सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांच्या ज्ञानाच्या धारिका वाचतांना त्यांचे वडील पू. पद्माकर होनप यांना जाणवलेली सूत्रे

गुरुपौर्णिमा २०१९

१६ जुलै २०१९ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची गुणवैशिष्ट्ये येथे प्रकाशित करत आहोत.

सर्वसामान्यांना ‘सर्वमान्य’ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आपण सर्वसामान्य आहोत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच आपण ‘सर्वमान्य’ झालो आहोत.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१९.६.२०१७)

पू. पद्माकर होनप

‘सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप (माझा मुलगा) याच्याकडून आलेल्या ज्ञानाच्या धारिका परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला वाचायला मिळतात.

१. या धारिका वाचतांना माझा भाव जागृत होतो.

२. त्या वाचत असतांना ‘पुढे काय असेल ?’, याची मला उत्सुकता वाटते.

३. कधी कधी धारिका वाचतांना मला झोप येते, तसेच ग्लानीही येते. ‘धारिका वाचू नये’, असे मला वाटते. त्या वेळी ‘धारिकेमध्ये वाईट शक्तींचे लिखाण अधिक असल्यामुळे किंवा त्रासदायक शक्तींमुळे असे होत असेल’, असे मला वाटते.

– (पू.) श्री. पद्माकर होनप, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.४.२०१८)

शेतजमिनीची विक्री करण्यात अनेक अडथळे येणे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेला मंत्रजप केल्याने अडथळे दूर होऊन शेतजमिनीची विक्री लवकर होणे

परात्पर गुरु पांडे महाराज

‘माझ्या शेतजमिनीची विक्री करायचे चालले होते. त्यात अनेक अडथळे येत होते. अडथळे येत असल्याचे कु. दीपालीने (मुलीने) एका संतांना त्याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मंत्रजपाचे उपाय करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी त्यांच्याकडून मंत्रजप घेतले आणि दुसर्‍या दिवशी गावी निघालो. बसमध्ये असतांना जेवढा मंत्रजप करणे शक्य होते, तेवढा मंत्रजप मी केला. ठरलेल्या दिनांकास खरेदी खत न होता पुढील २ दिवसांनी खरेदी खत निर्विघ्नपणे पार पडले. एका दिवसाच्या मंत्रजपामुळे भूमीची विक्री लवकर झाली. त्याबद्दल परात्पर गुरु पांडे महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !’

– (पू.) श्री. पद्माकर होनप, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.४.२०१८)

पू. होनपकाका यांच्याकडून सौ. वैशाली मुद्गल यांना शिकायला मिळालेली सूत्रे

१. आनंदी आणि उत्साही

‘मी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला पू. होनपकाका यांच्या आजारपणाविषयीचा लेख वाचला. त्या लेखात ‘पू. काकांना त्रास होत असतांना ते देवाचे साहाय्य घेऊन गुरुचरणांपर्यंत कसे गेले ?’, हे मी वाचले. पू. काकांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर ‘ते एवढ्या मोठ्या संकटातून किंवा त्रासातून गेले आहेत’, असे मला वाटत नव्हते. त्यांना इतका मोठा आजार असूनही ते आनंदी आणि उत्साही दिसतात. मला त्यांच्या तोंडवळ्यावर बालकभाव (बालकाप्रमाणे आनंद आणि निरागसता) दिसतो.

२. त्रासावर मात करून प्रतिदिन सेवा करणे आणि चालणे

पू. होनपकाका दिवसभर लेखाची सेवा करतात आणि संध्याकाळी शतपावली करायला आगाशीत येतात. त्या वेळी त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात विचार आला, ‘रुग्णाईत असूनही पू. काका त्रासावर मात करून चालतात. मला त्यांच्या इतका त्रास किंवा आजार नाही, तरीही मी चालत नाही.’ हे माझ्या लक्षात आले आणि माझा सकारात्मक विचार करण्याचा भाग वाढला.

३. चालतांना पू. होनपकाकांकडून चैतन्य मिळणे

मला शतपावली करायला जमत नाही; परंतु पू. काका चालत असतांना मीही हळूहळू चालायला आरंभ करते. त्या वेळी मला पू. काकांकडून चैतन्य मिळत असते. तेच माझ्याकडून शतपावली करून घेतात, असे जाणवते.

४. वक्तशीरपणा

पू. काका नेहमी ठरलेल्या वेळेत सेवेला जातात, तसेच ते औषधे घेणे, महाप्रसाद ग्रहण करणे आणि फिरणे, या सर्व कृती वेळेत अन् नियोजनानुसार करतात.

५. प्रेमभाव

अ. पू. काका मला माझ्या साधनेतील अडचणी विचारतात आणि त्यांवर मार्गदर्शन करून उपाय सांगतात.

आ. ते माझी प्रेमाने चौकशी करतात. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरच माझ्याशी प्रेमाने बोलत आहेत’, असे मला वाटते.’

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF