहे, तर अधिकार आणि धडाडी नाही’, ‘धडाडी आहे; पण ज्ञानाची उणीवही आहे’, ‘ज्ञान आहे; पण अलिप्तता आहे’, असे काही दोष भारतीय समाजव्यवस्थेत आहेत. ते दूर होतील, तेव्हाच खर्‍या अर्थाने ‘पर्यटन’ विकसित होईल.

– प्रा.(कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF