भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या वेळी काश्मीरला स्वतंत्र करण्याची मागणी करणारे फलक झळकले !

ब्रिटनमधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा

मैदानावरून जाणार्‍या विमानांनी अशी मागणी करणारे फलक आकाशात झळकवले !

‘काश्मिरी नागरिकांवर भारत सरकार अत्याचार करत आहे’, असे चित्र पाक आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगवू पहात आहे. त्यासाठी तो वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहे. अशा पाकला कायमची अद्दल घडवणे आवश्यक !

लंडन – ब्रिटनमध्ये चालू असलेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत ६ जुलै या दिवशी लीड्स येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना चालू होता. त्या वेळी मैदानावरून जाणार्‍या २ विमानांनी ‘काश्मीरसाठी न्याय’ आणि ‘भारताने नरसंहार थांबवावे आणि काश्मीरला स्वतंत्र करावे’ असे लिहिलेले फलक झळकावल्याची घटना घडली. या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसीकडे) तक्रार केली आहे. तसेच आयसीसीनेही या घटनेविषयी खेद व्यक्त केला आहे. (काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमटू महेंद्रसिंह धोनी यांनी त्यांच्या ग्लोव्हसवर भारतीय सैन्याचे चिन्ह लावल्यामुळे आयसीसीने त्यांना ते तात्काळ काढण्यास सांगितले होते. आता मात्र आयसीसी पाकप्रेमींना समज देण्यास का टाळाटाळ करत आहे ? यावरून आयसीसीचा भारतद्वेष दिसून येतो ! – संपादक) काही दिवसांपूर्वी या स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या वेळी मैदानावरून जाणार्‍या विमानाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयीचा फलक झळकावला होता. त्यावरून दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये हाणामारीही झाली होती.

आयसीसीने म्हटले की, ‘अशा प्रकारचे फलक फडकावले जाणार नाही’, असे  पोलिसांनी आम्हाला आश्‍वस्त केले होते; मात्र अशा घटना झाल्याने आम्ही निराश झालो आहोत.


Multi Language |Offline reading | PDF