५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील चि. अक्षदा रूपेश किंद्रे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अक्षदा रूपेश किंद्रे ही एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. अक्षदा रूपेश किंद्रे हिची आई आणि नातेवाईक यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. अक्षदा रूपेश किंद्रे

१. जन्मापूर्वी

अ. ‘मला गर्भारपणी उलट्या होत असत, तरी मी ७ मास नोकरी करू शकले. हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच शक्य झाले.

आ. मी सतत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करत होते. मी नामजप करत असतांना आणि भजने ऐकत असतांना मला बाळाची हालचाल अधिक जाणवत असे. मला ते आनंददायी वाटत असे.

२. प्रसुती

माझे शस्त्रकर्म होत असतांना मी नामजप करत होते. त्यामुळे मला काहीच त्रास जाणवला नाही.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ६ मास

३ अ १. जन्मानंतर बाळाच्या मुखावरचे तेज आणि तिची दृष्टी पाहून ‘चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. मला ती प्रसन्न वाटली.

३ अ २. आधुनिक वैद्यांनी बाळाला कावीळ झाली असल्याचे सांगणे आणि गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर दुसर्‍याच दिवशी आधुनिक वैद्यांनी कावीळ पूर्णपणे बरी झाली असल्याचे सांगणे : बाळाच्या जन्मानंतर तिसर्‍या दिवशी आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘बाळाला कावीळ झाली आहे. तिला २ – ३ दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल.’’ त्या वेळी मी गुरुदेवांना ‘बाळाचा आजार लवकरात लवकर बरा होऊ दे’, अशी प्रार्थना केली. दुसर्‍याच दिवशी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘बाळाची कावीळ पूर्णपणे बरी झाली आहे.’’ तेव्हा मी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

३ अ ३. हसतमुख

अ. अक्षदा अन्य मुलांप्रमाणे झोपेतून उठल्यावर कधीच रडत नाही. ती सकाळी हसत उठते. ती घरी आलेल्या व्यक्तींकडे हसत जाते.’

– सौ. दीपाली किंद्रे (आई), पनवेल

आ. ‘तिच्याकडे पाहिल्यावर चांगली स्पंदने जाणवतात. तिला पाहून माझ्या मनाला आतून शांत वाटते.’ – सौ. शकुंतला किंद्रे (आजी), पनवेल

३ अ ४. देवाची ओढ

अ. ‘ती भ्रमणभाषवर लावलेली भक्तीगीते ऐकते; मात्र अन्य गाणी लावल्यास तिला आवडत नाहीत. ती नामजप ऐकत दूध पिते. मी नामजप लावायला विसरल्यास ती त्रास देते. अक्षदा रडत असतांना नामजप किंवा भजन लावल्यावर ती शांत होते. तिला ‘ज्योतसे ज्योत जगाओ ।’ ही आरती फार आवडते.

आ. मी नामजप करत असतांना तीही ओठ हलवते. त्या वेळी ‘ती नामजप करत आहे’, असे जाणवते. ती २ मासांची असल्यापासून स्पष्टपणे ‘ॐ’ म्हणते.

इ. अक्षदा ४ मासांची असतांना आम्ही तिला पनवेल येथील गुरुपौर्णिमा सोहळ्याला घेऊन गेलो होतो. तिथे तिने कसलाही त्रास दिला नाही.’

– सौ. दीपाली किंद्रे

ई. ‘अक्षदाला ‘विठ्ठल विठ्ठल’, असे म्हणायला सांगितल्यावर ती टाळ्या वाजवायची.’ – श्री. उत्तम बाजीराव किंद्रे (आजोबा), पनवेल

उ. ‘तिची अंघोळ झाल्यावर ती नामजप, भजन आणि अथर्वशीर्ष ऐकत झोपायची.

३ आ. वय ६ ते १० मास 

३ आ १. तिला ‘बाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यास ती कृष्णाच्या चित्राकडे बोट दाखवते आणि ‘जय बाप्पा’, असे म्हणते.’

– सौ. दीपाली किंद्रे

३ आ २. ‘तिला खाऊ भरवत असतांना ती खात नसल्यास तिला ‘बाप्पाचा घास आहे. कृष्णाचा घास आहे’, असे म्हटल्यावर ती आनंदाने खाते.’ – सौ. शकुंतला किंद्रे

३ आ ३. ‘आम्ही ‘जय जय गुरुदेव ।’, असे म्हणाल्यावर ती हात वर करून ‘जय’ असे म्हणते.’ – श्री. उत्तम बाजीराव किंद्रे

३ आ ४. ‘अक्षदाचे आजोबा नामजप करत असतांना ती त्यांच्या मांडीवर जाऊन शांतपणे बसते. त्यांचे निरीक्षण करते आणि त्यांच्याप्रमाणे नामजप करण्याचा प्रयत्न करते.

३ आ ५. समंजस

अ. ‘ती ६ मासांची झाल्यानंतर मी पुन्हा नोकरीला जायला लागले. त्या वेळी मला तिची काळजी वाटायची; परंतु ती आजी-आजोबांसह चांगली रहायची. तिने त्यांना कसलाही त्रास दिला नाही.’

– सौ. दीपाली किंद्रे

आ. ‘ती आजारी असतांनाही शांत असते.’ – सौ. निलीमा विजय तुपे (आत्या), पनवेल

३ आ ६. सतर्कता : ‘ती स्वतःला लागणार नाही, अशा पद्धतीने अलगद आणि व्यवस्थित बसते.’ – सौ. शकुंतला किंद्रे

३ आ ७. घोषणा द्यायला आवडणे : ‘ती ८ मासांंची असतांना आम्ही तिला पनवेल येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला घेऊन गेलो होतो. तेव्हा ती फार आनंदी होती. या सभेत घोषणा द्यायला लागल्यावर अक्षदाही सर्वांप्रमाणे हात वर करून ‘जय’ असे म्हणत होती.  तेव्हा सर्व जण तिच्याकडे कौतुकाने पहात होते.

३ आ ८. आध्यात्मिक उपायांची आवड : तिला अत्तर-कापराचे उपाय केलेले आवडतात. ती शांत बसून उपाय करून घेते. तिच्यावरील आवरण काढतांनाही ती शांत बसते. तिचे आजी-आजोबा आवरण काढत असतांना ती त्यांचे निरीक्षण करते.’

– सौ. दीपाली किंद्रे

३ आ ९. ‘आपण तिला रागावलो की, ती लगेच येऊन पाय धरते. स्वतः हसून दुसर्‍याला पण हसवते.

३ आ १०. आनंदी असणे : घरी कोणीही आले, तरी ती आनंदाने हसून त्यांचे स्वागत करते. आपला सर्व ताण तिला पाहून निघून जातो.

४. अनुभूती

अ. तिला अंघोळ घालत असतांना ‘माझ्यावर उपाय होत आहेत’, असे मला जाणवते. तिला अंघोळ घालून झाल्यावर माझ्यातील जडपणा न्यून होऊन उत्साह वाढतो आणि हलकेपणा जाणवतो.

आ. ‘अक्षदा, तू कृष्णाचे बालरूप आहेस’, असे तिला सांगितल्यावर ती आनंदाने हसते आणि माझ्या तोंडवळ्यावरून हात फिरवते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्हाला हे गुणी बाळ मिळाले. आम्ही त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत. ‘गुरुदेवांना अपेक्षित असे आम्हाला तिला घडवता येऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. शकुंतला किंद्रे (१८.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF