राष्ट्रवादी कि राष्ट्रघातकी ?

संपादकीय

महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भूसुरुंग स्फोटाच्या अन्वेषणाच्या वेळी अटक करण्यात आलेले एक आरोपी कैलास रामचंदानी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी आहेत, अशी माहिती पोलिसांच्या अन्वेषणात पुढे आली आहे. १ मे या दिवशी झालेल्या या स्फोटामध्ये १५ पोलीस आणि एक वाहनचालक हुतात्मा झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनीही ‘रामचंदानी हे पक्षाचा पदाधिकारी आहेत’, असे मान्य केले आहे. या स्फोटाच्या अन्वेषणात पोलिसांनी काही नक्षलवादी आणि त्यांचे सहकारी यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून रामचंदानी यांची माहिती मिळाली आहे. रामचंदानी यांचे जिल्ह्यातील कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. त्यावरून रामचंदानी यांचा स्फोट घडवण्यात कशा प्रकारचा सहभाग असू शकतो, याची कल्पना येईल. रामचंदानी यांच्या अटकेतून ‘पक्षातील, तसेच अन्य कोणी या कटात सहभागी होते का ?’, याची माहितीही काही दिवसांनी बाहेर येऊ शकते.

या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रघातकी स्वरूप लोकांसमोर उघड झाले आहे. देशासमोर आतंकवादासमवेत नक्षलवाद ही एक मोठी समस्या आहे. गडचिरोली, छत्तीसगड, दंडकारण्याचा भाग ही नक्षलवादाने प्रभावित क्षेत्रे मानली जातात, तर देशात नक्षलवाद फोफावलेल्या २०३ जिल्ह्यांपैकी २३ जिल्हे नक्षलवादामुळे अतीप्रभावित आहेत. छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांवर आक्रमणे करून नक्षलवादी एकाच वेळी मोठ्या संख्येने पोलिसांचे बळी घेतात आणि ‘आम्ही सुरक्षादलांनाही जुमानत नाही’, असा संदेश आक्रमणांद्वारे देतात. ‘घनदाट अरण्यात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना पोलिसांच्या हालचालींचा बारकाईने सुगावा कसा लागतो ?’, असा सर्वसामान्यांना प्रश्‍न पडतो. ‘स्थानिकांच्या साहाय्याविना अशी आक्रमणे करणे शक्य नसते’, हे आतंकवादी आक्रमणांच्या अभ्यासाच्या वेळीही सुरक्षाविषयक तज्ञांनी सांगितले आहे. आतंकवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ हे धर्मांध असतात, हे ठाऊक होते; मात्र नक्षलवाद्यांचे साहाय्यक ‘राष्ट्रवादी’ असे नाव असलेल्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, हे सूत्र सर्वसामान्यांना चीड आणणारे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख !

‘गरिबी हटाव’, ‘कर्जमाफी करा’, ‘संविधान धोक्यात’, ‘लोकशाही धोक्यात’, अशी आवई उठवून सरकारला धारेवर धरण्याचा अथवा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार्‍यांची लोकांप्रती असलेली ‘कळकळ’ ही किती दिखावू आहे, हेच यातून लक्षात येते. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’, ही म्हण राष्ट्रवादी काँग्रेसला तंतोतंत लागू पडते. स्वत: घटनाविरोधी कारवाया करायच्या आणि वर ‘आम्ही जनतेचे रक्षणकर्ते आहोत’, ‘मसिहा’ आहोत’, असे भासवण्याचा प्रयत्न करायचा, हे अतीच झाले ! शोषितांच्या न्यायहक्कांसाठी चालू झालेली नक्षली चळवळ पुरती भरकटून ती शोषित, वंचित आणि जनताविरोधीच झाली आहे. नक्षल भागातील आदिवासी आणि सर्वसामान्य यांच्यावर अनन्वित अत्याचार करून नक्षलवाद्यांनी स्वत:ची राक्षसी प्रवृत्ती दाखवून दिली आहे. ‘त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे का ?’, याचे उत्तर पक्षाने द्यायला हवे.

राष्ट्रघातकी कृत्यात अग्रेसर !

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसचे सर्व हिंदुद्वेषी अवगुण आलेले आहेतच, आता त्यात नक्षलवाद्यांचे समर्थक असणार्‍यांची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झाली आहे. आतंकवादी इशरत जहाँला ‘मासूम’ म्हणणारे आणि तिच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यात वसंत डावखरे आघाडीवर होते. तिच्या नावे मुंब्यात रुग्णवाहिकाही चालू करण्यात आली होती. काही वर्षांनी अमेरिकेच्या कह्यात असलेला आतंकवादी डेव्हिड हेडली यानेच ‘इशरत आतंकवादीच आहे’, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे दात घशात घातले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी ‘शरद पवार यांनी संधी असतांनाही दाऊदचे प्रर्त्यापण करून घेतले नाही आणि त्यामुळे तो पसारच राहिला’, असा गौप्यस्फोट केला होता.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता, तसेच ते नेहमी हिंदुत्वविरोधी भूमिका घेतांना दिसतात. मोठ्या प्रमाणावर अवैध मालमत्ता गोळा केल्याच्या प्रकरणात छगन भुजबळ हे कारागृहात होते. ते आता जामिनावर बाहेर आले आहेत. याच पक्षातील नेते अजित पवार यांच्यावर ७० सहस्र कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्याचे आरोप आहेत. समाज परिवर्तनाचा ढोल बडवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुन्ह्यांची जंत्री पाहिल्यास, ‘हा पक्ष म्हणून कार्यरत आहे कि गुन्हेगारांचा कारखाना आहे ?’, असा सर्वसामान्यांना प्रश्‍न पडतोे. कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर हिंदुत्वनिष्ठांवर दोषारोप करण्यात आले. नंतर प्रत्यक्षात समाजसुधारकाचा मुखवटा घालून ‘शहरी नक्षलवाद’ जोपासणार्‍या अनेक बुद्धीवंतांना अटक करण्यात आली. नक्षलवाद्यांपेक्षाही नक्षलींचे समर्थक पुष्कळ धोकादायक आहेत. चांगूलपणाचा आव आणत सर्वसामान्यांना सरकारविरुद्ध सशस्त्र लढ्यासाठी चिथावणारे हे अस्तनीतील निखारे कधी देशात हिंसेचा आगडोंब उसळवतील, याचा नेम नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रामचंदानी यांनी हे कृत्य का केले ?’, ‘त्यांना पक्षातील वरिष्ठांनी तसे करण्यास सांगितले होते का ?’, या सर्व सूत्रांचे सखोल अन्वेषण व्हायला हवे. एवढेच नव्हे, तर ‘अनेक गुन्हेगार आणि राष्ट्रघातकी यांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच  सखोल अन्वेषण करून तिला राजकारणातून मुक्त करावे’, अशी जनतेची अपेक्षा आहे.


Multi Language |Offline reading | PDF