जन्मोजन्मीचा परिचय असल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीतीची उधळण करून अनोख्या बाललीला करणारे सनातनचे बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय २ वर्षे) आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक चि. श्रीभार्गव आचार्य (वय २ वर्षे)

सनातनचे मंगळूरू (कर्नाटक) येथील बाल संत पू. भार्गवराम प्रभु हे सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. त्या निमित्ताने त्यांच्यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

पू. भार्गवराम प्रभु

पू. भार्गवराम (वय २ वर्षे) आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा सनातनचा दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील दैवी बालक चि. श्रीभार्गव आचार्य (वय २ वर्षे) हे दोघेही समवयस्क आहेत. या दोघांमध्ये केवळ १५ दिवसांचेच अंतर आहे. दोघेही ४ मासांचे असतांना प्रथमच एकमेकांना भेटले. तेव्हा आधी ते एकमेकांच्या तोंडवळ्याकडे पहात नव्हते. नंतर एकमेकांचा तोंडवळा दिसेल, अशा प्रकारे दोघांना जवळ जवळ झोपवले. तेव्हा ते दोघे कितीतरी जन्मांतील परिचय असल्याप्रमाणे डोळ्याला डोळा भिडवून गालातल्या गालात हसले. तो क्षण अत्यंत आनंददायी होता. पू. भार्गवराम आणि चि. श्रीभार्गव यांच्यातील जिव्हाळा अन् साम्य दर्शवणारी सूत्रे येथे दिली आहेत.

चि. श्रीभार्गव आचार्य

१. पू. भार्गवराम यांच्या आईने श्रीभार्गवचे लाड केल्यास, तसेच श्रीभार्गवच्या आई-वडिलांनी पू. भार्गवराम यांचे लाड केल्यास दोघांनाही त्याचे काही न वाटणे

‘पू. भार्गवराम यांच्या आईने त्यांंच्या समोर श्रीभार्गवला उचलून कडेवर घेतले किंवा त्याचे लाड केले, तरी पू. भार्गवराम कधीच रडत नाहीत अथवा त्यांना कधी असूयाही वाटत नाही. त्याचप्रमाणे श्रीभार्गवसमोरच त्याच्या आई-वडिलांनी पू. भार्गवराम यांना उचलून त्यांचे लाड केले, तर त्यालाही काही वाटत नाही. तो शांतपणे पू. भार्गवराम यांच्याकडे पहातो आणि आपल्या खेळाकडे लक्ष देतो.’ – सौ. चैत्रा आणि श्री. प्रसाद आचार्य (चि. श्रीभार्गव याचे आई-वडील), दक्षिण कन्नड (कर्नाटक), सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळूरू (कर्नाटक) आणि कु. प्रतीक्षा आचार्य (श्रीभार्गव याची आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. स्वतःची प्रिय खेळणी एकमेकांना खेळायला देणारे पू. भार्गवराम आणि चि. श्रीभार्गव !

२ अ. पू. भार्गवराम यांनी खेळण्यातील नवीन ‘बस’ अन्य कोणाला न देता केवळ श्रीभार्गवलाच देणे आणि श्रीभार्गवनेही त्याची बस पू. भार्गवराम यांना देणे : ‘एकदा पू. भार्गवराम यांना एक नवीन ‘बस’गाडी आणली होती. ती घेऊन खेळणार्‍या पू. भार्गवराम यांच्याकडे मंगळूरू सेवाकेंद्रातील इतर मुलांनी ‘बस’ मागितली असता त्यांनी ती दिली नाही; मात्र त्याच दिवशी श्रीभार्गव सेवाकेंद्रात आला असता पू. भार्गवराम यांनी ती ‘बस’ स्वतःहून त्याला दिली. एकदा श्रीभार्गवकडे खेळण्यातील नवीन ‘बस’गाडी होती. ती घेऊन तो सेवाकेंद्रात आला. पू. भार्गवराम यांना पहाताच त्याने ती बस त्यांना दिली. (‘पू. भार्गवराम यांना बस पुष्कळ आवडते’, हे श्रीभार्गवला ठाऊक नव्हते.)’ – सौ. भवानी प्रभु

२ आ. स्वतःला आवडत असलेली खेळण्यातील गाय श्रीभार्गवने पू. भार्गवराम यांना देणे : ‘एक दिवस श्रीभार्गव स्वतःकडे असलेली काही खेळणी घेऊन सेवाकेंद्रात आला. त्यातील तपकिरी रंगाची गाय श्रीभार्गवला पुष्कळ आवडते. त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगांच्या गायी आहेत; पण तो त्यांना हातही लावत नाही. त्याच वेळी पू. भार्गवराम तेथे आले आणि खेळण्यातील तपकिरी रंगाची गाय मागू लागले. इतर रंगांची गाय दिल्यावर ती न घेता ‘तपकिरी रंगाचीच गाय हवी’, असे ते म्हणू लागले. (दोघांनाही खेळण्यातील एकाच रंगाची गाय हवी असणे, ही एक आश्‍चर्याची गोष्ट होती.) त्या वेळी स्वतःला प्रिय असलेली तपकिरी रंगाची गाय श्रीभार्गवने पू. भार्गवराम यांना दिली.’ – सौ. चैत्रा प्रसाद आचार्य

३. खेळतांना दोघांनी स्थुलातून न बोलता सूक्ष्मातून संभाषण करणे

‘पू. भार्गवराम आणि श्रीभार्गव एकत्र खेळतात; परंतु स्थुलातून न बोलता ते जणू सूक्ष्मातून संभाषण करतात. तेव्हा ते ‘मौनात राहून बोलतात’, असे वाटते. न बोलताही त्यांच्या कृतीत सामंजस्य असते. दोघेही ‘एकमेकांचे अनुकरण करतात’, असे वाटते. एक दिवस कितीही प्रयत्न केले, तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. त्या वेळी त्या दोघांनाच एकत्र सोडून आम्ही जरा दूर जाऊन हळूच पाहिले, तर ते संभाषण करत होते. नंतर आम्हाला पहाताच दोघे गप्प झाले.

४. खेळतांना परस्परांचे निरीक्षण करणे

पू. भार्गवराम खेळत असतांना स्वतः खेळायचे सोडून श्रीभार्गव त्यांना एकटक पहात रहातो, तर श्रीभार्गव खेळत असतांना पू. भार्गवराम त्याला एकटक निरखत रहातात. अशा प्रकारे ते परस्परांचे निरीक्षण करत असतात.

५. दोघांचाही तोंडवळा ते जुळे भाऊ असल्यासारखा आहे.’ – सौ. भवानी प्रभु आणि सौ. चैत्रा आचार्य

६. पू. भार्गवराम यांची श्रीभार्गववर असलेली प्रीती !

अ. ‘श्रीभार्गव सेवाकेंद्रात येताच पू. भार्गवराम यांचे सगळे लक्ष श्रीभार्गवकडेच असते. श्रीभार्गव इतरत्र गेल्यास ते त्याचा पाठलाग करतात आणि ‘तो कुठे आहे ?’ हे मला हाताने खुणा करून त्यांच्या शब्दांत सांगतात. श्रीभार्गव पायर्‍या चढून गेला, तर पू. भार्गवराम त्याच्या बाजूला बसून त्याच्याकडे लक्ष देतात.

आ. पू. भार्गवराम आणि श्रीभार्गव सेवाकेंद्राच्या अंगणात पळापळी करत असतांना श्रीभार्गव मागे राहिल्यास तो येईपर्यंत पू. भार्गवराम थांबतात अन् तो आल्यानंतर त्याच्यासह जातात.’

– सौ. चैत्रा प्रसाद आचार्य

इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांंच्या जन्मोत्सवानंतर एका दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पू. भार्गवराम ‘जीप’ गाडीतून चालले होते. त्यांच्यामागे श्री. प्रसाद आचार्य (श्रीभार्गव याचे वडील) श्रीभार्गवला कडेवर घेऊन चालले होते. तेव्हा पू. भार्गवराम यांनी श्रीभार्गवला पहाताच ‘जीपमधे येऊन बैस’, अशा आशयाचे हातवारे करून त्याला बोलावले.

ई. दिंडीच्या वेळी श्रीभार्गवच्या आईने पू. भार्गवराम यांना भूक लागली असेल; म्हणून त्यांना बिस्किट दिले. तेव्हा ते बिस्किट एका हातात घेऊन ‘श्रीभार्गवलाही बिस्किट द्या’, असे त्यांनी हाताने खुणा करून आणि त्यांच्या शब्दांत सांगितले.’

– सौ. चैत्रा आचार्य आणि सौ. भवानी प्रभु

७. पू. भार्गवराम श्रीभार्गवकडे पहात असल्यास श्रीभार्गव दृष्टी चुकवून इतरत्र पहातो.

८. पू. भार्गवराम आणि श्रीभार्गव यांची आवड-निवड

अ. पू. भार्गवराम आणि श्रीभार्गव या दोघांची आवड एकसारखीच आहे. दोघांना अंघोळ करायला आवडते; परंतु डोक्यावरून पाणी घातलेले आवडत नाही. तेव्हा दोघेही रडतात. त्यांना साबणाच्या फेसात खेळायला आवडते. अंघोळ करण्यासाठी कितीही बोलावले, तरी ते येत नाहीत; परंतु ओरडल्याचे नाटक केल्यावर ‘अरे, अरे’, असे म्हणत लाडात येतात.

आ. ते दोघेही घडी घातलेले कपडे विस्कटून स्वतः घडी घालून ठेवण्याचा प्रयत्न करतात.

इ. दोघांनाही खेळण्यांशी खेळण्यापेक्षा फुलांच्या वाटिकेत खेळायला आवडते. त्यांना झाडांना पाणी घालायला आणि बाहेरच्या परिसरात खेळायला आवडते.

ई. दोघांनाही गोड पुष्कळ आवडते. मारी बिस्कीटही दोघांना आवडते. एखादा रुचकर पदार्थ (उदा. लोणच्याची फोड) असेल, तर तो दोघांनाही आवडतो. पदार्थ कितीही तिखट असला, तरी दोघे ‘तिखट, तिखट’ असे म्हणत खातात.

उ. दोघांनाही इतरांना खाऊ द्यायला पुष्कळ आवडते. त्यांना ‘चॉकलेट’ आणि ‘आइस्क्रीम’ पुष्कळ आवडते; परंतु कोणी ते मागितले, तर ते लगेच देतात.

ऊ. दोघांनाही सात्त्विक उत्पादनांशी खेळण्यास आवडते. ते आवरण काढणे आणि उपाय करणे, अशा कृती करतात, तसेच इतरांना अत्तर लावतात.

ए. दोघांनाही इतरांना साहाय्य करण्यास आवडते. घरातील कामे करत असतांना एखादी वस्तू मागितल्यास ते ती आणून देतात.

ऐ. मंदिरात किंवा सनातन संस्थेच्या कार्यक्रमाला किंवा हिंदु राष्ट्र-जागृती सभेला गेल्यावर कितीही गर्दी असली, तरी दोघे हट्ट न करता शांतपणे अन् आवडीने कार्यक्रम पहातात.

ओ. दोघेही इतरांना हसवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी हसावे; म्हणून काहीतरी कृती करतात.’

– सौ. भवानी प्रभु, कु. प्रतीक्षा, सौ. चैत्रा, श्री. प्रसाद आचार्य, सौ. वाणी आणि श्री. उमेश आचार्य (श्रीभार्गवचे आजी-आजोबा), दक्षिण कन्नड, कर्नाटक.

९. ‘पू. भार्गवराम आणि श्रीभार्गव यांना पाहिल्यावर ते ‘राम-लक्ष्मण’, ‘कृष्ण-बलराम’ अन् ‘लव-कुश’ आहेत’, असे वाटते.’

– श्री. उमेश आचार्य आणि सौ. वाणी आचार्य

श्रीकृष्ण असे हा आमचा ।

सनातनच्या साधिकेला पू. भार्गवराम यांच्याविषयी सुचलेले काव्य येथे देत आहोत.

कलियुगी आम्ही श्रीकृष्णजन्म अनुभवला ।
कलियुगी आम्ही श्रीकृष्णलीला अनुभवली ॥ १ ॥

मनमोही हा नटखट भारी असे लाडका सर्वांचा ।
श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे हा आमचा ॥ २ ॥

– सौ. समृद्धी संतोष गरुड, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF