पोलिसांची वाटमारी !

संपादकीय

पूर्वीच्या काळी चोर आणि दरोडेखोर यांच्या टोळ्या वाटमारी करत असल्याविषयीच्या गोष्टी आपण सर्वांनीच ऐकल्या किंवा वाचल्या असतील. काहींना त्याचा प्रत्यक्ष कटू अनुभवही आला असेल. आता काळानुसार वाढत्या शहरीकरणामुळे म्हणा किंवा अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे म्हणा, असे प्रकार फारसे ऐकिवात येत नाहीत. वाटमारीचे प्रकार करणार्‍यांना आपण ‘चोर’ किंवा ‘दरोडेखोर’ असे संबोधतो; पण असे प्रकार जेव्हा कायद्याच्या रक्षकांकडून होतात, तेव्हा त्यांना कुठली उपमा द्यायची ? ‘धौलपूर (राजस्थान) येथील २७ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे ट्रक आणि अन्य वाहने यांच्या चालकांकडून बलपूर्वक पैसे वसूल करणार्‍या टोळीला धौलपूरचे पोलीस अधीक्षक अजय सिंह हेच संरक्षण देत आहेत’, असा गंभीर आरोप धौलपूरचे उपअधीक्षक दिनेश शर्मा यांनी केला. शर्मा यांनी तसे पत्रच पोलीस महानिरीक्षकांना लिहिले आहे. धौलपूर प्रकरणात एवढाच आरोप करून शर्मा थांबले नाहीत, तर त्यांनी या हप्तावसुलीची कार्यपद्धतच उघड केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘धौलपूर शहराच्या ४ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ व ९ ठिकाणी हप्तावसुलीसाठी १५ ते २० जण अवैधपणे नियुक्त करण्यात आले आहेत. ही टोळी वाहनचालकांकडून बलपूर्वक पैसे वसूल करते. त्यांतील काही भाग पोलीस अधीक्षक अजय सिंह यांना पाठवला जातो. एखाद्या वाहनचालकाने पैसे देण्यास नकार दिला, तर त्याला मारहाण करून पोलीस ठाण्यात बंद केले जाते. या हप्तावसुलीमध्ये अजय सिंह यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तसेच निहालगंज, कोतवाली, धौलपूरचे ठाणेप्रमुख आणि प्रभारी हेही गुंतलेले आहेत !’ यावरून या प्रकाराचे गांभीर्य लक्षात यावे. या घटनेची चौकशी होऊन सत्य लवकरच समोर येईल.

वास्तविक असे प्रकार आपल्याकडे प्रत्येक गल्ली-बोळात होत असतात. शहरांतील चौकाचौकांत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियुक्त असलेले वाहतूक पोलीस कोपर्‍यात उभे राहून वाहनचालकांकडून नियम मोडले जाईपर्यंत वाट बघतात आणि मग त्यांच्याशी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार करतात. प्रत्येक वाहनचालकाने असा अनुभव एकदातरी घेतला असेल. ही एकप्रकारे वाटमारीच नव्हे का ? वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांना कायदेशीर दंड करणे आवश्यकच आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही; पण आक्षेप आहे तो ‘अर्थ’पूर्ण व्यवहारावर. यात वाहनचालकही तितकेच दोषी असतात. वाटमारीच्या बाराखडीचा हा आरंभ असतो. त्यावर वेळीच अंकुश न ठेवल्याने धौलपूरप्रमाणे टोळ्या निपजतात. लहाणपणी चोरी करणार्‍या मुलाचे ‘तो लहान आहे’ म्हणून समर्थन केले, तर पुढे तो अट्टल गुन्हेगार बनतो आणि कुटुंबाची डोकेदुखी ठरतो; तसे काहीसे चित्र पोलीसदलात दिसून येते.

जेथे स्वतः पोलीस अधीक्षकच हप्तावसुली करत असतील, तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय असेल, हे वेगळे सांगायला नको. ही स्थिती पोलीस खात्याला लज्जास्पद आहे. सरकारने वेतन, पगार, भत्ते आदी सर्व सुविधा देऊनही पोलिसांची तोंडे नेहमी उघडीच का असतात, हा खरा प्रश्‍न आहे. समाजात कोणी हप्तेवसुली केली, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार अशा पोलिसांना उरतो का ?

मूकसंमतीदार पोलीसही दोषीच !

वास्तविक धौलपूरची ही हप्तेवसुली गेली कित्येक दिवस चालू असली पाहिजे. भररस्त्यात चालणार्‍या या वाटमारीविषयी कोणालाच काही ठाऊक नाही, असे होऊ शकत नाही. तथापि ‘एवढा मोठा अधिकारीच जर हप्तेवसुलीचे जाळे विणत असेल, तर त्याच्याविरुद्ध बोलणार कोण ?’, असा प्रश्‍न होता. अशी ध्रुतराष्ट्र-गांधारी वृत्ती असलेले गुन्हेगारी कृत्याची बलस्थाने असतात. त्यांच्या कुकृत्यांवर पांघरूण घालण्याचे काम अशी मानसिकता बाळगणारे पोलीस जाणतेपणी करत असतात. पोलिसांच्या नियमाप्रमाणे जसे ‘गुन्ह्यात मूकसंमतीदार असलेले गुन्हेगारच ठरतात’, त्याप्रमाणे असे मूकसंमतीदार पोलीसही दोषीच ठरतात; परंतु आपल्याकडे अशांवर कारवाई होतांना दिसत नाही. ‘कायद्याचे हात लांब असतात’ हे खरे असले, तरी ते अशा पोलिसांपर्यंत पोचत नाही, हेही तितकेच खरे आहे.

पोलीसदलात ‘असे’ शर्मा सर्वत्र हवेत !

अशा मानसिकतेच्या पोलीसदलात अपवाद ठरले ते धौलपूरचे उपअधीक्षक दिनेश शर्मा ! त्यांनी धाडस दाखवून त्यांच्या वरिष्ठांच्या विरोधात आवाज उठवत सत्य जनतेसमोर आणले. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. पोलीसदलाची प्रतिमा सुधारायची असेल, तर असे दिनेश शर्मा सर्वत्र असण्याची नितांत आवश्यकता आहे. वास्तविक गुंड, खुनी, बलात्कारी, खंडणीखोर आदींचा भरणा असलेले पोलीसदल इतके बरबटले आहे की, या दलात सुधारणा करायची म्हटले तर ‘आकाशच फाटले आहे, तर ठिगळं कुठे कुठे लावायची’, अशी या दलाची केविलवाणी अवस्था आहे. अशांवर जनतेच्या सुरक्षेची भिस्त आहे ! म्हणून चिंता अधिक आहे. शर्मा यांनी दाखवलेले धाडस म्हणूनच कौतुकास्पद ठरते.

मुंबई पोलिसांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप आजही होतात; पण त्याविरुद्ध कोणी ‘ब्र’ही काढत नाहीत. ही ध्रुतराष्ट्र-गांधारी वृत्ती पोलीसदलाला विनाशाच्या खाईकडे न घेऊन गेल्यासच नवल. अशा पोलिसांचा भरणा असलेले पोलीस समाजातील गुन्हेगारांना शोधतात, हाच मोठा विनोद आहे. म्हणून तर अनेक प्रकरणांत खर्‍या गुन्हेगारांना सोडून पोलीस राष्ट्रनिष्ठांना अटक करून स्वतःची पाठ थोपटून घेतांना दिसतात. हे चित्र निश्‍चितच भूषणावह नाही. पोलिसांची ही वृत्ती पालटणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीसदलात अनेक दिनेश शर्मा सिद्ध करण्याचे काम सरकारचे आहे !


Multi Language |Offline reading | PDF