मुफ्तींची मुक्ताफळे !

संपादकीय

आपण भारताच्या विरोधात आणि धर्मांधांच्या बाजूने कसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सातत्याने राष्ट्रद्रोही विधाने करणार्‍या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तथा पीडिपी या पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना अमरनाथ यात्रा यंदा सुरळीत चाललेली पाहून त्रास होऊ लागला आहे. ‘अमरनाथ यात्रेकरूंसाठी केलेल्या सुरक्षेव्यवस्थेमुळे काश्मिरी जनतेला त्रास सहन करावा लागत आहे’, असे प्रसारमाध्यमांना त्यांनी सांगितले. यावरून ‘त्या थेट आतंकवाद्यांचीच तळी उचलून धरतात’, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कधी त्यांच्या डोळ्यांत भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या ‘टी-शर्ट’चा भगवा रंग खुपतो, कधी साध्वी प्रज्ञासिंह यांना तिकीट देण्याविषयी त्यांना आक्षेप असतो, कधी ‘कलम ३५’ हटवण्यावर आक्षेप असतो, तर कधी त्या सैन्याला काश्मीरमध्ये विशेषाधिकार देणारा ‘अफस्फा कायदा’ हटवण्याची मागणी करतात. धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी तीव्र हिंदुद्वेषातून त्या थेट राष्ट्रद्रोही विधाने सातत्याने करत असतात.

कांगावखोर मुफ्ती !

हिंदूंना त्यांच्या परिसरातून उखडून फेकायचे, हेच आतंकवाद्यांचे युद्धतंत्र आहे. त्यानुसार त्यांनी काश्मीरमधून हिंदूंना हाकलून लावले आहे. आतंकवाद्यांनी काश्मीरमधील प्रसिद्ध मंदिरे तर पाडलीच आहेत. अमरनाथला वर्षांतून एकदा सहस्रोंच्या संख्येने एकत्र येणार्‍या हिंदूंचे एकत्रीकरण आतंकवाद्यांना सहन कसे होणार ? त्यामुळे त्यांनी अमरनाथ यात्रेवर आक्रमणे करायला आरंभ केला. वर्ष २००० मध्ये आक्रमण करून ३०, तर वर्ष २०१७ मध्ये ७ भाविकांना त्यांनी मारले. आतंकवाद्यांच्या आक्रमणांमुळे काही काळ ही यात्रा जवळजवळ बंद पडल्याप्रमाणेच झाली होती. नंतर सैन्याच्या साहाय्याने ती चालू झाली. आता अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाल्यावर अत्यंत कडेकोड बंदोबस्त ठेवून भाविकांना निर्धास्त वाटावे, अशा प्रकारचे वातावरण त्यांनी सिद्ध केले आहे आणि नेमके तेच मुफ्ती यांच्या डोळ्यांत खुपत आहे. हिंदु भाविकांचे रक्षण करणार्‍या सुरक्षायंत्रणांचा मुफ्ती यांना त्रास वाटतो, याचा अर्थ काय होतो ? हिंदूंचे प्राण हकनाक जावेत, अशीच त्यांची इच्छा आहे का ? सुरक्षाव्यवस्थेमुळे स्थानिकांना त्रास होण्याचा मुफ्ती यांचा कांगावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. एक तर भारतीय सैन्य कधीच कोणाला त्रास देत नाही; उलट ते स्थानिकांना साहाय्यच करत असते, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. अंगावर दगडफेक होऊनही जे सैन्य हातात बंदुका असून दगडफेक्यांना मारत नाहीत, तेे सैन्य सामान्य काश्मिरी नागरिकांना कशाला त्रास देईल; परंतु काहीच सूत्र न मिळाल्याने ‘स्थानिक नागरिकांसाठी २ घंटे मुख्य रस्ता बंद ठेवला’ एवढ्याच क्षुल्लक कारणावरून मुफ्ती यांनी हिंदुद्वेषी फुत्कार सोडणे चालू केले. अप्रत्यक्षपणे ‘भारतातील नागरिकांना आतंकवाद्यांपासून संरक्षण देऊ नका’, असा अर्थ अभिप्रेत असणार्‍या या भारताच्याच एका राज्यातील नेत्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यात्रेकरूंसाठी महामार्ग २ घंटे बंद ठेवण्यासारखे काही किरकोळ पालट व्यवस्थेला करावे लागले असतील, तरी त्याला कोण उत्तरदायी आहे ? मुफ्तींसारखे काश्मीरमध्ये अनिर्बंध सत्ता गाजवणारेच या स्थितीला कारणीभूत आहेत. मुफ्ती यांनी काश्मीरमधील वातावरण आतंकवादाच्या सावटाखालून काही प्रमाणात जरी भयमुक्त केले असते, तर ही वेळ कशाला आली असती ? एकीकडे आतंकवादाला पोसणारी विधाने करायची आणि दुसरीकडे हिंदूंच्या यात्रेला दिलेल्या सुरक्षेव्यवस्थेमुळे स्थानिकांना त्रास होतो म्हणायचे, हा निवळ कांगावखोरपणा आहे. सैन्यावर आक्षेप घेणार्‍या मुफ्ती आतंकवाद्यांना ‘हिंदूंच्या यात्रेकडे डोळे वर करून पहाल तर याद राखा’, असे ठणकावून का सांगत नाहीत ?

८ जुलैला आतंकवाद्यांनी त्यांचा म्होरक्या बुरहान वानी याला ठार मारल्याच्या निषेधार्थ ‘काश्मीर बंद’ची हाक दिली होती. त्यामुळे ४ सहस्र भाविक वाटेत अडकले होते. या ‘काश्मीर बंद’च्या विरोधात मुफ्ती काही बोलत नाहीत. याचाच अर्थ या बंदला त्यांचा उघड पाठिंबा होता. ‘आतंकवाद्यांना पाठिंबा देणारे आणि या देशातील बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात उभे ठाकणारे देशद्रोही आहेत’, असे हिंदूंना वाटले तर चूक ते काय ? जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही मुफ्ती यांची ‘री’ ओढली आहे. याउलट स्थानिकांनी माध्यमांना सांगितले, ‘प्रतिवर्षी मोठ्या संख्येने यात्रेकरू यावेत, असे आम्हाला वाटते; कारण आमचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. आम्ही त्यांच्यासाठी बर्फ काढून रस्ते मोकळे करणे यांसारखी कामेही करतो.’ ‘सुरक्षाव्यवस्था स्थानिक नागरिकांच्या विरोधात आहे’, असे म्हणणार्‍या मुफ्ती आणि अब्दुल्ला यांना ही सणसणीत चपराकच होय.

तीर्थयात्रा या हिंदूंच्या जीवनाचे एक अंग आहेत. कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी हिंदू देवदर्शनासाठी पदरमोड करून जातात. १ जुलैपासून चालू झालेल्या  अमरनाथ यात्रेत ७ दिवसांत ९५ सहस्र हिंदूंनी भगवान शिवाचे दर्शन घेतले आहे. ‘कुठल्याही क्षणी आतंकवादी आक्रमण करू शकतात’, हे माहीत असूनही प्रतीवर्षी सहस्रो हिंदू अमरनाथ यात्रेला जातात. अमरनाथ येथे भगवान शंकरांनी पार्वतीमातेला अमरत्वाचे रहस्य समजावले होते. सनातन हिंदु धर्माची निर्मिती अमरत्वाची देण घेऊनच झाली आहे; मात्र हे सद्यःस्थितीत हिंदूंच्या धार्मिक यात्रा या आतंकवादाचे सावट आणि धर्मांध नेत्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेष यांच्या ओझ्याखाली निघत आहेत. हे चित्र सरकारला पालटावे लागेल. ‘सरकारने अमरनाथ यात्रेकरूंसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवलाच आहे; आता त्यांनी अशा हिंदुद्वेष्ट्यांचाही बंदोबस्त करून यात्रा अधिक सुरळीत करावी’, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.


Multi Language |Offline reading | PDF