८.७.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) शिवकुमार ओझा संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यापूर्वी आणि केल्यानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘८.७.२०१९ या दिवशी एक भावसोहळ्यात पू.(डॉ.) शिवकुमार ओझा संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. या सोहळ्याचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कु. मधुरा भोसले

१. कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

अ. कार्यक्रमस्थळी निर्गुण पोकळी कार्यरत होऊन वातावरणातील रज-तम या पोकळीकडे आकृष्ट होऊन ते नष्ट होत असल्याचे जाणवले.

आ. कार्यक्रमस्थळी थोडा दाब जाणवत होता आणि वाईट शक्ती बैठककक्षाच्या अवतीभोवती जमल्याचे दिसले.

२. (डॉ.) शिवकुमार ओझा यांचे बैठककक्षात शुभागमन होणे

अ. (डॉ.) शिवकुमार ओझा यांचे बैठककक्षात शुभागमन झाल्यावर चैतन्य आणि आनंद यांत वृद्धी झाली.

आ. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या ठिकाणी पिवळसर रंगाचा तेजस्वी प्रकाशाचा गोळा कार्यरत असल्याचे जाणवले. ‘हा गोळा म्हणजे श्री. शिवकुमार ओझा यांच्यातील ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे’, असे मला जाणवले.

इ. (डॉ.) शिवकुमार ओझा त्यांचे अनुभव, संस्कृत भाषेचे महत्त्व आणि सनातन हिंदु धर्माची वैशिष्ट्ये यांविषयी सांगत असतांना त्यांच्या वाणीतून ज्ञानतेज आणि ब्राह्मतेज वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरणाची शुद्धी झाली. तेव्हा वातावरणात अष्टगंधाचा सुवास दरवळतांना जाणवला.

ई. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या सर्व देहांची शुद्धी झाल्यामुळे त्यांचा स्थूल देह आणि सूक्ष्म देह निर्मळ झाल्याने त्यांची कांती नितळ झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या हृदयस्थित आत्म्यातून प्रक्षेपित होणारे पिवळसर पांढर्‍या रंगाचे दैवी तेज त्यांच्या देहकांतीतून संपूर्ण वातावरणात पसरतांना दिसले. त्यांच्या डोक्याभोवती पिवळसर रंगाची प्रभा कार्यरत असल्याचे जाणवले. ‘ते संत झाले असून आजपासून त्यांना ‘पू. शिवकुमार ओझा’, असे आदराने संबोधले पाहिजे’, असे देवाने मला सूक्ष्मातून सांगितले.

३. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांना संत म्हणून घोषित करून पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचा सन्मान करणे

अ. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा हे संत झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या ठिकाणी ज्ञानवृद्ध असलेल्या एका ऋषींचे दर्शन झाले.

आ. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्यातील ज्ञानप्राप्तीची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या सरस्वतीदेवीने त्यांचा सन्मान केल्याचे जाणवले.

इ. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या हृदयातील आत्मज्योतीतून प्रगट झालेली निळसर रंगाची भक्तीज्योत वातावरणात विलीन झाली आणि वातावरण भावमय झाले. त्यानंतर त्यांच्या आत्मज्योतीतून पिवळसर रंगाची ज्ञानज्योत त्यांच्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी स्थिरावल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांना आधीपेक्षा उच्चस्तरीय ज्ञानाची प्राप्ती होणार असून त्यांचे लिखाण आधीपेक्षा पुष्कळ प्रभावी होणार असल्याचे जाणवले.

ई. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या मारक शक्तीमुळे त्यांना त्रास देण्यासाठी आलेल्या वाईट शक्तींच्या काळ्या शक्तीचे विघटन झाले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी स्थुलातून पुष्कळ दुर्गंध आला.

उ. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांनी स्वत:चा सन्मान सोहळा साक्षीभावाने पाहिल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर कोणतेही हावभाव दिसत नव्हते.

ऊ. त्यांच्यातील तीव्र जिज्ञासा, धर्मप्रसाराची तीव्र तळमळ, सातत्य आणि सनातन वैदिक हिंदु धर्मावरील दृढ श्रद्धा यांमुळे त्यांच्याकडे ईश्‍वरी कृपेचा पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत येतांना दिसला. तेव्हा वातावरणात शीतलता आणि शांती जाणवली.

ए. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्यावर सरस्वतीदेवीची भरभरून कृपा असल्याने ते ज्ञानाशी संबंधित असणारी विविध सूत्रे सहजरित्या सांगू शकतात. त्यांच्या बुद्धीमध्ये आणि वाणीमध्ये सरस्वतीदेवीचे वास्तव्य असल्याचे जाणवले. त्यामुळे ते विविध विषयांवरील ज्ञानसूत्रे त्यांच्या ओघवत्या वाणीमध्ये उलगडून सांगत असतांना ‘श्रोत्यांना वेळेचे भान रहात नाही आणि ते ज्ञानसूत्रे ऐकून पुष्कळ प्रभावित होतात’, असे जाणवले.

कृतज्ञता

‘हे ईश्‍वरा, तुझ्या कृपेमुळे मला हा संतसोहळा पहाण्याची संधी मिळाली आणि संतांचा सत्संग मिळाला’, यासाठी मी तुझ्या सुकोमल चरणी कृतज्ञ आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF