पावसानंतर तेच ते आणि तेच ते…!

नेमेचि येतो पावसाळा… या म्हणीप्रमाणे यंदाही पाऊस आला; पण तो जून मासाच्या शेवटाला. चार दिवसांत आलेल्या पावसाने महिनाभराची कसर भरून काढली. त्यामुळे अनेक शहरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले असले, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ‘सिमेंट काँक्रीट’च्या जंगलाने घनदाट झालेल्या शहरांची जी व्हायची होती ती अवस्था झाली. सलग चार दिवस पडत असलेल्या ‘धो धो’ पावसामुळे मुंबईची ‘तुंबई’ झाली. नवी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊन त्यांनी धोक्याची पातळी गाठली. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले, गावांचा संपर्क तुटला, घरांत पाणी शिरले, झाडे उन्मळून पडली, विजेचे पोल वाकले, रस्ते खचलेे, संरक्षक भिंती कोसळल्या. एवढेच नव्हे, तर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेची गतीही मंदावली. परिणामी नोकरदारवर्गाचे मोठे हाल झाले अन् शाळकरी मुलांना घरी बसावे लागले. आता हे सारे काही यंदाच घडत आहे, असे नाही. हे चित्र प्रतिवर्षी पहायला मिळत आहे; मात्र वर्ष पालटते एवढेच !

बरे, हे असे का झाले? त्याची कारणेही नेहमीची आहेत. मुंबईसह अनेक शहरांत प्रतिवर्षी महापालिकेकडून पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. लाखो-कोटी रुपयांच्या निविदा निघतात. त्याची कंत्राटेही राजकीय लागेबांधे असलेल्या त्याच त्याच कंत्राटदारांना मिळतात. महापौर आणि आयुक्त यांचा पाहणीदौरा असतांना कंत्राटदार नालेसफाई करत असल्याचा देखावा करतात. कंत्राटदारांच्या सांगण्यानुसार नालेसफाई चांगली झाल्याचे आणि ‘यंदा पाणी तुंबणार नाही’, असे दावे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून केले जातात; परंतु पहिल्या पावसातच त्यांचे हे दावे फोल ठरतात. मग राजकीय टीका-टिप्पणीही होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू होतात. माध्यमांनाही ‘टीआर्पी’साठी चांगलीच ‘बे्रकींग न्यूज’ मिळते आणि जनता मात्र हे सारे निमूटपणे बघत रहाते.

अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांकडून इमारतींना अनुमती देतांना आपले आर्थिक हित कसे जपले जाईल, हे प्रथम पाहिले जाते. मग बांधकाम व्यावसायिकांकडूनही नियम धाब्यावर बसवले जातात. मुंबई, ठाणे, पुणे यांसह अनेक शहरांतील इमारती नाले बुजवून, तर काही चक्क नाल्यांवर बांधल्याचे पहायला मिळते. त्यामुळे पावसाळ्यात अशा इमारतींचा पाया कमकुवत होऊन त्या कोसळण्याच्या घटना घडतात आणि त्यात निष्पाप लोक मृत्यूमुखी पडतात. अशा दुर्घटना घडल्या की, मृतांच्या नातेवाइकांना प्रशासन अर्थसाहाय्य करून आपण फार मोठे दायित्व पार पाडल्याचा आव आणते. हे असेच वर्षानुवर्षे आपल्याकडे चालत आले आहे. त्यामुळे यंदाही काही नवीन घडले आहे किंवा घडत आहे, असे नाही. त्यामुळेच म्हणावे लागते, पावसानंतर तेच ते आणि तेच ते…!

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF