६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला निपाणी, कर्नाटक येथील चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ३ वर्षे) !

निपाणी, कर्नाटक येथील चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी याची काही गुणवैशिष्ट्ये आपण ५ जुलै २०१९ या दिवशीच्या अंकात पाहिली. त्याच्या आई-बाबांना जाणवलेली त्याची अन्य गुणवैशिष्ट्ये आज पाहूया.

चि. विष्णु पट्टणशेट्टी

१. बाळाच्या जन्मापूर्वी

१ अ. सात्त्विक बाळ होण्यासाठी केलेले उपाय : ‘मी विवाहापूर्वी पत्नीला साधनेचे महत्त्व सांगितले होते अन् तिनेही लगेचच नामजप करायला आरंभ केला होता. विवाह होऊन साधारण वर्षभरानंतर आम्ही मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आम्ही उभयतांनी आमचा कुलदेव श्री वीरभद्र याचा आणि श्री दत्तगुरु अन् श्रीकृष्ण यांचा अधिकाधिक नामजप करण्यास आरंभ केला. फेब्रुवारी २०१५ मध्ये सौ. मीनलला दिवस गेले. आम्ही आमच्या खोलीत सनातनच्या नामपट्ट्यांचे वास्तूछत लावले होते. आम्ही खोलीत रात्रभर नामजप-यंत्रावर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावून ठेवत होतो. प्रतिदिन झोपण्यापूर्वी आम्ही खोलीत तेलाचा दिवा, तसेच सनातनची सात्त्विक उदबत्ती लावत होतो.

१ आ. गरोदरपणी घेतलेली काळजी : गरोदरपणातील ८ व्या आणि ९ व्या मासांत सौ. मीनलने मीठ-पाण्याचे उपाय नियमितपणे केले. ती अधिकाधिक फळे आणि केवळ सात्त्विक आहार घेत असे.

२. बाळाचा जन्म

२ अ. शस्त्रकर्माच्या वेळी पत्नीने नामजपाचे यंत्र जवळ ठेवणे आणि इतरांनाही तो नामजप ऐकतांना चांगले वाटणे : २४.९.२०१५ म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशीला सकाळी सौ. मीनलला दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिला प्रसववेदना होण्यास आरंभ झाल्या. मी दवाखान्यात पोचलो. तेव्हा तिला तीव्र प्रसववेदना होत होत्या. मी तिच्याजवळ नामजपाचे यंत्र ठेवले. त्यावर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होता. त्यानंतर काही मिनिटांतच तिला होणार्‍या तीव्र वेदना थांबल्या आणि ती उठून बसली. आमचे कुटुंबीय, दवाखान्याचा पूर्ण कर्मचारीवर्ग आणि तेथील आधुनिक वैद्य यांना यंत्रावर चालू असलेला नामजप ऐकतांना चांगले वाटत होते. त्यांनी तसे बोलूनही दाखवले. आम्ही सायंकाळपर्यंत मीनलची प्रसूती नैसर्गिकरित्या होण्याची वाट पाहिली. नंतर शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सौ. मीनलला जेव्हा शस्त्रकर्मगृहात नेण्यात आले, तेव्हा तिने नामजपाचे यंत्र समवेत नेले आणि स्वतःच्या उशाशी ठेवले. शस्त्रकर्माची पूर्वसिद्धता चालू असतांना तेथील आधुनिक वैद्यांनी मीनलकडे त्या यंत्राविषयी विचारणा केली. ‘‘हे यंत्र शस्त्रकर्मगृहात नेण्यास माझ्या पतीने सांगितले आहे’’, असे तिने त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘चांगले आहे. यंत्रावरील नामजप चालूच ठेवा.’’ सायंकाळी ५.५४ वाजता तिला मुलगा झाला.

२ आ. ‘मुलगी झाली, तर तिचे नाव ‘नारायणी’ ठेवायचे आणि मुलगा झाला, तर त्याचे नाव ‘विष्णु’ ठेवायचे, हे मी पूर्वीच ठरवले होते. आम्हाला मुलगा झाल्यामुळे आम्ही त्याचे नाव ‘विष्णु’ ठेवले. योगायोगाने त्याचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशीला; म्हणजेच विष्णूशी संबंधित तिथीलाच झाला.

३. बाळाच्या जन्मानंतर

३ अ . जन्म ते १ वर्ष : ‘चि. विष्णूच्या पहिल्या वाढदिवसाच्या पूर्वी त्याला सनातनच्या रामनाथी (गोवा) आश्रमाला घेऊन जावे’, अशी माझी इच्छा होती. ११.९.२०१६ या दिवशी; म्हणजे त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या २ दिवस आधी आम्हाला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली.’

– सौ. मीनल आणि डॉ. अनिरुद्ध पट्टणशेट्टी (चि. विष्णूचे आई-बाबा), निपाणी, कर्नाटक. (१९.२.२०१९)

३ आ. २ ते ३ वर्षे

३ आ १. गोड बोलणे : ‘विष्णु घरात किंवा बाहेर बोलतांना ‘तो किती छान बोलतो !’, असे प्रत्येक जण म्हणतो. विष्णूचे बोलणे पुष्कळ गोड आणि व्यक्तीनिष्ठ आहे. तो कधीही असंबद्ध बोलत नाही.

३ आ २. प्रेमभाव

अ. एकदा माझे आजोबा आजारी होते. तेव्हा तो त्यांच्या जवळ बसून त्यांचे डोके दाबून देत असे.

आ. विष्णु मला घरातील सर्व कामांत साहाय्य करतो. मी घर झाडत असतांना तो स्वतः हातात झाडू घेऊन घर झाडण्याचा प्रयत्न करतो.’

– सौ. मीनल अनिरुद्ध पट्टणशेट्टी (१९.२.२०१९)

इ. ‘विष्णु अतिशय प्रेमळ आहे. तो नेहमी मला आणि त्याच्या आईला मिठी मारतो अन् आमची पापी घेतो. तो दिवसभरात करावयाच्या कृतींबद्दल विचारत असतो. कधी कधी तो प्रौढ व्यक्तीप्रमाणे वागतो.

ई. सौ. मीनल जेव्हा मला औषधाची गोळी देते, तेव्हा विष्णु लगेच जाऊन माझ्यासाठी पाणी आणतो आणि म्हणतो, ‘बाबा, औषध घ्या.’

४. चि. विष्णूची अन्य वैशिष्ट्ये

अ. सध्या चि. विष्णु ३ वर्षांचा आहे. त्याला माती, वाळू आणि पाणी यांत खेळायला फार आवडते. त्याला गाड्या, दुचाकी, ठोकळे किंवा ‘सॉफ्ट टॉईज’ यांच्याशी खेळायला आवडत नाही.

आ. विष्णु त्याच्या बालवाडीतील सर्व मुलांपेक्षा वयाने लहान आहे. तो वयाने सर्वांत लहान असला, तरी तो वर्गातील इतरांची काळजी घेतो. तो बालवाडीतील शिक्षिका, मावशी, रिक्शावाले मामा या सर्वांशी बोलतो.

५. विष्णुसमवेत तीर्थक्षेत्री गेल्यावर आलेल्या अनुभूती

५ अ. कामाक्षी मंदिर, कांचीपुरम् : आम्ही कांचीपुरम् येथील कामाक्षी मंदिरात गेलो असतांना देवीच्या दर्शनासाठी एक घंटा रांगेत उभे होतो. देवीचा शृंगार चालू असल्याने दर्शन काही काळ थांबवण्यात आले होते. त्या वेळी विष्णु पावणे दोन वर्षांचा होता. आरंभीची ४५ मिनिटे विष्णु छान खेळत होता; परंतु नंतर भाविकांची गर्दी आणि गरमी यांमुळे तो अस्वस्थ होऊन चिडचिड करू लागला. आमची ही स्थिती पाहून संपूर्ण रांगेतील लोकांनी आम्हाला पुढे जाण्यास सहकार्य केले. काही वेळातच आम्हाला देवीचे दर्शन झाले.

५ आ. अक्कलकोट : डिसेंबर २०१७ मध्ये आम्ही चि. विष्णूला घेऊन अक्कलकोटच्या स्वामी समर्थ यांच्या मंदिरात गेलो होतो. तेथे गेल्यावर तो स्वामी समर्थांना पहाण्यास उत्सुक होता. स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर आल्यावर त्याने ‘स्वामी समर्थ महाराज की जय’ असा जयघोष केला. तेथे एक स्वामीभक्त ध्वनीक्षेपकावरून स्वामींचा जप करत होता. विष्णु त्याच्याकडे गेल्यावर त्याने हातातील ध्वनीक्षेपक विष्णूकडे दिला. तेव्हा विष्णूनेही त्यावरून स्वामींचा जप केला अन् त्याच्यामागून इतर भक्तांनीही स्वामींचा जप केला. समाधीचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. तेेथे भाविकांना अभिषेक करण्यासाठी स्वामींची पंचधातूची मूर्ती ठेवण्यात आली आहे. विष्णूला त्या मूर्तीची पूजा करायची होती. त्याने संपूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीभावाने स्वामींच्या मूर्तीला कुंकू अन् गंध लावून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा जपही केला.

५ इ. पंढरपूर : २७.१२.२०१८ या दिवशी आम्ही पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला गेलो होतो. मंदिरातील सभागृहात भजन चालू होते. ते ऐकून विष्णू भारावून गेला आणि त्याने आम्हालाही तेथे बसून भजन ऐकण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आम्ही सर्वांनी तेथे बसून दोन अभंग ऐकले आणि मग देवाचे दर्शन घेतले. विठ्ठलाचे दर्शन घेतांना मी विष्णूचे मस्तक विठ्ठलाच्या चरणांवर टेकवले. त्या वेळी त्याने मोठ्याने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ असा नामजप केला. नंतर मंदिराच्या आवारातील प्रत्येक देवतेचे दर्शन घेतांना त्याने मूर्तीच्या चरणांवर डोके टेकवून प्रार्थना केली.

५ ई. नरसोबाची वाडी : एकदा आम्ही नरसोबाची वाडी येथील श्री नरसिंह सरस्वती मंदिरात गेलो होतो. ती वेळ संध्याकाळच्या आरतीची असल्याने तेथे पुष्कळ गर्दी होती. आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे होतो. तेथील सुरक्षा रक्षकाने आम्हाला मंदिरातील एका विशिष्ट स्थळी नेऊन उभे केले. तेथून आम्हाला देवाचे दर्शन चांगल्याप्रकारे होत होते. आरती संपेपर्यंत आम्ही तेथेच उभे होतो; पण कोणीही आम्हाला हटकले नाही. विष्णु समवेत कोणत्याही मंदिरात गेल्यावर तेथील पुजारी वा महाराज विष्णूला बोलावून प्रसाद देतात आणि त्याच्यामुळे आम्हालाही प्रसाद मिळतो.’

६. विष्णूतील स्वभावदोष

तो फार हट्टी आहे.’

– सौ. मीनल आणि डॉ. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, कर्नाटक. (१९.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF