पू. भार्गवराम प्रभु (वय २ वर्षे) यांच्या चौलकर्माचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनचे मंगळूरू (कर्नाटक) येथील बाल संत पू. भार्गवराम प्रभु हे सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. त्या निमित्ताने त्यांच्यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण लिखाण प्रसिद्ध करत आहोत. 

४.७.२०१९ या दिवशी पू. भार्गवराम प्रभु (वय २ वर्षे) यांचा चौलसंस्कार (जावळ काढण्याचा विधी) सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पार पडला. या विधीचे पौरोहित्य सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी केले. या विधीचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

१. चौलकर्म विधीला आरंभ होण्यापूर्वी आणि पू. भार्गवराम यांचे सभागृहात आगमन झाल्यावर जाणवलेली सूत्रे

विधीला आरंभ होण्यापूर्वी सभागृहामध्ये पुष्कळ दाब आणि निरुत्साह जाणवत होता. जेव्हा सभागृहामध्ये पू. भार्गवराम यांचे शुभागमन झाले, तेव्हा त्यांच्याकडून चैतन्य आणि आनंद यांच्या सूक्ष्म लहरींचे प्रक्षेपण होऊन वातावरणातील दाब अन् निरुत्साह दूर झाला आणि वातावरण हलके अन् प्रसन्न झाले, असे मला जाणवले.

कु. मधुरा भोसले

२. श्री. भरत प्रभु यांनी विधीचा संकल्प करणे

२ अ. कौशिक गोत्राचे उच्चारण केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे : श्री. भरत प्रभु यांनी संकल्प करतांना त्यांच्या कौशिक गोत्राचा उच्चार केला, तेव्हा कौशिक ऋषींचे विधीस्थळी शुभागमन झाले. त्यांनी पू. भार्गवराम यांच्यासह प्रभु कुळाला आणि कौशिक गोत्री साधकांना आध्यात्मिक उन्नतीचा भरभरून कृपाशीर्वाद दिल्याचे जाणवले.

२ आ. सभागृहाकडे ईश्‍वरी कृपेचा ओघ येऊन सर्वत्र दैवी प्रकाश पसरणे : संकल्प केल्यावर ईश्‍वरी कृपेचा ओघ विधीच्या ठिकाणी येतांना दिसला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चैतन्यदायी बनले. तेव्हा सभागृहात चैतन्याचा पिवळसर पांढर्‍या रंगाचा दैवी प्रकाश पसरल्याचे जाणवले.

३. विधीचे नाव, कार्यरत देवतातत्त्व आणि सूक्ष्म स्तरावरील परिणाम

४. चौलकर्माचा विधी करण्यापूर्वी यजमानाने केलेल्या कृतींचे आध्यात्मिक महत्त्व

४ अ. चौलकर्म करण्यासाठी यजमानाने दोन फुलपात्रांमधील जल ताम्हणामध्ये समंत्रक घालणे : मंत्रशक्तीने भारित झालेल्या जलामध्ये दैवी ऊर्जालहरी कार्यरत झाल्या. त्यामुळे त्या जलातून तांबूस रंगाचा दैवी प्रकाश आणि वेखंडाचा सुगंध येतांना जाणवला.

४ आ. यजमानाने एका पात्रात दही घेऊन ते ढवळणे आणि दह्याचा स्पर्श पू. भार्गवराम यांच्या मस्तकाला डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने गोलाकारात करणे : दह्यामध्ये कार्यरत झालेल्या आप आणि तेज या तत्त्वांच्या स्तरांवरील चैतन्य अन् सात्त्विकता यांच्या सूक्ष्म लहरी पू. भार्गवराम यांच्या मस्तकाभोवती गोलाकारात फिरू लागल्या. त्यामुळे त्यांच्या केसांची शुद्धी होऊन त्यांतील रज-तम न्यून होऊन सात्त्विकता वाढली.

४ इ. यजमानाने पू. भार्गवराम यांच्या प्रथम उजव्या आणि नंतर डाव्या कानावरील केसांवर दर्भ धरून ते कापणे : दर्भामध्ये कार्यरत असणार्‍या तेजोमय चैतन्यलहरींचा स्पर्श पू. भार्गवराम यांच्या मस्तकाला झाल्यावर त्यांच्या भोवती तेजोमय सोनेरी रंगाची आभा कार्यरत होऊन ती त्यांच्या मस्तकाभोवती गोल फिरू लागली. केसांना दर्भाचा स्पर्श झाल्याने त्यांच्यावरील रज-तम यांचे आवरण दूर होऊन केसांतून चैतन्य प्रवाहित झाले. केस कापल्यामुळे त्यांमध्ये अप्रगट अवस्थेत असणारी शक्ती प्रगट होऊन ती उर्वरित केस आणि मस्तक यांतून वातावरणात प्रक्षेपित होऊ लागली. तेव्हा वातावरणात कुंकवाचा सुगंध दरवळू लागला. आधी उजव्या बाजूचे आणि नंतर डाव्या बाजूचे केस कापल्यामुळे पू. भार्गवराम यांची प्रथम सूर्यनाडी अन् नंतर चंद्रनाडी कार्यरत झाली. सूर्यनाडी कार्यरत झाल्यामुळे विधीमध्ये विघ्न आणण्यासाठी कार्यरत असणार्‍या वाईट शक्तींच्या दिशेने सूक्ष्मातील मारक शक्तीचा प्रवाह जाऊन त्या नष्ट झाल्या. त्यानंतर त्यांची चंद्रनाडी चालू झाल्यामुळे त्यांच्या पेशीपेशींना विधीच्या वेळी कार्यरत झालेले ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करता आले.

४ ई. पू. भार्गवराम यांचे कापलेले केस शमीच्या पानासह द्रोणातील दर्भावर ठेवणे : ‘कापलेल्या केसांकडे वाईट शक्ती आकृष्ट होऊ नये’, यासाठी शमीच्या पानातील गणेशतत्त्वाने केसांभोवती संरक्षककवच निर्माण केले. केस दर्भावर ठेवल्यामुळे केसांभोवती तेजोमय चैतन्यलहरी कार्यरत झाल्या. त्यामुळे पाताळाकडून पृथ्वीकडे येणार्‍या त्रासदायक शक्तीच्या प्रवाहाचा कापलेल्या केसांना स्पर्श झाला नाही.

५. चौलकर्म करतांना केलेल्या विविध कृतींचे आध्यात्मिक महत्त्व

५ अ. चौलकर्म करतांना अभिमंत्रित केलेल्या जलाचा उपयोग केसांना लावण्यासाठी करणे : ताम्हणातील अभिमंत्रित केलेले जल जेव्हा पू. भार्गवराम यांचे केशवपन करण्यासाठी (केस कापण्यासाठी) वापरण्यात आले, तेव्हा त्यांच्या टाळूला अभिमंत्रित जलाचा स्पर्श होऊन त्यांचे सहस्रारचक्र जागृत झाले आणि त्यांचे ब्रह्मरंध्र उघडले गेले.

५ आ. चौलकर्म करतांना पू. भार्गवराम यांचे कापलेले केस बैलाच्या शेणात ठेवणे : बैलामध्ये पुष्कळ प्रमाणात धर्मशक्ती कार्यरत असते. केसांच्या मुळाशी पाप आणि अधर्म साचलेले असतात. त्यामुळे सर्वसामान्य बालकाचे चौलकर्म करतांना त्याचे केस बैलाच्या शेणात बुडवल्याने शेणामध्ये कार्यरत असणार्‍या धर्मशक्तीद्वारे केसांतील रज-तम युक्त पाप आणि अधर्म यांच्या लहरींचे समूळ उच्चाटन होते, तसेच धर्मशक्तीच्या प्रभावामुळे कापलेल्या केसांभोवती धर्मशक्तीचे वलय कार्यरत रहाते. त्यामुळे वाईट शक्तींना केसांवर करणी करून बालकांना त्रास देता येत नाही. या ठिकाणी पू. भार्गवराम यांच्या कापलेल्या केसांमध्ये पुष्कळ चैतन्य असल्यामुळे त्या चैतन्याचे संक्रमण बैलाच्या शेणात होऊन ज्या बैलाचे शेण होते, त्याला सूक्ष्म स्तरावर कार्यरत रहाण्यासाठी पू. भार्गवराम यांच्याकडून चैतन्य मिळाल्याचे जाणवले.

५ इ. केस कापल्यानंतर पू. भार्गवराम यांना लहानशी शेंडी ठेवणे : केस कापल्यानंतर पू. भार्गवराम यांना लहानशी शेंडी ठेवण्यात आली. या शेंडीकडे ब्रह्मांडातील निर्गुण चैतन्य लहरींचा प्रवाह येऊन तो प्रवाह त्यांच्या ब्रह्मरंध्राकडे आकृष्ट झाला आणि त्यांच्या आज्ञाचक्रातून अन् त्यांच्या डोळ्यांतून चैतन्य लहरींचे वातावरणात प्रक्षेपण चालू झाले. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनले. चौलकर्म केल्यामुळे पू. भार्गवराम यांच्याकडून संपूर्ण वातावरणात होणारे चैतन्याचे प्रक्षेपण ५ टक्क्यांनी वाढले.

६. चौलकर्म झाल्यावर हे कर्म करणार्‍या न्हाव्याला चार द्रोणांतील चार पदार्थ दान केल्याने सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम

चौलकर्म झाल्यानंतर चार द्रोणांमध्ये अनुक्रमे टरफलासहित असणारे तांदूळ (साळी), यव (जव), काळे उडीद (मांसांचे प्रतीक) आणि काळे तीळ न्हाव्याला दान करण्यात आल्या. केसांकडे आकृष्ट झालेली त्रासदायक शक्ती दान केलेल्या वस्तूंकडे आकृष्ट होऊन वाईट शक्तींनी दान केलेल्या पदार्थांचा अंश ग्रहण केल्याने त्या संतुष्ट होऊन बालकापासून दूर होतात. या ठिकाणी पू. भार्गवराम यांच्या चौलसंस्कारांतर्गत चार पदार्थ न्हाव्याला दान केल्यामुळे, या पदार्थांमध्ये कार्यरत असणार्‍या चैतन्यलहरी ग्रहण करण्यासाठी वाईट शक्ती चार द्रोणांभोवती जमल्या. जेव्हा त्यांनी वरील चार पदार्थातील चैतन्य ग्रहण केले, तेव्हा त्यांच्या पापांचे क्षालन होऊन त्यांना पापयोनीतून मुक्ती मिळाल्याचे जाणवले. पू. भार्गवराम यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्या दूर निघून गेल्या.

७. चौलकर्माच्या पूर्व-विधींच्या वेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली काही महत्त्वाची सूत्रे

७ अ. सभागृहातील पार्श्‍वभूमीवर लावलेल्या निळसर रंगाच्या पडद्यावरील श्रीकृष्णाचे चित्र जागृत होऊन स्मितहास्य करत असल्याचे जाणवले.

७ आ. चौलकर्माच्या आधीचे विधी चालू असतांना पार्श्‍वभूमीवरील निळसर रंगाच्या पडद्यावर श्रीकृष्णाच्या प्रीतीची गुलाबी रंगाची दैवी छटा पसरल्याचे दिसले.

७ इ. यजमानाने प्रजापतीसाठी होम करून त्यात तुपाची आहुती दिल्यानंतर पू. भार्गवराम यांनीही अगदी सराईत असल्याप्रमाणे पूर्णपात्र (तूप घालायचे लाकडी दांड्यासारखे पात्र) उजव्या हाताने व्यवस्थित धरून होमात तुपाच्या ४ – ५ आहुत्या दिल्या. त्यानंतर ते फुलपात्रामधील जल त्यांच्या उजव्या तळव्यात घेऊन आचमन केल्याप्रमाणे कृती करत होते.

७ ई. पू. भार्गवराम यांच्यामध्ये पाण्याच्या तरंगाप्रमाणे चैतन्याच्या पिवळसर आणि प्रकाशलहरींप्रमाणे आनंदाच्या गुलाबी लहरी कार्यरत होतांना जाणवल्या. या लहरी आपापसात एकत्रित झाल्यावर त्यांतून चांदण्यांप्रमाणे ऊर्जा बिंदू निर्माण होऊन त्यांचे प्रक्षेपण वातावरणात होऊन वातावरणात चांदण्यांचा पाऊस पडतांना दिसत होता. त्यामुळे या वातावरणात असणार्‍या साधकांना एकाच वेळी चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती येत असे.

७ उ. चौलकर्म केल्यामुळे त्यांच्या ब्रह्मचर्य आश्रमाचा प्रारंभ झाल्याचे जाणवले आणि त्यांच्या ठिकाणी धर्मदंड हातात धरलेल्या बाल शंकराचार्यांचे दर्शन झाले. ‘पुढे पू. भार्गवराम आदि शंकराचार्यांप्रमाणे धर्मसंस्थापनेचे कार्य करणार आहेत’, असे देवाने सांगितले.

७ ऊ. चौलकर्म केल्यामुळे त्यांच्यातील ओज वाढल्यामुळे त्यांच्यातील क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांमध्ये वृद्धी झाली. त्यामुळे ते आधीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागले. त्यामुळे त्यांची सूक्ष्मातून कार्य करण्याची क्षमता १० टक्के वाढली.

७ ऊ १. पू. भार्गवराम यांच्यातील क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज

कृतज्ञता

‘देवा, तुझ्या कृपेनेच पू. भार्गवराम यांच्या ‘चौलकर्म’ या विधीला उपस्थित राहून त्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला मिळाली’, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळेलेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०१९ रात्री १०.३५)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF