६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पर्वरी, गोवा येथील कु. श्रीरंग सुदेश दळवी (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील  चि. श्रीरंग दळवी हा एक आहे !

(‘वर्ष २०१८ मध्ये श्रीरंग याची ६३ टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ – संकलक)

चि. श्रीरंग दळवी

ज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वादशी (३०.६.२०१९) या दिवशी चि. श्रीरंग दळवी याचा तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्या ‘व्रतबंध संस्कारा’च्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

१. प्रामाणिकपणा

१ अ. ‘चि. श्रीरंगचे मन निर्मळ आहे. त्याच्याकडून झालेल्या चुका तो प्रांजळपणे स्वीकारतो. एखादी चूक त्याच्या लक्षात आली नाही आणि अन्य कोणी त्याला चुकीविषयी जाणीव करून दिली, तरी तो ती चूक स्वीकारून क्षमा मागतो.

१ आ. श्रीरंगने प्रयत्न करूनही १८ चा पाढा तोंडपाठ न झाल्याचे शिक्षिकेला प्रामाणिकपणे सांगणे आणि त्याने दुसर्‍या दिवशी आणखी प्रयत्न करून तो पाढा शिक्षिकेला म्हणून दाखवणे : एप्रिल २०१९ मध्ये शाळेतील बाईंनी श्रीरंगला तोंडी परीक्षेसाठी १८ चा पाढा तोंडपाठ करण्यास सांगितले होते. त्याने दिवसभर पाठांतर करण्याचा प्रयत्न करूनही त्याचा तो पाढा तोंडपाठ झाला नाही. दुसर्‍या दिवशी तोंडी परीक्षेच्या वेळी बाईंनी त्याला १८ चा पाढा म्हणायला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘बाई, मी पुष्कळ प्रयत्न केले; परंतु १८ चा पाढा माझा तोंडपाठ झाला नाही. मी तुम्हाला आज १९ चा पाढा म्हणून दाखवतो. मी आणखी प्रयत्न करून उद्या १८ चा पाढा तुम्हाला म्हणून दाखवतो. चालेल का ?’’ त्याच्यातील ‘प्रामाणिकपणे बोलणे’ या गुणाचे त्याच्या बाईंना फार कौतुक वाटले आणि त्यांनी त्याला पैकीच्या पैकी गुण दिले; तरीही त्याने दुसर्‍या दिवशी १८ चा पाढा पाठ करून तो बाईंना म्हणून दाखवला.

२. धर्माचरणी

श्रीरंग प्रतिदिन शाळेत जातांना कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा लावतो.

३. चित्रकलेच्या माध्यमातून साधनेचे प्रयत्न करणे

श्रीरंगला चित्रकलेची अतिशय आवड आहे. तो मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आदींना वाढदिवसानिमित्त ‘शुभेच्छा पत्रे’ बनवून देतो. तो चित्र काढतांना त्यात अतिशय तल्लीन होतो.

४. क्षात्रभाव

‘श्रीरंगचा व्रतबंध संस्कार झाल्यानंतर दोनच दिवसांनी शाळेत ‘वेशभूषा’ स्पर्धा होती. त्यात त्याने बाजीप्रभु देशपांडे यांची भूमिका केली होती. त्या वेळी त्याच्या आजोबांनी (पू. रमेश गडकरी यांनी) सांगितलेले पुढील वाक्य त्याने सर्वांसमोर खणखणीत आवाजात म्हटले, ‘‘महाराज गडावर पोचल्याचे तोफेचे आवाज ऐकल्याशिवाय, मी (बाजीप्रभू) प्राण सोडणार नाही ! हर हर महादेव !’’ या स्पर्धेत कु. श्रीरंगला प्रथम पारितोषिक मिळाले.

५. मोठेपणी ‘संत-सैनिक’ होण्याचे ध्येय ठेवणे

मी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई आक्रमणाची (एअर स्ट्राईकची) बातमी दूरचित्रवाणीवर पहात होते. तेव्हा श्रीरंगचे माझ्याशी पुढील संभाषण झाले.

श्रीरंग : आई, भारताचे सैनिक पुष्कळ शूरवीर आहेत ना ?

मी : हो !

चि. श्रीरंग : मीसुद्धा मोठेपणी सैनिक होणार आणि युद्धावर जाणार; पण आई, मी सैनिक झालो, तर मला आजोबांप्रमाणे (सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांच्याप्रमाणे) संत होता येईल का ?

मी : हो, ‘संत’ होता येईल ना ! सैनिक होण्यासमवेत तू संत झालास, तर ही गोष्ट परात्पर गुरु डॉक्टरांना अधिक आवडेल आणि देशाला एक ‘संत-सैनिक’ मिळेल !

चि. श्रीरंग : हो ना, मग आता मी ‘संत-सैनिक’ होणार !

६. अन्य

अ. श्रीरंगचे अक्षर वळणदार आहे.

आ. त्याचे संस्कृत भाषेतील श्‍लोक इत्यादी पाठांतर चांगले आहे.

इ. श्रीरंग त्याची खेळणी काळजीपूर्वक हाताळतो.

७.  स्वभावदोष

भित्रेपणा, भावनाशीलता, अभ्यास करण्याविषयी कंटाळा करणे आणि संथपणा’

– सौ. रसिका दळवी (चि. श्रीरंग सुदेश दळवी याची आई), पर्वरी, गोवा. (१२.६.२०१९)

कु. श्रीरंग दळवी याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त पाठवलेले शुभेच्छा पत्र !

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव वैशाख शुक्ल पक्ष सप्तमीला (११ मे २०१९ या दिवशी) साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कु. श्रीरंग याने गुरुदेवांच्या रेखाटलेल्या (शेजारी दाखवलेल्या) चित्राखाली पुढील संस्कृत श्‍लोक लिहिला आहे.

‘सुदिनं सुदिनं जन्मदिनम् ।
तव भवतु मङ्गलं जन्मदिनम् ॥

अर्थ : तुमचा जन्मदिवस (वाढदिवस) शुभ आणि मंगल होवो.’

– कु. श्रीरंग दळवी, पर्वरी, गोवा. (१.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF