नमितो तुजला सद्गुरुनाथा ।

संपादकीय

प.पू. भक्तराज महाराज म्हणजेच प.पू. बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. प.पू. बाबा हे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. मोक्षाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या साधकांना त्यांची शिकवण स्फूर्ती देणारी आणि दिशादर्शन करणारी आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सनातन प्रभात समूहाकडून त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन !

भक्तवत्सल प.पू. बाबा !

ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती हे ४ योग म्हणजे अध्यात्माचा पाया आहे. सध्याच्या घोर कलियुगामध्ये ज्ञान, ध्यान, कर्म या योगांच्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करणे, हा सर्वश्रेष्ठ आणि भक्ताला ईश्‍वरापर्यंत पोचण्याचा सुलभ असा मार्ग आहे. या मार्गावरून जाण्यासाठी भक्ताला अर्थात्च शिष्याला गुरूंची आवश्यकता भासते. प.पू. बाबा हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुरूपात लाभल्याने त्यांच्या बोधामृताच्या माध्यमातून सनातन संस्थेतील साधकांची वाटचाल मोक्षमार्गापर्यंत होत आहे. साधकरूपी लेकरांच्या ‘बाबा…’ अशा आर्त हाकेला साद देऊन सदैव त्यांचा भार वहाणारे, नामाचे महत्त्व अंतर्मनावर बिंबवणारे, षड्रिपू आणि संसारमाया यांतून मुक्त करून अद्वैताची वाट दाखवणारे आम्हा सर्वांचे प.पू. बाबा ! ‘गुरूंचे बोट धरूनच अध्यात्माच्या मार्गात केलेली वाटचाल फलदायी होते. गुरूंविना केलेली वाटचाल ही जन्मच व्यर्थ ठरवते’, असे म्हणतात. याच तत्त्वानुसार प.पू. बाबांनी त्यांच्या भक्तांना विविध माध्यमांतून अगदी बोट धरून शिकवले. त्या शिकवण्याला मर्यादा कधीच नव्हती. त्यांनी सुवचने, भजने, विनोद, वागणे-बोलणे, स्वप्ने, प्रत्यक्षरित्या अशा वेगवेगळ्या प्रकारे अध्यात्म, साधना, गुरु-शिष्य, ईश्‍वर यांचे ज्ञान दिले. कधी तर अप्रत्यक्षरित्या आणि शब्दातीत माध्यमातूनही त्यांनी भक्तांना घडवले. भजन, भ्रमण आणि भंडारा ही त्यांची त्रिसूत्रीही भक्तोद्धारासाठीच होती. ‘प्रेम, सेवा आणि त्याग ही मोक्षाची जननी आहे’, तसेच ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्यासी जोडा’, अशी उदात्त शिकवण देणार्‍या प.पू. बाबांचा शिकवणीमागील उद्देश ‘माझ्या शिष्याला ज्ञान प्राप्त होवो’, हा असे; म्हणूनच ते खर्‍या अर्थाने ‘भक्तवत्सल’ आहेत. प.पू. बाबा म्हणायचे, ‘मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य (गुरुतत्त्वाचा शिष्य) केल्याविना सोडणार नाही !’

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ असे सुवचन आहे. प.पू. बाबा हेही उच्च कोटीतील संत आणि काळाच्या पलीकडील जाणणारेही होते. ‘बंधुभगिनी ऐकाल तुम्ही जरी । कलियुगी धर्म हा कोसांतरी ॥ नामचि तारेल भवसागरी । नामचि दिनाचा आधार ॥’ या भजनपंक्तीतून त्यांनी त्यांच्या द्रष्टेपणाचीच प्रचीती दिली आहे.

भजनानंदी प.पू. बाबा !

सनातन संस्थेतील प्रत्येक साधक खरोखरच भाग्यवान आहे; कारण साधकरूपी भक्तांच्या कल्याणासाठी प.पू. बाबांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे. ‘आपण पडलो, रडलो, त्रासलो, तरीही प.पू. बाबा आपल्याला त्यातून बाहेर काढणारच आहेत’, अशी साधकांची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळेच प.पू. बाबा म्हणजे साधकांची ‘भक्तराजमाऊली’ आहे. याच माऊलीमुळे अज्ञानाच्या तिमिरातही साधकांना भजनरूपी अमृतसागरात डुंबण्याची संधी मिळत आहे. प.पू. बाबांच्या आत्मचक्षूंनी भगवंताला आणि सद्गुरूंना अनुभवल्यानंतर ही भजने साकार झाली. त्यामुळे भजने म्हणजे साक्षात ईश्‍वराचा सनातनला लाभलेला दैवी कृपाशीर्वादच आहे. अनेक संप्रदायांमध्ये, भजनी मंडळांमध्येही भजने म्हटली जातात; परंतु भक्तराजबाबांच्या वाणीतून मिळालेल्या अर्थमधुर आणि आशयघनसंपन्न ‘भजनामृता’च्या अवीट गोडी अनुभवण्यास देणारी भजने श्रेष्ठ आहेत. ही भजने नादब्रह्माची आणि आत्मानंदाची अनुभूती देऊन भावसमाधीत घेऊन जातात. एकमेवाद्वितीय अशी भजने निर्माण करणार्‍या ‘भजनानंदी’ प.पू. बाबांच्या चरणी सर्व साधक नेहमीच कृतज्ञ आहेत !

प.पू. बाबांच्या देहत्यागानंतरही त्यांची गाडी, त्यांच्या वस्तू, त्यांचा अनुभवलेला सहवास या सर्वांतून त्यांचेे अमूल्य मार्गदर्शन आणि चैतन्य यांची प्रचीती पदोपदी येत आहे. प.पू. बाबांचे सूक्ष्म अस्तित्व सनातनच्या अनेक साधकांनी वेळोवेळी अनुभवलेले आहे; म्हणून ते खर्‍या अर्थाने ‘भक्तवत्सल’ आहेत.

अवतारत्वाची एकमेवाद्वितीय परंपरा !

आद्य शंकराचार्य, श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, प.पू. अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अशी सनातनला लाभलेली गुरुपरंपरा आहे. प.पू. बाबांना गुरुप्राप्ती झाल्यानंतर त्यांना केवळ १ वर्ष १० मास इतकाच गुरूंचा सहवास लाभला; पण तरीही इतक्या अल्प कालावधीत ‘जाणूनी श्रीगुरूंचे मन’ या भावाने त्यांनी देहभान विसरून गुरुसेवा केली. गुरूंप्रती अचल निष्ठा दर्शवणारे अत्युच्च भक्तीचे प.पू. बाबा हे उत्तम उदाहरण होय; म्हणूनच प.पू. अनंतानंद साईश यांनी त्यांचे ‘भक्तराज’ असे नामकरण केले. तो त्यांच्यासाठी कृपाशीर्वादच होता. प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व ओळखून त्यांना गुरूंकडून मिळालेल्या कृपाशीर्वादाची परंपरा पुढे नेली. त्यामुळे ‘प.पू. बाबा हेही अवतारी पुरुषच आहेत’, असा आमचा त्यांच्याप्रती भाव आहे. घोर कलियुगात भक्तीबीज अंतरी पेरणार्‍या, मोक्षद्वारापर्यंत नेण्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणार्‍या अशा प.पू. भक्तराज महाराजांच्या मधुर स्मृती सदैव भक्तांच्या मनात वास करतील. ‘असे हे सद्गुरुनाथ प.पू. बाबा आमच्या हृदयसिंहासनी नेहमीच विराजमान राहोत’, अशी त्यांच्या कोमलचरणी जन्मशताब्दी वर्षानिमित्त भक्तजनांची आर्त प्रार्थना !

सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय ।


Multi Language |Offline reading | PDF