रागावर नियंत्रण नसल्याचे दुष्परिणाम !

नोंद

‘‘राग’ हा षड्रिपूंपैकी एक ! काही लोक रागावर नियंत्रण ठेवू शकतात, तर काहींना ते शक्यच होत नाही. राग अनावर झाल्याने समोरच्या व्यक्तीची हत्या करण्यापर्यंत मजल गेल्याच्या दोन घटना उत्तर महाराष्ट्रात घडल्या. गेल्याच आठवड्यात नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील नवी हिंगणी या गावात ‘वाकाड रे बबल्या’ हे अहिराणी भाषेतील गाणे म्हणत असल्याचा राग येऊन दोन महिला आणि दोन पुरुष यांनी एका विवाहित तरुणाची हत्या केली. तसेच जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून २९ जून या दिवशी मुकेश सपकाळे या महाविद्यालयीन तरुणाची चॉपरने भोसकून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. महाविद्यालयात ‘जीवन जगण्याचे शिक्षण मिळते की जीवन संपवण्याचे ?’, असा प्रश्‍न यामुळे पडतो.

दुपारी २ वाजता मुकेश सपकाळे याची त्याच्या घरात राहिलेली कागदपत्रे घेऊन लहान भाऊ रोहित सपकाळे हा महाविद्यालयात आला होता. महाविद्यालय परिसरात रोहितचा इच्छाराम वाघोदे नावाच्या युवकाच्या दुचाकीला धक्का लागला. इच्छाराम याने रोहितला शिवीगाळ करण्यास आरंभ केला. हे पाहून मुकेश पुढे आला. त्याला ६ जणांनी घेरून मारहाण केली. मुकेशने किरण हटकर नावाच्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. याचा राग अनावर झाल्याने किरणने मुकेशची हत्या केली.

मुकेशची हत्या करणार्‍या सर्व संशयितांनी ४-५ दिवसांपूर्वीच सध्या बहुचर्चित असलेला ‘कबीर सिंग’ हा हिंदी चित्रपट पाहिला होता. चित्रपटातील मुख्य भूमिका असलेला नायक शाहिद कपूर हा एका वैद्यकीय महाविद्यालयाचा ‘टॉपर’ (सर्वोच्च गुण मिळवणारा) विद्यार्थी असतांनाही ‘रॅगिंग’ करतो. तेथे त्याचे प्रेमप्रकरण घडते. मुलीच्या कुटुंबियांचा विवाहाला विरोध होतो. प्रेमभंग झाल्याने त्याचा संताप होतो. तो रागीट बनतो. याच नायकाच्या भूमिकेत संशयित मारेकरी किरण हटकर यानेही स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याने शहरात दहशत निर्माण करण्याचे ठरवले; मात्र या महाविद्यालयात पूर्वीपासून ‘लिंबू राक्या’ नावाच्या गुंडाची दहशत होती. त्यामुळे लिंबू राक्याला संपवणे हेच किरणच्या डोक्यात होते. त्यापूर्वी मुकेशची घटना घडली आणि मुकेशचा बळी गेला.

मुकेशची हत्या करणार्‍या सर्वच्या सर्व संशयितांपैकी एकही या महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही. असे असतांना हे गुंड प्रवृत्तीचे तरुण महाविद्यालय परिसरात येतातच कसे ?, असा प्रश्‍न निर्माण होतो.

१९ ते २३ वर्षे वय असलेले तरुण एका काल्पनिक चित्रपटाच्या नायकाचा ‘आदर्श’ डोळ्यासमोर ठेवत इतरांचे प्राण घेत आहेत. हे आजची तरुण पिढी भरकटली असल्याचे सूचक आहे. यावर एकमात्र उपाय म्हणजे शिक्षणपद्धतीत ‘धर्माधिष्ठित’ पालट करणे अन् अशा चित्रपटांची निर्मिती रोखणे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव


Multi Language |Offline reading | PDF