‘सोवळे’ म्हणजे काय ?, याचा विचार न करता त्यावर टीका करणार्‍यांची (बुरसटलेली) मानसिकता !

वेदमूर्ती भूषण जोशी

समाजात बर्‍याच वेळा ‘सोवळे’ या विषयावर खल केला जातो. प्रत्येक जण ‘माझेच म्हणणे योग्य आहे’, या आविर्भावात स्वत:चे मत मांडत असतो. ‘सोवळे पाळण्याला काही वेळेला ‘बुरसटलेली मानसिकता आहे’, असे हिणवण्याचा प्रयत्न काही जण करतात. या पार्श्‍वभूमीवर वेंगुर्ले (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती भूषण जोशी यांनी ‘सोवळे’ या विषयावर मांडलेले विचार येथे देत आहोत.

१. सोवळ्याचे नियम का पाळावेत ?

सांप्रत काळात ‘नित्य व्यवहार आणि धार्मिक कृती यांमध्ये ‘शौच’ म्हणजे शुचिर्भूतपणा कसा असावा ?’ याविषयी शास्त्रकारांनी काय म्हटले आहे, ते नीट पाहूया. बर्‍याच वेळा ‘मन शुद्ध असले किंवा भावना शुद्ध असली की झाले ! सोवळे काय करायचे आहे ?’,

अशी वक्तव्ये केली जातात. ‘मी शुद्ध मनाने सर्व करतो, मग सोवळ्याचे नियम मी का पाळावेत ?’, असा प्रश्‍नही विचारला जातो. याचे समर्पक उत्तर पुढे वाचावे. त्यानंतर ‘सोवळे पाळावे किंवा पाळू नये’, हे सर्वस्वी स्वतः ठरवावे.

१ अ. अस्वच्छ हातांनी वाढलेले अन्न ग्रहण करणार का ? : आपण नातेवाइकांकडे वाढदिवसानिमित्त भोजनासाठी गेलो आणि जेवणाची पाने ठेवलेली असतांना तेवढ्यात यजमानांना (ज्यांच्या घरी कार्य आहे ते) लघुशंका किंवा शौचासाठी जावे लागले अन् ते हातपाय न धुता जेवणाच्या ठिकाणी आले अन् आपणास भोजन वाढू लागले, तर स्वतःला चालेल का ? (यजमानांचे मन आणि भावना हे दोन्ही शुद्ध आहे.) मग आपण ते अन्न आनंदाने ग्रहण कराल का ? ‘नैसर्गिक विधी केल्यानंतर हातपाय धुणे’, याला त्या प्रसंगातील ‘सोवळे’ म्हटल्यास वावगे ठरेल का ? ‘ते मान्य नाही; म्हणून तुम्ही ते करणे टाळाल का ?’, हे विचारांती ठरवावे.

१ आ. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) योग्य ती स्वच्छता न करता शस्त्रक्रिया करणे चालेल का ? : आपली मोतीबिंदूची किंवा अन्य एखादी लहानमोठी शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया करणारे आधुनिक वैद्य बाहेरून आले आणि ते तसेच आपल्यावर उपचार करणार असतील (निर्जंतुक कपडे आणि उपकरणे न वापरता), तर ते आपल्याला चालेल का ? (येथेही आधुनिक वैद्यांची भावना चांगलीच आहे आणि मनही शुद्ध आहे.) मग आपण विरोध न करता ही शस्त्रक्रिया करून घेणार का ? आधुनिक वैद्यांनी योग्य ती स्वच्छता पाळून आणि दक्षता घेऊन शस्त्रक्रिया करणे, याला त्या प्रसंगातील ‘सोवळे’ म्हटल्यास वावगे ठरेल का ? आणि ते मान्य नाही; म्हणून तुम्ही आधुनिक वैद्यांना तसेच उपचार करण्याची अनुमती द्याल का ?, हे विचारांती ठरवायला हवे.

१ इ. स्वयंपाक करतांना योग्य ती स्वच्छता न पाळणे चालेल का ? : स्वयंपाक उत्तम झालेला आहे आणि स्वयंपाक करणार्‍याचा हेतू ‘तुम्ही पोटभर जेवावे’, हा आहे. चांगल्या मनाने तो केला आहे; परंतु त्यात वारंवार केस मिळू लागले, तर आपण काय करू ? ‘स्वयंपाक करणार्‍यांनी योग्य ती स्वच्छता पाळून आणि दक्षता घेऊन स्वयंपाक करणे’, याला या प्रसंगातील सोवळे म्हटल्यास वावगे ठरेल का ? आणि ते मान्य नाही; म्हणून तुम्ही जेवणात केस सापडले, तरी शांतपणे ते ग्रहण कराल का ?

२. शास्त्रकारांनी सांगितलेल्या ३ प्रकारच्या शुद्धी – अन्नशुद्धी, द्रव्यशुद्धी आणि चित्तशुद्धी

या तिन्ही शुद्धी फार महत्त्वाच्या आहेत. यालाच ‘शौच’ असे म्हटले आहे. शास्त्रकारांनी ‘वरील ३ शुद्धींचे आजीवन आचरण करा’, असे म्हटले आहे.

२ अ. अन्नशुद्धी : अन्नशुद्धीविषयी सुलभता आहे. ‘स्नान करून, ताज्या पाण्याचा वापर करून, केस बांधून (मुक्तकेशा वर्ज्य) अन्नपूर्णेचे स्मरण करून, चिडचीड न करता (‘काय मेली कटकट आहे’ इत्यादी शब्द न उच्चारता) ‘मी बनवलेल्या अन्नाचा आस्वाद प्रत्यक्ष भगवंत ‘वायुरूपाने’ घेणार आहे’, ‘माझ्या घरच्या व्यक्ती हे अन्न ग्रहण करणार आहेत’, ‘पशूपक्षांनाही (गोग्रास, काकबली) यातील एक भाग देणार आहे’, असा भाव ठेवून धूतवस्त्र नेसून आपण जो स्वयंपाक करतो, तो ‘सात्त्विक’ आणि ‘शुद्ध’, या संज्ञेत येतो.

आपण जे अन्न ग्रहण करतो, त्याच अन्नापासून शरिरात रक्त बनते आणि शरिराचे पोषण होते. बुद्धी आणि चित्त या गोष्टींवर अन्नाचा परिणाम होतो. सतत उपाहारगृहातील तेलकट, तिखट आणि चमचमीत अन्न खाणारे चिडचिडे बनतात, तसेच त्यांची प्रकृतीही बिघडते.

२ आ. द्रव्यशुद्धी : आपण पैसा कोणत्या मार्गाने मिळवत आहोत, हेदेखील फार महत्त्वाचे आहे. लाच घेऊन, चोरी, लूट आदी प्रकारे अयोग्य मार्गांनी मिळवलेले धन हे घराण्याचा नाश करते. चोरी करून मिळालेल्या पैशांनी देवाला पंचपक्वाने वाढली, तरी भगवंत ते स्वीकारणार नाही. याउलट मेहनत आणि श्रम करून मिळवलेला वरणभाताचा नैवेद्य, भाजी भाकरीचा नैवेद्य भगवंत प्रेमाने स्वीकारील. अयोग्य मार्गाने मिळवलेल्या संपत्तीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पुढची पिढी विकृत, अपंग किंवा रोगी जन्मलेली अनेक उदाहरणे समोर आहेत.

२ आ १. ‘मनुस्मृति’मध्ये सांगितलेली शुद्धीची साधने : ‘मनुस्मृति’च्या ५ व्या अध्यायात ज्ञान, तप, अग्नी, आहार, मृत्तिका, मन, जल, सारवण, वायू, कर्म, सूर्य आणि काल ही सर्व प्रत्येक प्राण्याच्या शुद्धीची साधने सांगितली आहेत. हे कसे, ते लगेच स्पष्ट करतो, म्हणजे शंका येणार नाही.

अ. धान्य हे सूर्यप्रकाशाने शुद्ध होते. (आजही आपण उन्हाळ्यात धान्याला ऊन लावून ठेवतो. त्यामुळे धान्याला कीड लागत नाही.)

आ. घामाने मलीन झालेली गात्रे पाण्याने शुद्ध होतात. (हातपाय धुतले, स्नान केले की, उत्साहवर्धक (फ्रेश) वाटते. त्यालाच ‘शुद्धी’ म्हटले आहे.)

इ. सोने, रूपे हे धातू अग्नी आणि पाणी यांनी शुद्ध होतात. (सोनार दागिने बनवतांना सोन्याला प्रथम आगीत घालतो. मग पाण्याचा वापर करतो, म्हणजे धातू शुद्ध होतो.)

ई. तांबे, कासे आदी धातू पात्रक्षार आमसूल किंवा लिंबू, चिंच या आंबट पदार्थाने शुद्ध होते. साबण निर्मिती करणारी अनेक आस्थापनेदेखील ‘लिंबाची शक्ती’ म्हणून विज्ञापन करतात.

उ. सत्य भाषणाने मन शुद्ध होते.

ऊ. ब्रह्मज्ञान हे बुद्धी शुद्ध करते.

ए. माता-भगिनी या प्रत्येक मासात रजस्वला झाल्यानंतर आपसुक शुद्ध होतात.

ऐ. दुसर्‍याने दिलेली पीडा आनंदाने सहन करून जी शांती मिळते, त्यांनी विद्वान ‘शुद्ध’ होतात.

ओ. मलीन झालेली वस्त्रे धुतल्याने शुद्ध होतात.

२ आ २. दैनंदिन धर्माचरणाच्या गोष्टी आणि विज्ञान 

अ. आपण साबण निर्मिती आस्थापनांच्या विज्ञापनांत किंवा आधुनिक वैद्यांनी ‘हातपाय स्वच्छ धुवा’, असे सांगितले, तर ऐकतो; पण आई-बाबांनी ‘हातपाय धुऊन मंदिरात जा’, असे म्हटले की, स्वतःतील ‘विज्ञानवाद’ जागा होतो.

आ. ‘तांब्याच्या भांड्यांना आमसूल किंवा चिंच, लिंबू लावून स्वच्छ करा’, असे सांगणार्‍यांना ‘वेडे’ ठरवतो आणि ‘लिंबाची शक्ती असलेले’ साबण मात्र आपण अभिमानाने मिरवतो.

इ. ‘केस बांधून स्वयंपाक करा’, असे शास्त्रकार सांगतात, ते आपल्या दृष्टीने वेडे असतात; पण ‘कुक’ किंवा ‘शेफ’ (आचारी) यांना स्वयंपाक करतांना ‘डोक्यावर टोपी परिधान करा’, असे सांगतात, ते मात्र लगेच पटते. (हेतू स्वयंपाकात केस पडू नयेत, हाच आहे.)

२ आ ३. प्रतिदिन अंघोळ करण्याचे महत्त्व, पूजेच्या वेळी आणि दैनंदिन वापरावयाचे वस्त्र : पूजेला बसतांना स्वच्छ (सोवळे किंवा धोतर, उपरणे) वस्त्र सांगितले आहे. धूत म्हणजे धुतलेले स्वच्छ आणि शुभ्र असे वस्त्र नेसावे. (रेडिमेड सोवळ्याची पॅन्ट चालत नाही.) रेशीम वस्त्रात जंतू संसर्ग होत नाही, हा एक भाग आहेच, तसेच भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे आणि या ठिकाणी घाम जास्त येतो. त्यामुळे कोट, पॅन्ट, ‘टायसूट’ इत्यादींचा वापर केला, तर ‘त्वचा विकार’ होतात. सुती वस्त्रात घाम नीट टिपला जातो.

अ. लंडन किंवा युरोप येथे थंडी खूप असते. पाणी बर्‍याचदा गोठलेले असते; म्हणून ते ‘शौचालयात’ कागदाचा (‘पेपर’चा) वापर करतात. आपल्याकडे तसे नसूनही आपण कागद का वापर करतो ?

आ. युरोपमध्ये प्रतिदिन स्नान करणे वातावरणाला अनुसरून कठीण असते. त्यामुळे शरिराला दुर्गंध येऊ नये; म्हणून सुगंधी द्रव्ये (परफ्युम्) वापरतात. असे असतांना आपण कोणत्या उद्देशाने सुगंधी द्रव्य वापरतो ?

इ. वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष असते; म्हणून आखाती देशांत मुसलमान प्रती शुक्रवारी स्नान करतात.

आपण यातील कसलाच विचार न करता केवळ ‘मी पुरोगामी आहे, विज्ञानवादी आहे’, हे सिद्ध करायला यातील बर्‍याच गोष्टी अंगीकारतो. या सर्व गोष्टी शरीरशुद्धीत (सोवळ्यात) मोडतात; मात्र त्याला ‘सोवळे’ म्हटले की, तथाकथित पुरोगामी, विज्ञानवादी नाक मुरडतात.

२ इ. चित्तशुद्धी : ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता शुद्ध अंतःकरणाने यम-नियम पाळून सत्य बोलणे, सदाचार आणि सद्वर्तन यांची सांगड घालून जे तप केले जाते, त्याने चित्तशुद्धी होते.

शास्त्रकारांना ‘मार्केटिंग’ जमत नव्हते. त्यामुळे ते प्रतिगामी ठरले, उदा. ‘हळद किंवा चंदन लावा, त्याने त्वचा शुद्ध होते’, हे सांगणारे वेडे ठरले आणि ‘टर्मरिक क्रिम’ अन् ‘सँडल सोप’ लावा’, असे सांगणार्‍यांचे कौतुक झाले.

शुद्धता ही आचरणाची गोष्ट आहे. ज्याला हे पटेल त्यांनी आचरणात आणावे,  न पटेल त्यांनी वरील ३ प्रश्‍नांची समर्पक आणि स्वत:च्या मनास पटतील, अशी उत्तरे शोधावी, ही विनंती.’

– वेदमूर्ती भूषण जोशी, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग.


Multi Language |Offline reading | PDF