आंबेगावात अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय करणार्‍यांकडून दोघांना पोलिसांसमक्ष मारहाण

शिवसेना पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांकडून चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद

निष्क्रीय आणि असंवेदनशील पोलीस !

सावंतवाडी – तालुक्यातील आंबेगाव येथे चालू असलेल्या अवैध मद्यविक्रीच्या व्यवसायाची पोलिसांना माहिती दिली, या रागातून गावातील अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय करणार्‍यांनी ५ जुलैला रात्री पोलिसांसमक्ष दोघांना मारहाण केली. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी केसरकर यांनी मारहाण करणार्‍या अवैध मद्य व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई करावी, अशा सूचना पोलिसांना दिल्याचे शिवसेना पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी आता फिलिप्स फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, नीलू फर्नांडिस आणि जॉन्टी या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

आंबेगावात अवैध मद्यविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर बंदी घालावी, यासाठी यापूर्वी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. (ग्रामस्थांना का आंदोलन करावे लागते ? पोलिसांना अवैध मद्यव्यवसाय दिसत नाहीत कि ते अर्थकारणापोटी जाणूनबुजून दुर्लक्ष करतात ? असे निष्क्रीय पोलीस काय कामाचे ? – संपादक)  त्या वेळी पोलिसांनी ‘गावातील अवैध मद्यविक्री होणार्‍या ठिकाणांवर कारवाई करू’, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर  काही दिवसांतच अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय करणार्‍यांवर पोलिसांनी धाड टाकली. गावातील नामदेव नाईक आणि महेश जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली असावी, या संशयावरून मद्यविक्री व्यावसायिकांनी त्या दोघांना मारहाण केली. या वेळी पोलीस उपस्थित असूनही त्यांनी काही केले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. (पोलीस त्यांच्यासमोर होणारी  मारहाण रोखू शकत नाहीत, तर मग जनतेने कायदा हातात घ्यायचा का ? आरोपी अल्पसंख्यांक आहेत म्हणून पोलीस कारवाई करण्यास कचरतात का ? – संपादक)

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे आदींनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली; मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, असा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आरोप केला. याविषयी शिवसेनेच्या तालुका संघटक अपर्णा कोठावळे म्हणाल्या, ‘‘या गावात अनेकवर्षे अनधिकृतपणे मद्यविक्री चालू आहे. यामुळे १५ हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. त्यामुळे हे व्यवसाय बंद व्हावेत, यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले.’’


Multi Language |Offline reading | PDF